
मुदत ठेव, म्युच्युअल फंडस्, शेअर्समध्ये गुंतवणूक, बॉण्ड, रोखे, सोने, रिअल इस्टेट यांसारखे असंख्य गुंतवणूक पर्याय सध्या उपलब्ध असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी अनेक सुसंधी आहेत.
गुंतवणूकदारांसाठीच्या बहुतांश पर्यायांमध्ये आपण जमेल तेवढी गुंतवणूक करू शकतो. एसआयपीसारखा पर्याय यासाठी उत्तम ठरतो. पण, एसआयपीप्रमाणे दरमहा हजार-दोन हजार रुपये गुंतवून एखादी मालमत्ता खरेदी करता येऊ शकते, याची अनेकांना कल्पना नसेल किंवा जागेचे दर गगनाला भिडलेले असताना हे कसे शक्य आहे, असाही विचार मनात येईल; परंतु हजार-दोन हजार रुपये दरमहा गुंतवू इच्छित असणार्या एक लाख जणांनी एक संस्था स्थापन करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. यासाठी एका तज्ज्ञाची नेमणूक करणे आवश्यक ठरते.
प्रत्येकी 1000 रुपये या हिशेबाने एक लाख जणांचे दहा कोटी रुपये होतात. तेवढ्या पैशांमधून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. अशा संस्थांना रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट) असे म्हणतात. अशा संस्था भारतामध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहेत.
या ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त एक डिमॅट अकाऊंट लागते. या कंपन्यांचे शेअर्स हे शेअर बाजारात नोंदणीकृत असतात. ते आपल्याला विकत घेता येतात. या मालमत्तांमधून मिळणारे भाडेतत्त्वावरील उत्पन्न गुंतवणूकदारांना डिव्हिडंड स्वरूपात दरवर्षी द्यावे लागते. मालमत्तेची किंमत वाढत जाते, त्यानुसार या संस्थेच्या शेअरची किंमत वाढत जाते.
रुचिर थत्ते
(लेखक एनआयएसएम प्रमाणित गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअर मार्केट गुंतवणूक कर सल्लागार आहेत.)