वाहन विम्याचा दावा करताय? जाणून घ्या माहिती | पुढारी

वाहन विम्याचा दावा करताय? जाणून घ्या माहिती

कोणतेही वाहन खरेदी करताना त्याचा विमा उतरविणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. स्कूटर, मोटारसायकल, मोटार, बस, ट्रक एव्हढेच नाही; तर इंडस्ट्रीयल मशिनरीचे काम करणार्‍या जेसीबी, डंपर यांचा देखील विमा उतरवणे गरजेचे आहे.

एखादा व्यक्ती गाडी चालवत असेल आणि त्याची विम्याची मुदत संपली असेल, तर वाहतूक पोलिस अशा वाहनांवर दंड बसवून पेनल्टी देखील वसूल करू शकतात. त्यामुळे वाहन खरेदी करताना विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे.

वाहनविक्री करणार्‍या डिलरलादेखील विम्याशिवाय गाडीची विक्री न करणे सांगण्यात आले आहे. अर्थात वाहन खरेदी करताना नागरिकाला विम्यापोटी बरीच रक्कम भरावी लागते. पूर्वी गाडी खरेदी केल्यानंतर बराच काळ नागरिक विमादेखील उतरवत नव्हते. त्यामुळे सरकारला शोरूम संचालकांंना गाडीचा विमा उतरविणे आवश्यक करावे लागले.

* झीरो डेप्रीसिएशन पॉलिसी खरेदी करा

झीरो डेप्रीसिएशन विमा पॉलिसीतंर्गत दाव्यानुसार गाडीचे मूल्य निश्चित करताना डेप्रीसिएशनला आधार धरलेले नाही. त्यामुळे यात दाव्याची पूर्ण रक्कम लाभार्थ्याला मिळते. कोणत्याही दुर्घटनेत किंवा अन्य कारणांमुळे गाडीचे नुकसान होत असेल, तर विमा कंपनी दाव्याची संपूर्ण रक्कम नियमानुसार देते. त्याचबरोबर अन्य गाडीच्या नुकसानीचे वहन देखील करते.

* गाडी चालवताना स्टंटबाजी नको

वाहन चालवताना बरीच मंडळी वेग कमी-जास्त करतात. अ‍ॅक्सेलेटर वाढवतात किंवा कमी करतात. सीट बेल्टकडे, हेल्मेटकडे दुर्लक्ष करतात. बाईक चालकदेखील काहीवेळा स्टंटबाजी करतात. बसमध्ये, मोटारीत ओव्हरलाडिंग प्रवासी असतात. विरुद्ध दिशेने गाड्या चालवल्या जातात. रेल्वे फाटक बंद असतानाही तेथून गाडी करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे कारण वाहन दुर्घटनेच्या वेळी विमा दावा करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास दावा फेटाळून लावला जातो.

* गाडीत अ‍ॅक्सेसिरीज लावण्याची सूचना

अनेक मंडळी आपल्या गाडीत फॉग लाईट, रुफ विंडो, सीएनजी किट, विशेष प्रकारचे बंपरही लावतात. परंतु विमा कंपनीनुसार या चुकीच्या गोष्टी आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी गाडीत असतील तर त्याची सूचना कंपनीला द्यावी आणि त्याचा विम्यात समावेश करून घ्यावा. अशा वेळी कंपनीकडून कवचही मिळू शकते किंवा मनाईदेखील करू शकते. विमा उतरवताना गाडीत असलेल्या वस्तूंवरच कंपनी कवच देत, हे लक्षात ठेवा.

* पोलिसांना सूचना द्या

महामार्गावर गाडीला अपघात झाल्यास तत्काळ 112 वर पोलिसांना सूचना द्या. आवश्यक मदतीबरोबरच त्याची पावती आणि तक्रारीचा क्रमांकही घ्यावा. या गोष्टी दावा करताना महत्त्वाच्या ठरतात. चांगली मन:स्थिती असेल तर अपघातग्रस्त वाहनाचा फोटो किंवा व्हिडीओ काढा. तसेच विमा कंपनीला माहिती देण्याचा प्रयत्न करा.

* अधिकृत सेंटरवर सर्व्हिसिंग करा

वाहनाला अपघात झाला तर वाहनाची दुरुस्ती कंपनीच्याच सर्व्हिसिंग सेंटरवर करावी. जर एखाद्या खासगी गॅरेजमध्ये गाडी घेऊन गेलात आणि विम्यासाठी दावा केला, तर तो मंजूर होईलच याची खात्री नाही.

* हे गरजेचे

विमा घेण्यापूर्वी विमा कंपन्यांची पडताळणी करा. कार्यप्रणाली, हप्ता, दावा निपटारा करण्यासाठीचा वेळ आदींची माहिती जाणून घ्या. याशिवाय दुर्घटना किंवा वाहन चोरी यासारख्या प्रकरणात दाव्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची माहिती जाणून घ्या. सर्व गोष्टीसाठी कंपनी किंवा प्रतिनिधी किंवा विमा सल्लागारांवर ढकलून मोकळे राहू नका.

जगदीश काळे

Back to top button