Nifty and Sensex : अर्थवार्ता | पुढारी

Nifty and Sensex : अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 629.10 अंक व 2041.96 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 15782.15 अंक व 52793.62 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी 3.83 टक्के व सेन्सेक्स (Nifty and Sensex) 3.72 टक्क्यांनी कोसळला. या सप्ताहात रुपया चलनाने डॉलरच्या तुलनेत जबर घसरण दर्शवली. शुक्रवारी रुपया 5 पैसे कमजोर होऊन आजपर्यंतच्या सर्वाधिक कमकुवत पातळवीर म्हणजेच 77.55 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाला. नजीकच्या काळात महागाईदर वाढण्याच्या शक्यतेने 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या भावाने देखील 7.30 टक्क्यांची पातळी ओलांडली.

* देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. गतवर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत बँकेचा निव्वळ नफा 41 टक्के वधारून 9113.53 कोटींवर गेला. निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 15 टक्के वधारून 31,198 कोटी झाले. तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत नेट इंटरेस्ट मार्जिन 3.11 टक्क्यांवरून 3.12 टक्के झाले. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 1.50 टक्क्यांवरून 1.02 टक्के झाले. तसेच एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाणे 4.98 टक्क्यांवरून 3.97 टक्के झाले. यासाठी कराव्या लागणार्‍या तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स)सुद्धा घट होऊन तरतुदीची रक्कम 11,051 कोटींवरून 7,237 कोटींपर्यंत खाली आली.

* स्टेट बँकेनंतर दुसर्‍या क्रमांकाची मोठी सरकारी बँक, बँक ऑफ बडोदाचे आर्थिक वर्ष 2021-22 चे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. मागील वर्षीच्या 1046.50 कोटींच्या तोट्याच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत 1778.77 कोटींचा निव्वळ नफा. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न तब्बल 21.18 टक्के वाढून 7106.62 कोटींवरून 8611.67 कोटी झाले. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 3.09 टक्क्यांवरून 1.72 टक्क्यांपर्यंत खाली आले, तसेच एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 8.87 टक्क्यांवरून 6.31 टक्क्यांवर आले. यासाठी कराव्या लागणार्‍या तरतूद रकमेत (प्रोव्हिजन्स) मात्र वाढ झाली. तरतूद रक्कम 3555 कोटींवरून 3736 कोटी झाली.

* एप्रिल महिन्यात भारताची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत 30.7 टक्के वधारून 40.2 अब्ज डॉलर्स झाली. आयातदेखील 31 टक्के वधारून 60.3 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. यामुळे एकूण व्यापारतूट 20.1 अब्ज डॉलर्स इतकी झाली. आयात वाढीमध्ये प्रमुख वाटा हा खनिज तेलाचा तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि केमिकल्सचा आहे. खनिज तेलाच्या आयात किमतीत सर्वाधिक (128 टक्के) वाढ झाली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये (72 टक्के) तर केमिकल्सच्या आयात किमतीत (28 टक्के) वाढ झाली.

* एप्रिल महिन्यात भारतातील किरकोळ महागाईदर (रिटेल इन्फ्लेशन) मागील 95 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 7.79 टक्क्यांवर पोहोचला. यामुळे रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाईदर 2 ते 6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट सलग चौथ्या महिन्यात हुकले. त्यामुळे जून महिन्यात पुन्हा एकदा व्याजदरवाढ होऊन कर्जे महाग होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेतदेखील किरकोळ महागाईदर 8.3 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

* देशातील महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणारी कंपनी एल अँड टीचा आर्थिक वर्ष 2021-22 चा चौथ्या तिमाहीचा नफा 10 टक्के वधारून 3621 कोटी झाला. महसुलातदेखील 10 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 52,851 कोटींवर पोहोचला. कामाच्या ऑडर्समध्ये तब्बल 46 टक्क्यांची वाढ होऊन ऑडर्स 73941 कोटींवर पोहोचल्या.

* 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा मोटर्सचा तोटा मागील वर्षी असणार्‍या 7585 कोटींवरून 992 कोटींवर खाली आला. महसूल 88,628 कोटींवरून 78439 कोटी झाला.

* होलसीम या आंतरराष्ट्रीय कंपनीचे भारतीय उद्योग एसीसी आणि अंबुजा सिमेंट खरेदी करण्यासाठी जेएसडब्लू समूहाने 7 अब्ज डॉलर्सची बोली लावली. समूहाचे प्रमुख जिंदाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंदाल समूह स्वतःचे 4.5 अब्ज गुंतवणार तसेच उर्वरित 2.5 अब्ज इतर खासगी गुंतवणूकदारांमार्फत उभे करणार. या एसीसी व अंबुजा सिमेंटवर ताबा मिळवण्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपची अल्ट्राटेक कंपनी, मित्तल यांची आर्सेलर मित्तल तसेच अदानी उद्योग समूहदेखील स्पर्धेत उतरला आहे.

* देशातील महत्त्वाची आयटी कंपनी ‘टेक महिंद्रा’चा 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 12.12 टक्के वधारून 1545.3 कोटी झाला. एकूण महसूल 11451 कोटींवरून 12116 कोटींपर्यंत पोहोचला. (Nifty and Sensex)

* बजाज फिनसर्व्ह कंपनीचे प्रमुख संजीव बजाज यांची भारतीय उद्योग महासंघ ‘सीआयआय’ या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड. टाटा स्टीलचे टी.व्ही. नरेंद्रन यांच्याकडून बजाज यांनी पदभार स्वीकारला.

* देशातील सर्वात मोठी रंगाचे उत्पादन करणारी कंपनी ‘एशिअन पेंट’चा मार्च तिमाहीचा नफा 874.05 कोटी. मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत किरकोळ 5 कोटींची वाढ. वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती दुपटीने वाढल्याने रंगांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे महसुलात तब्बल 20 टक्क्यांची वाढ होऊनदेखील नफा किरकोळ वाढला.

* अ‍ॅक्सिस म्युच्युअलफंडाचे विरेश जोशी व दीपक अग्रवाल हे फंड मॅनेजर निलंबित. म्युच्युअल फंडामधील ध्येयधोरणांचा व व्यवहारांच्या माहितीचा वापर वैयक्तिक कारणांसाठी. किमतीमध्ये ढवळाढवळ करून प्रभाव टाकण्यासाठी वापरला असल्याचा आरोप. यालाच ‘फ्रंटरनिंग’ असे म्हटले जाते. ‘सेबी’च्या नियमानुसार असे करणे गुन्हा आहे. ‘सेबी’ने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले.

* टाटा सन्सने एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ‘कॅम्पबेल विल्सन’ यांची नियुक्ती केली.

* भारताची परकीय गंगाजळी 6 मे रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर 1.774 अब्ज डॉलर्सनी घटून 595.954 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button