लक्ष्मीची पाऊले : बँकिंग, आय.टी., वाहन उद्योगाच्या शेअर्सना मागणी

लक्ष्मीची पाऊले : बँकिंग, आय.टी., वाहन उद्योगाच्या शेअर्सना मागणी
Published on
Updated on

वसंत पटवर्धन 

डिजिटल रुपयाने व्यवहार सोपे होतील, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी नुकतेच व्यक्त केले. अशा रुपयामुळे विदेश विनिमय व्यवहार, बिले भरणे ही कामे सोपी होतील. डिजिटल रुपया ही डिजिटल बँक करन्सी (सीबीडीसी) यावर्षी रिझर्व्ह बँक बाजारात आणणार आहे. या चलनाचा वापर सुरू झाल्यावर व्यवहारापूर्वीचा कालावधी कमी होईल. यापूर्वीच फेब्रुवारी 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 8 महिन्यांपूर्वी (सीबीडीसी) बाजारात आणण्यात येईल, अशी घोषणा केली होती. सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी.

देशात झालेली विक्रमी चलनवाढ सुसह्य होत असल्यामुळे आता चलनवाढ व वित्तीय तूट हा चिंतेचा विषय राहिलेला नाही. आता रोजगार निर्मिती व विकास यावर भर दिला जात आहे. किरकोळ चलनवाढ (महागाई) एप्रिल 2022 मध्ये 7.79 टक्के झाली होती. ती आता हळूहळू खाली येत आहे. किरकोळ चलनवाढ जुलै 2022 मध्ये 6.71 टक्के झाली होती. ती आता खाली येत आहे. याचे महत्त्वाचे कारण खाद्य पदार्थांच्या किमती कमी होत आहेत, हे आहे. पावसाळा चांगला होत असल्यामुळे भाजीपाला व फळे यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दसरा, दिवाळीच्या पूर्वीच हे होत असल्यामुळे सामान्य नागरिक खुशी आहे. रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या 6 टक्क्यांपेक्षा ही चलनवाढ थोडीशी जास्त आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची मुळे मजबूत आहेत

कोरोनासारख्या मोठ्या संकटातून भारतीय अर्थव्यवस्था तावून सुलाखून बाहेर पडली आहे, असे मत मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमूल्यन संस्थेने म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्ध, सातत्याने वाढणारी महागाई आणि निराशाजनक जागतिक आर्थिक स्थिती यांचा आपण यशस्वीरित्या मुकाबला केला आहे. इतके असले तरीही देशातील दरडोई उत्पन्न अजून कमीच आहे. देशावर परकीय कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे. हा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी भारतीय नागरिकांच्या काढ्यांची आवश्यकता आहे.

भांडवलाचा चांगला ओघ आणि चांगल्या गुणवत्तेची भांडवली पर्यायता यामुळे बँका, रिझर्व्ह बँक व अन्य वित्त संस्था यांचा त्यात मोठा वाटा आहे. बँका व अन्य वित्त संस्था यांची कोरोना काळातील दारुण परिस्थिती आता हळूहळू कमी होत आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान हिझ ड्रस या झाल्या आहेत. तेव्हा यापुढे दोन्ही देशातील मुक्त व्यापार (ऋीशश ढीरवश) वाढीला लागेल, असा आशावाद केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था निकोप असल्यामुळे शेअर बाजारातील निर्देशांक हळूहळू वरचे टप्पे ओलांडत आहे.

पुण्याचे महत्त्व आता भौगोलिकद़ृष्ट्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार आहे. याची दोन कारणे आहेत. पुण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यापासून 50 मैलांवर असलेल्या पुरंदर इथे होणार आहे. त्यामुळे पुणे-लोहगाव येथून जवळच्या अंतरावरील गोवा, अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, तिरुपती, मुंबई यांसारख्या ठिकाणची विमान उड्डाणे होतील. केंद्र सरकारने पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजुरी दिली आहे. रांजगणाव फेज 3 मधील 297 एकरावर हा प्रकल्प उभा राहील. यामुळे नवीन 5000 रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकार सुमारे 208 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देईल. देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2020 रोजी सुधारित इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 2.01 योजना अधिसूचित केली होती. या प्रकल्पामुळे मोठ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपन्या पुणे शहरात येतील, त्यामुळे लहान कंपन्यांनाही काही कामे मिळतील. शेअर बाजाराचे रहाडगाडगे अधूनमधून खाली-वर होत असते. त्यामुळेच निर्देशांकही खाली-वर जातो. सध्या बँकिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व वाहन उद्योग या शेअर्सना मागणी आहे. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक या शेअर्सना मागणी आहे; तर टाटा स्टील, एनटी पीसी, टायटन, नेसले व पॉवरग्रीड या शेअर्सचे भाव घसरले.

 रुपयाचा विनिमय दर सुधारत आहे.

इथला शेअरबाजार सुधारण्याची दोन कारणे आहेत. अमेरिकेतील शेअरबाजार सुधारल्यामुळे व क्रूड तेलाचे भाव घसरल्यामुळे हे घडले.
गुलामीचे प्रतीक असलेला दिल्लीतील राजपथ आता इतिहासजमा झाला आहे. त्या ठिकाणी कर्तव्यपथाच्या रूपाने नव्या इतिहासाचे दार उघडले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीत भारतवासीयांना गौरव वाटावा असे अनेक उपक्रम राबवले आहेत. ही जरी आर्थिक बाब नसली तरी अभिमानाची बाब आहे म्हणून याचा उल्लेख केला आहे. ज्या ठिकाणी गुलामीचे गालबोट लागले होते; ते आता पुसले जाऊन, तिथे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अभिमानाने उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news