नवीन वर्षात कुटुंबाची अर्थव्यवस्था कशी मजबूत कराल!             | पुढारी

नवीन वर्षात कुटुंबाची अर्थव्यवस्था कशी मजबूत कराल!            

अनिल पाटील

अनेक जण नवीन वर्षात नवनवीन संकल्प करतात पण हे सारे संकल्प व्यक्‍तिगत असतात. तसे कुटुंबाच्या सर्व  सदस्यांनी मिळून आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल अन् कुटुंबाचे भवितव्य उज्ज्वल होईल, सुख-समृद्धी वर्षानुवर्षे लाभेल, पिढ्यान्  पिढ्या आर्थिक शिस्त लागेल, त्यासाठी काही क्रांतिकारी काटकसरीचे निर्णय कुटुंबप्रमुख या नात्याने तुम्हास घ्यावे लागतील. सर्वप्रथम कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून विस्तृतपणे आर्थिक साक्षरतेचे धडे घ्यावे लागतील. त्यानंतर खालील प्रश्‍नांची उत्तरे तुम्हास शोधावी लागतील. 

आपल्या कुटुंबातील दरमहाचे उत्पन्‍न किती आहे?

 दरमहाचा होणारा आवश्यक व अनावश्यक गोष्टींवरील खर्च किती व कसा होतो? 

 कुटुंबात येणार्‍या एकूण उत्पन्‍नाच्या किती टक्के बचत होते?

 आपल्या कुटुंबावर येणारे आपत्तीचे व्यवस्थापन कसे असावे?

 त्यामधून किती टक्के रक्‍कम निरनिराळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतो?

 गुंतवणूक  पोर्टफोलिओचा आढावा किती दिवसांतून घेतला जातो?

 आपल्या एकूण  पोर्टफोलिओचा वृद्धीदर किती आहे? 

  वृद्धापकाळी नियमितपणे  पैशाचा प्रवाह कसा येईल?

प्रत्येकजण दरमहाच्या येणार्‍या उत्पन्‍नातून काहीना काही कुठेतरी गुंतवणूक करीत असतोच. असे मोघमपणे केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम हे नुकसानकारक ठरतात, हे भविष्यात पुढे गेल्यावर लक्षात येते. उदा. दीर्घकाळासाठी पारंपरिक विमायोजना मुदत संपल्यानंतर लक्षात येते की परतावा खूपच कमी मिळाला आहे. प्रत्येकांनी आपल्या आयुष्यात  पैसा वाढविणसाठी वेळ देणे महत्त्वाचे असते म्हणून योग्यवेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ही बाब फार महत्त्वाची ठरते. 

करिअरची सुरुवात झाल्याबरोबर आलेल्या दरमहाच्या एकूण उत्पन्‍नापैकी 35 टक्के रक्‍कम बचत करून योग्य ठिकाणी इक्‍विटीसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास निश्‍चितपणे तुम्ही श्रीमंतकडे वाटचाल करीत आहात असे समजा.

आपल्या करिअरची सुरुवात झाल्यावर  10 टक्के, 15 टक्के बचत करीत असाल अन् पारंपरिक गुंतवणूक करीत असाल तर मात्र भविष्यात  कुटुंबाची अर्थव्यवस्था जेमतेम असणार आहे. 

जर मिळणारे उत्पन्‍न अपुरे असून खर्च मोठा आहे, पैसा शिल्‍लक राहत नाही अशा विचाराने जगत असाल तर मात्र आपले कुटुंब भविष्यात आर्थिक आरिष्टात अडकणार. कर्जे, उधारी, उसनवारी प्रसंगाला तोंड द्यावे लागणार, हे निश्‍चित आहे. 

पंचविशी-तिशीतच योग्य वेळ असते. फॅमिली फायनान्स मॅनेजमेंटमधील महत्त्वाचे मुद्दे, महागाईचे  परिणाम, व्यक्‍तिगत आर्थिक जबाबदारी, जीवनातल्या विविध टप्प्यांवरील आर्थिक गरजा व ध्येय धोरणे,  पैशाची बचत अन् गुंतवणूक यातील फरक, कुटुंबाचे आपत्ती व्यवस्थापन कसे हवे, गुंतवणुकीच्या निरनिराळ्या मालमत्तेमधील गुंतवणूक व विविध योजना कसे कार्य करतात, याबाबत सविस्तर ज्ञान घेणे गरजेचे असते. 

आजमितीस तरुणांची मानसिकता नेमक उलटी दिसते कारण ज्या काळात मिळवित्या मुलांवर जबाबदार्‍या कमी असतात, खर्चाच्या वाटा कमी असतात, घराची जबाबदारी नसते किंवा अनेकांवर कमी असते, नवीन नोकरी असते, हातात नव्याने पैसा येऊ लागलेला असतो  पण त्या पैशाचे रोपटे नीट वाढीस लावण्याचे  प्रशिक्षण मात्र नसते. नवी गाडी, महागडा मोबाईलचे, इ. एं. आय व मित्र मैत्रिणींमधील पार्ट्या अशा गोष्टींवर पैसा खर्च होतो अन् भविष्याची दिशा चुकत जाते. 

 एखादी गाडी मासिक हप्त्यावर घेण्यापेक्षा जर  पहिली पाच वर्षे गाडी घेण्यासाठी आपण दरमहा हप्त्याने सिपमध्ये गुंतवणूक करा.

 बचत व गुंतवणूक यातील फरक जाणून घ्या.

 मुदत निरनिराळ्या क्षेत्रांतील महागाई दराचा आढावा घ्या.

 करिअर सुरू झाल्याबरोबर रिटायरमेंटसाठी तरतूद करा.

 आपल्या वार्षिक उत्पन्‍नाच्या पंधरापट आयुर्विमा निव्वळ जोखीमेचा आयुर्विमा घ्या. त्याबरोबर अपघाती विमा व वैद्यकीय विमा घ्या. या सर्वांसाठी 8 टक्केपेक्षा जास्त खर्च करू नका.

 आपल्या कुटुंबाचे अल्प मध्यममुदत  व दीर्घकाळातील गरजांचा आराखडा तयार करा. गरजांचे प्राधान्यक्रम ठरवा. 

  दीर्घकाळासाठी इक्‍विटी मालमत्तेमध्ये व अल्पकाळासाठी डेट कर्ज मालमत्तेमध्ये गुंतवणूक करा.

 निरनिराळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीचा दर तिमाहीस आढावा घ्या. 

आपल्या पैशाने पैशाला जोडाल तर आपण स्वयंपूर्ण बनाल, श्रीमंत व्हाल. यासाठी काही अनावश्यक खर्चाचे नियम स्वतःवर व कुटुंबावर जबरदस्तीने घालून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून चांगल्या टक्क्याच्या बचतीची आणि गुंतवणुकीबाबत अत्यंत बेसिक माहिती अंगीकारली तर कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला शिस्त लागेल. तुमचाही पैसा वाढीस नक्‍की लागेल. तुम्ही स्मार्ट ठराल अन् श्रीमंत नक्‍की व्हाल!

(एस पी वेल्थ मॅनेजमेंट, कोल्हापूर)

Back to top button