‘ई-मँडेट’ म्हणजे काय? | पुढारी

‘ई-मँडेट’ म्हणजे काय?

एखादी व्यक्ती बँकेतून कर्ज घेत असेल आणि तो काही कारणांमुळे हप्ता भरण्यास विसरत असेल, तर त्याला पेनल्टी द्यावी लागते. परंतु ‘ई-मॅन्डेट’अंतर्गत ऑटो डेबिट सुविधा असल्याने कर्जाचा हप्ता बँक स्वत:च कपात करून तो अदा करेल. यासाठी हप्ता किंवा बिल भरण्याची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही.

अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑटो डेबिट अर्थात ‘ई-मँडेट’अंतर्गत येणार्‍या बिलासंदर्भातील ओटीपीच्या नियमात बदल केले आहेत. नवा बदल म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयच्या माध्यमातून होणार्‍या रिकरिंगवर ऑटो डेबिटसाठी निश्चित केलेल्या रकमेची मर्यादा वाढविण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता ऑटो डेबिट किंवा ‘ई-मॅडेंट’ संदर्भात ग्राहकाला सतत ओटीपी द्यावा लागणार नाही. आरबीआयचा निर्णय हा ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच घेतला आहे.

* मँडेट म्हणजे काय?

आपण टीव्ही कार्यक्रम पाहण्यासाठी एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय मासिकेची मेंबरशिप घेतली असेल, शाळेची फीस भरायची असेल, घराचे भाडे भरायचे असेल, विमा हप्ता भरायचा असेल, कर्जाचा हप्ता भरायचा असेल, म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून रक्कम भरत असाल किंवा एखाद्या सेवेचे मासिक बिल भरायचे असेल आणि हे बिल दरमहा भरत असाल, तर यासाठी आपण बँकेच्या ऑटो डेबिटच्या सुविधेचा लाभ घेतो. यासाठी आपल्याला बँकेत एक मँडेट साईन करावा लागतो. या मँडेटला साईन केल्यानंतर सर्व सेवा सक्रिय होतात आणि ऑटो डेबिटने सर्व बिलांचा भरणा दरमहा नियमित केला जातो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय आदींच्या माध्यमातूनही ई-मँडेटसाठी अर्ज करता येते. या सुविधाला ‘ई-मँडेट’ किंवा ‘ऑटो डेबिटची सुविधा’ असे नाव दिले आहे. आरबीआयने या सुविधेशी निगडित नियमात बदल केले आहे.

* काय बदल आहेत?

सध्याच्या काळात ऑटो डेबिटच्या माध्यमातून ओटीपीशिवाय 5 हजारांपर्यंत भरणा करण्याची मुभा होती. आता ही मर्यादा 15 हजार रुपये केली आहे. म्हणजेच 15 हजारांपर्यंत व्यवहार करताना ओटीपीची गरज भासणार नाही. परंतु पंधरा हजारांपेक्षा अधिक भरणा केल्यास रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल आणि तो ओटीपी क्रमांक देऊन व्यवहाराला परवानगी द्यावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा केवळ दोन हजारांपर्यंतच होती.

* ऑटो डेबिट कसे काम करते?

ऑटो डेबिट म्हणजेच ‘ई-मँडेट’ सुविधा घेतल्यानंतर बिल भरण्याचे टेन्शन राहत नाही. एखादे बिल भरायचे राहून गेले असेल, तर ‘ई- मँडेट’च्या माध्यमातून आपले सर्व बिल ऑटो डेबिटच्या माध्यमातून भरले जातात आणि दंडापासून बचाव होतो. या व्यवहारासाठी बँकेच्या खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. हा ओटीपी क्रमांक येताच तो द्यावा लागतो. यानुसार तत्काळ बिल भरणा होतो. परंतु यासाठी रक्कम निश्चित केलेली आहे. या मर्यादेतच बिलाचा भरणा करावा लागतो. मर्यादेच्या आत रक्कम असेल, तर ओटीपी द्यावा लागणार नाही. परंतु मर्यादेापेक्षा अधिक रक्कम असेल, तर ओटीपी द्यावा लागेल. आता हीच मर्यादा वाढविली आहे.

* ‘ई-मँडेट’चे फायदे

एखादी व्यक्ती बँकेतून कर्ज घेत असेल आणि तो काही कारणांमुळे हप्ता भरण्यास विसरत असेल, तर त्याला पेनल्टी द्यावी लागते. परंतु ‘ई-मँडेट’अंतर्गत ऑटो डेबिट सुविधा असल्याने कर्जाचा हप्ता बँक स्वत:च कपात करून तो अदा करेल. यासाठी हप्ता किंवा बिल भरण्याची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही. या सुविधेमुळे होणार्‍या फायद्याचा विचार केल्यास फसवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. कारण पंधरा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढण्याचा कोणी प्रयत्न केला, तर आपल्याला तत्काळ ओटीपी येईल. आपले कोणतेही बिल पंधरा हजारांपेक्षा अधिक नसेल, तर ओटीपी नामंजूर करू शकता. अशा वेळी बँकेकडून त्याचा भरणा केला जाणार नाही.

* मर्यादा का वाढविली?

‘ई-मँडेट’च्या माध्यमातून ऑटो डेबिटसाठी रकमेची मर्यादा वाढविण्यामागचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लोकप्रियता. सध्याच्या काळात सुमारे 6 कोटी नागरिकांकडून या सुविधेचा लाभ घेतला जात आहे. याशिवाय तीन हजारांपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थादेखील या सुविधेशी जोडल्या गेल्या आहेत. या आर्थिक कंपन्या या सुविधेच्या माध्यमातून बिल वसूल करतात किंवा भरतात.

अपर्णा देवकर

Back to top button