Stock Market Today | सेन्सेक्स ३९०, निफ्टी १०९ अंकांनी घसरला, ‘या’ ५ मोठ्या कंपन्यांना फटका | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स ३९०, निफ्टी १०९ अंकांनी घसरला, 'या' ५ मोठ्या कंपन्यांना फटका

Stock Market Today : कमकुवत जागतिक संकेत तसेच किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे पडसाद आज गुरुवारी (दि.१३) शेअर बाजारात दिसून आले. बुधवारच्या तेजीनंतर गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरला. सकाळपासून सुरु झालेली ही घसरण बाजार बंद होताना कायम राहिली. सेन्सेक्स ३९० अंकांच्या घसरणीसह ५७,२३५ वर बंद झाला. तर निफ्टी १०९ अंकांनी खाली येऊन १७,०१४ वर बंद झाला. एनएसई प्लॅटफॉर्मवर विप्रो, अदानी पोर्ट्स, एसबीआय, एल अँड टी आणि एसबीआय लाइफ या कंपन्यांचे शेअर्स ६.६३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर एचसीएल टेक, हिंदाल्को, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि एनटीपीसी यांचे शेअर्स वधारले होते.  अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने महागाई सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचा दर ०.१ टक्क्याने घसरून प्रति बॅरेल ९२.३८ डॉलरवर आला आहे. याचे परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहेत.

आशियाई बाजारात घसरण…

वॉल स्ट्रीटच्या पाठोपाठ आशियाई बाजारात घसरण कायम आहे. जागतिक मंदीची जोखीम वाढत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. याचे पडसाद बाजारात दिसून येत आहेत. गुरुवारी सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ५२ पॉइंट्स म्हणजे ०.३० टक्क्यांनी घसरून १७,०५३ वर आला. येथील शेअर बाजारात गुरुवारी नकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येत आहे. टोकियो स्टॉक एक्सचेंजचा निक्केई २२५ निर्देशांक ०.०४ टक्के म्हणजेच १०.३९ अंकांनी घसरून २६,३८६.४४ वर आला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.२१ टक्के म्हणजे ३.९५ अंकांनी घसरून १,८६५ वर आला होता.

सलग तीन सत्रातील घसरणीनंतर काल बुधवारी (दि.१२) शेअर बाजार सावरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती घसरल्याने शेअर बाजारात काल सकारात्मक वातावरण तयार झाले होते. यामुळे बुधवारी बीएसई सेन्सेक्स ४७८ अंकांनी वधारुन ५७,६२५ वर बंद झाला. तर निफ्टी १४० अंकांनी वर जात १७,१२३ वर बंद झाला होता. सेन्सेक्स, निफ्टी तेजीत आल्याने आयटी, ऑटो समभाग वधारले होते. पण तेजी गुरुवारी कायम राहिली नाही.

काल बुधवारी कोल इंडियाचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले होते. या शेअर्सनी ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती. हे शेअर्स दुपारच्या व्यवहारांमध्ये २.५ टक्क्यांहून अधिक वाढले. तर Indian Oil Corp, बीपीसीएल, ऑइल इंडिया, एचपीसीएल आणि इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स केंद्रीय मंत्रिमंडळ तेल विपणन कंपन्यांसाठी सबसिडी मंजूर करेल या आशेवर ‍वधारल्याचे दिसून आले होते. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button