निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* गतसप्‍ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे 7860 अंक व 107.97 अंकांची घसरण होऊन निर्देशांक अनुक्रमे 16450.5 अंक व 55329.32 अंकांच्या पातळीवर बंद झाले. सप्‍ताहादरम्यान निफ्टीने 16701.85 अंक व सेन्सेक्सने 56118.57 अंकांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. निफ्टी व सेन्सेक्स मध्ये आठवड्याभरात एकूण 0.48 टक्के व 0.19 टक्क्यांची घसरण झाली. वरच्या पातळीवर गुंतवणूकदारांनी आपला नफा काढून घेण्यास प्राधान्य दिल्याने दोन्ही निर्देशांक सर्वोच्च पातळीवरून अखेरच्या दिवशी खाली आले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने वर्षाअखेरपर्यंत रोखे खरेदीचा वेग कमी करण्याचे संकेत मागील आठवड्यात दिले.

अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरण्याच्या द‍ृष्टीने फेडरल रिझर्व्हकडून देण्यात येणारी मदत (पॅकेज) कमी करण्याच्या शक्यतेने भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय/भांडवल बाजारांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेत रोजगार निर्मितीच्या द‍ृष्टीने तसेच महागाई वाढीचे जे उद्दिष्ट तसेच महागाई वाढीचे जे उद्दिष्ट होते, ते बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच व्याजदर वाढण्याची शक्यता देखील बाजार विश्‍लेषकांनी व्यक्‍त केली.

* देशभरातील सराफा व्यावसायिकांचा सोमवारी संप हॉलमार्किंग संबंधीच्या जाचक अटींविरोधात करण्यात येणार आहे. ‘हॉलमार्किंग युनिक आयडी’ची प्रक्रिया पार पाडताना सुमारे 5 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच 16 जूनपासून हॉलमार्किंग करणेदेखील सक्‍तीचे केले आहे. हॉलमार्किंगसाठी सर्व ठिकाणी सुविधा नसल्याने तसेच मंदीच्या लाटेमध्ये सराफा व्यावसायिक अधिकच अडचणीत आला असल्याचे व्यावसायिकांचे मत यासाठी ‘नॅशनल टास्क फोर्स ऑन हॉलमार्किंग’ या 350 सराफा व्यावसायिकांच्या संघटनांचा समावेश असणार्‍या शिखर संघटनेने 23 ऑगस्ट रोजी संप पुकारला आहे.

* व्यवसायवृद्धीच्या द‍ृष्टीने खर्च करण्यात येणार्‍या रकमेत सरकारी कंपनी ‘कोल इंडिया’ची आघाडी. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक खर्च. मागील वर्षी असणारा 844 कोटींचा खर्च यावर्षी 1840 कोटींपर्यंत पोहोचला. खर्चाची रक्‍कम प्रामुख्याने अवजड यंत्रसामुग्री खरेदी करणे, नवीन खाणी खरेदी करणे यासाठी वापरण्यात आली. व्यवसाय वृद्धीसाठी कोल इंडियातर्फे या आर्थिक वर्षात 17 हजार कोटींचा खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी कोल इंडियाने यासाठी 13284 कोटी खर्च केले.

* ऑनलाईन गाड्या खरेदी-विक्री व्यवहारसंबंधी सेवा पुरवणारी कंपनी ‘कार्स 24’ 350 दशलक्ष डॉलर्सचा निधी सॉफ्ट बँक या गुंतवणूकदारामार्फत उभा करणार. निधी उभारणीपश्‍चात ‘कार्स 24’चे बाजारमूल्य 2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. पुढील एक ते दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान कंपनीची भांडवल बाजारात आयपीओच्या मार्गाने प्रवेश होण्याची शक्यता.

* औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनी ‘एमक्युअर फार्मासिटीकल्स’ आयपीओच्या मार्गाने भांडवल बाजारात उतरणार. एकूण 5 हजार कोटींचा निधी उभारणीचे लक्ष. सध्या एक क्युअरमध्ये बेन कॅपिटल ही अमेरिकेतील सर्वात मोठी गुंतवणूकदार असून, आयपीओमार्फत 1100 कोटींचे नवीन समभाग तसेच सध्याच्या गुंतवणूकदारांचे 18.2 दशलक्ष समभाग विक्रीसाठी उपलब्ध होतील.

* देशातील सर्वात मोठी खासगी बँक ‘एचडीएफसी बँक’ ‘एटी-1’ रोख्यांच्या मार्फत 1 अब्ज डॉलर्सचा निधी उभा केला. ‘एटी-1’ रोख्यांमार्फत एखाद्या भारतीय बँकेने आजपर्यंत उभारलेला सर्वात मोठा निधी आहे.

* ‘टाटा स्टील’ कंपनी ‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’ ही सरकारी कंपनी खरेदी करण्यास उत्सुक. टाटा स्टीलचे सीईओ नरेंद्रन यांची माहिती. यापूर्वी राष्ट्रीय इस्पात निगमच्या विक्रीस 27 जानेवारी रोजी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे.

* ऑनलाईन किराणा मालाची विक्री करणारी ‘ग्रोफर्स’ कंपनीमध्ये झोमॅटो कंपनीची 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक. गुंतवणुकीपश्‍चात ग्रोफर्सचे मूल्य 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7.5 हजार कोटी) पर्यंत पोहोचले.

* सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी ‘आराम्को’ भारतीय कंपनी रिलायन्सच्या तेलशुद्धीकरण व्यवसायातील 20 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. सुमारे 20 ते 25 अब्ज डॉलर्सचे आराम्को कंपनीचे समभाग रिलायन्सकडे देऊन रिलायन्समधील हिस्सा खरेदी केली जाण्याची शक्यता.

* देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी 11040 कोटींची केंद्र सरकारची योजना. सध्या इंडोनेशिया आणि मलेशिया देशावर आपण खाद्यतेलासाठी अधिक प्रमाणात विसंबून आहोत. खाद्यतेलाच्या उत्पादन वाढीसाठी ईशान्येकडील राज्ये तसेच अंदमान-निकोबार बेट याठिकाणी लक्ष्य केंद्रित करण्यात येणार.

* आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांमार्फत (एफपीआय) भारतीय भांडवल बाजारात 592 अब्ज डॉलर्स गुंतवले गेले. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 7 टक्क्यांनी अधिक आहे.

* 13 ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी विक्रमी पातळीपासून 2.10 अब्ज डॉलर्सनी कमी होऊन 619.365 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button