जीएसटी संकलनात वाढ, अर्थव्यवस्थेला बाळसे | पुढारी

जीएसटी संकलनात वाढ, अर्थव्यवस्थेला बाळसे

गेल्या आठवठ्यात अर्थव्यवस्थेच्या सुद़ृढता सांगणार्‍या अनेक बातम्या होत्या. त्यातील महत्त्वाची एक पहिली बातमी म्हणजे भारताचा अमेरिकेच्याबरोबर होणारा आयात-निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे चीनच्या बरोबर होणारा व्यापार दुसर्‍या क्रमांकावर गेला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान अमेरिका व भारताचा आयात-निर्यात व्यापार 119.42 अब्ज डॉलर्सच्या वर गेला आहे. त्यापूर्वी कोरोनाच्या काळात 2020-21 हा आकडा 80.51 अब्ज डॉलर्स इतका होता. भारताकडून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अमेरिकेला 51.62 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 76.11 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. अमेरिकेतून भारतात 29 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 46.31 अब्ज डॉलर्सची आयात झाली. डॉलर-रुपया विनिमय दर 77.51 रु. झाला आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉ डोमेस्टिक प्रॉडक्ट – जीडीपी) वाढीचा दर 8.7 टक्क्याने वर आहे. ‘कोरोना’च्या दुसर्‍या व तिसर्‍या लाटेचा परिणाम म्हणावा तितका झाला नाही. अर्थव्यवस्थेने बाळसे धरल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांपैकी पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी या बँकांनी किमान व्याजदर, रेपो दर वाढल्यानंतर वाढवले आहेत.

वस्तू सेवा कराचा (जीएसटी) मे महिन्यातील महसूल 1.41 लाख कोटी रुपये झाला आहे. मार्च आणि एप्रिल 2022 या दोन महिन्यांत वस्तू सेवा कराचे उत्पन्न वाढलेले दिसले. गेल्या वर्षीच्या (2021 च्या) मे महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या मे महिन्यात हे कर संकलन 44 टक्क्याने वाढले आहे. करसंकलन वाढले की वित्तीय तुटीच्या बागूलबुवाचे भय वाटत नाही.

गेले काही दिवस डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया स्थिरावून 20 पैशांनी वाढलेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात, ब्रेंट क्रूडचा दर प्रती बॅरल 117.73 डॉलरच्या वर गेला आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून मंगळवारी 31 मे रोजी 1003.56 कोटी रुपयांची भारतीय शेअर बाजारात समभागांची विक्री झाली. संशोधनाला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी राजस्थानमधील ‘महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान’ विद्यापीठामध्ये देशातील पहिल्या कृषी ड्रोनचे अनावरण झाले. भारतीय कृषी विभागासाठी हे एक पुढचे, उत्साहवर्धक पाऊल आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) जानेवारी 2022-21 मार्च 2022 या तिमाहीत 2893 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आयुर्विमा महामंडळाने आपल्या समभागांची विक्री केली होती. या समभागावर, प्रतिभाग 1.50 रुपया (15 टक्के) लाभांश जाहीर केला आहे.

भारत व ग्रेट ब्रिटनमध्ये लवकरच मुक्त व्यापार (Free Trade) सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे नुकतेच ग्रेट ब्रिटनच्या महत्त्वाच्या दौर्‍यावर होते. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या मीटिंगसाठी त्यांचा हा दौरा होता. त्यात त्यांनी दोन्ही देशात लवकरच मुक्त व्यापार सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. ही त्यांची बैठक 13 जूनला होणार आहे.

जगातील सर्व देशात मुक्त व्यापार असावा, अशी या फोरमची संकल्पना आहे. ब्रिटन ही भारताची, आयात-निर्यातीसाठी मोठी व्यापारपेठ आहे. काही शतकांपूर्वी ब्रिटनचे राज्य भारतावर होते. तेव्हापासून या देशातील व्यापार मोठ्या प्रमाणावर होत आहे. कॅनडा व ब्रिटनमध्ये पिकांचा हंगाम आता सुरू होईल. कॅनडा मोठ्या प्रमाणावर जगातील गव्हाची निर्यात करतो. मुक्त व्यापारामुळे गव्हावरील कर कमी झाले व तो स्वस्त झाला तर त्यात आपलाही फायदा होईल.

भारतातही गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ब्रिटनबरोबर, पूर्ण मुक्त व्यापार करार दिवाळीपर्यंत होईल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील होऊ घातलेल्या चर्चेनंतर या कराराबाबत ऑक्टोबर महिन्यात स्पष्टता येईल. शेअर बाजारात सध्या नवीन फ्ल्यूओराईड, भारती एअरटेल व टिमकेन यांच्यावर लक्ष केंद्रित करणे इष्ट ठरेल. यापैकी ‘टिमकेन’ या कंपनीची चकाकता हिरा म्हणून विस्तृत माहिती दिली आहे.

Back to top button