Gold prices today : सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold prices today : सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या नवे दर

पुढारी डेस्क : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold prices today) किचिंत घट दिसून येत आहे. सोमवारी (दि. २२) शुद्ध सोन्याचा दर २५२ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ५१,५५० रुपयांवर खुला झाला. गेल्या शुक्रवारी (दि.१९) शुद्ध सोन्याचा दर ५१,८०२ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून येत आहे. चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. चांदीचा दर प्रति किलो ५५,१६६ रुपयांवर आला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold prices today सोमवारी (दि.२२) २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५५० रुपये, २३ कॅरेट ५१,३४४ रुपये, २२ कॅरेट सोने ४७,२२० रुपये, १८ कॅरेट सोने ३८,६६३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,१५७ रुपयांवर खुला झाला होता. चांदीचा दर प्रति किलो ५५,१६६ रुपयांवर खुला झाला आहे.

स्वस्तात सोने खरेदीची संधी

जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेची Sovereign Gold Bond Scheme (SGBS) दुसरी सीरिज आज २२ ऑगस्ट रोजी खुली झाली. २०२२-२३ मधील एसजीबीएसची ही दुसरी सीरिज आहे. या योजनेत तुम्ही २६ ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक करु शकता. सार्वभौम सुवर्णरोखे ही योजना भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून राबविली जाते.

या योजनेत प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५,१९७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर प्रति ग्रॅम ५० रुपये डिस्काउंट मिळणार आहे. RBI ने १९ ऑगस्ट रोजी या योजनेची सविस्तर माहिती जारी केली आहे. डिस्काउंटमुळे गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोने ५,१४७ रुपयांना मिळणार आहे. या गोल्ड बाँड योजनेत भारतीय नागरिक, ट्रस्टस, विद्यापीठ आणि चॅरिटेबल संस्था गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा कालावधी ८ वर्षाचा आहे. जर तुम्हाला या आधीच पैसे काढायचे असतील तर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढू शकता.

या योजनेत कोणताही गुंतवणूकदार कमीत कमी एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा ४ किलोग्रॅम एवढी असेल. ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २० किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतात.

गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडचे पेमेंट कॅश, डिमांट ड्राफ्ट, चेक या डिजीटल माध्यमातून करता येते. कॅश स्वरुपात कमाल २० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. जर याहून अधिक गुंतवणूक करायची असेल तर त्याला दुसऱ्या माध्यमाचा वापर करायला हवा. गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के फिक्स्ड रेटनुसार व्याज मिळेल. याचे पेमेंट नॉमिनल व्हॅल्यूवर प्रत्येक सहामाही असे मिळेल. ही सरकारची योजना आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. यात कोणतीही जोखीम नाही. ही योजना सोन्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात गुंतवणूक करण्याची सुविधा देते. फिजिकली गोल्डच्या सुरक्षेची मोठी समस्या आहे. यामुळे सोन्याची चोरी होण्याची भिती असते. पण गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने सोने चोरीची चिंता मिटते.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button