Share Market Today | शेअर बाजारात पॉझिटिव्ह ट्रेंड, सेन्सेक्स ४७८ अंकांनी वधारुन ५७,६२५ वर बंद | पुढारी

Share Market Today | शेअर बाजारात पॉझिटिव्ह ट्रेंड, सेन्सेक्स ४७८ अंकांनी वधारुन ५७,६२५ वर बंद

Share Market Today : सलग तीन सत्रातील घसरणीनंतर आज बुधवारी (दि.१२) शेअर बाजार सावरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती घसरल्याने शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. यामुळे बीएसई सेन्सेक्स ४७८ अंकांनी वधारुन ५७,६२५ वर बंद झाला. तर निफ्टी १४० अंकांनी वर जात १७,१२३ वर बंद झाला. सेन्सेक्स, निफ्टी तेजीत आल्याने आयटी, ऑटो समभाग वधारले. सकाळपासून सुरु झालेली सेन्सेक्स, निफ्टीतील तेजी बाजार बंद होताना कायम राहिली.

काल मंगळवारी सेन्सेक्स ८४३ अंकांनी खाली येऊन ५७,१४७ वर बंद झाला होता. तर निफ्टी २५७ अंकांच्या घसरणीसह १६,९८३ वर बंद झाला होता. (Share Market Today) आज त्यात तेजी दिसून आली. बुधवारी कोल इंडियाचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले. या शेअर्सनी ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. हे शेअर्स दुपारच्या व्यवहारांमध्ये २.५ टक्क्यांहून अधिक वाढले. तर Indian Oil Corp, बीपीसीएल, ऑइल इंडिया, एचपीसीएल आणि इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स केंद्रीय मंत्रिमंडळ तेल विपणन कंपन्यांसाठी सबसिडी मंजूर करेल या आशेवर ‍वधारले.

आशियाई बाजारात घसरण…

दरम्यान, आशियाई स्टॉक्स वॉल स्ट्रीटवर रात्रभर झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले . जपानचा निक्की निर्देशांक ०.१४ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा KOSPI ०.३७ टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक २.०३ टक्क्यांनी आणि शांघाय कंपोझिट १.१० टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

जागतिक मंदीची वाढती जोखीम…

जागतिक मंदीची वाढती जोखीम आणि चीनमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंध लादल्यामुळे इंधनाच्या मागणीला फटका बसला आहे. परिणामी आज तेलाच्या किमती कमी झाल्या. याचे चांगले परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आले. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे.

रुपयात किचिंत सुधारणा

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयात ०.१ टक्याने सुधारणा होऊन तो ८२.२३ वर आला आहे. भारतीय रुपया मागील तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ८२.३२ च्या अगदी जवळ होता.

हे ही वाचा :

Back to top button