आता शेअरबाजार अस्थिर असेल… | पुढारी | पुढारी

आता शेअरबाजार अस्थिर असेल... | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मतदान सुमारे 6 आठवड्यांमध्ये 7 टप्प्यात होईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक आणि उदयनराजे भोसले यांची नावे जाहीर झाली आहेत. बारामती, कोल्हापूर व सातारा येथून अनुक्रमे ते उमेदवार असतील.

मुथुट फायनान्स सध्या 590 ते 600 च्या पातळीत मिळत आहे. रोज 20 लक्षपेक्षा जास्त शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर 13.43  पट पडते. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा उच्चांकी भाव 612 रुपये होता तर नीचांकी भाव 356 रुपये होता. शेअर भरपूर वर गेल्यामुळे त्याची विक्री करणे इष्ट ठरेल.

बजाज फायनान्सही वाढून आता 2860 रुपयांवर गेला आहे. नजीकच्या भविष्यात हा शेअर 3000 रुपयांची पातळी ओलांडेल.

निवडणुकांचे वातावरण सुरू झाल्यामुळे शेअरबाजार सतत स्थिर असणार नाही. शुक्रवारी 15 तारखेला निर्देशांक 37993 पर्यंत चढला होता. निफ्टी 11415  पर्यंत वर गेला आहे. वाढणार्‍या शेअर्समध्ये बजाज फिनान्स, बजाज फिनसर्व्ह, येस बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम वगैरे शेअर्स आहेत. विदेशी गुंतवणूक सतत वाढत असल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण दिसते. थ्री आय इन्फोटेक दहा टक्क्यांनी वाढला आहे. हिंद पेट्रोलियम सध्या 268 रुपयाला उपलब्ध आहे. हेग 2208 रुपयांपर्यंत सध्या उपलब्ध आहे. हेगच्या पुनर्खरेदीबाबतची पत्रे भागधारकांना  पाठवली गेली आहेत. पुनर्खरेदी जास्त भावाने होणार असल्यामुळे या देकाराचा स्वीकार करावा. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन हाही शेअर सध्या विकत घेण्यासारखा आहे. दक्षिण भारतातल एन्‍नोर येथे उभारलेल्या बंदरात द्रवरूप नैसर्गिक वायू (Liquefied Natural Gas-LNG) ने भरलेले दुसरे जहाज मे मध्ये येणार आहे. कामराजार या बंदरात ते येईल. या बंदराची एकूण क्षमता दरवर्षी 50 लक्ष टन वायू आयात करण्याची आहे. चेन्‍नईजवळ हे बंदर उभे आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात असाच वायू आयात केला होता. 5150 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेले हे बंदर भारतात  पाचव्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूत नैसर्गिक वायू या बंदराद्वारे पुरवला जातो. ऊर्जानिर्मिती करणारे कारखाने आणि खतांचे कारखाने, तसेच अन्य औद्योगिक कारखान्यांना त्याचा उपयोग होईल. 19 मार्चला भरणार्‍या संचालकांच्या सभेत (उद्या) कंपनी 2018-19 वर्षासाठी अंतरिम लाभांश जाहीर करणार आहे. 

भारत पेट्रोलियमचा शेअरही सध्या 396 रुपयाला उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात हा शेअर भरपूर वाढला आहे. पुढील काही महिन्यात कंपनी अपरिवर्तनीय रोख्यांची विक्री खासगीरित्या करून 2000 कोटी रुपये उभे करणार आहे. अशा कर्जरोख्यांची विक्री कंपनीने 100 कोटी रुपयांपर्यंत नुकतीच केली होती. कंपनीने फेब्रुवारीतच शेअरमागे 11 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. 

पेट्रोलचे उत्पादन करणारी ओ. एन. जी. सी. कंपनीने डिसेंबर 2018 च्या तिमाहीत चांगला नफा मिळवला आहे. डिसेंबर  2017 तिमाहीपेक्षा 2018 डिसेंबर तिमाहीत नक्‍त नफा 65 टक्क्याने वाढून 8263 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. डिसेंबर 2017 तिमाहीचा नक्‍त नफा 5614 कोटी रुपये होता. कंपनीने नुकताच 5.25 रुपयाचा लाभांश दिला आहे. कंपनी 159 रुपये भावाने भागधारकांकडून शेअर्सची पुनर्खरेदी करणार होती. त्यासाठी 4062 कोटी रुपये लागणार होते. 

डिसेंबर 2018 च्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने 10251कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये तो 9516 कोटी रुपये होता. 10000 कोटी रुपयांच्यावर नफा मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. डिसेंबर 2018 तिमाहीसाठी कंपनीची विक्री 1,71,336 कोटी रुपयांची होती. गेल्या वर्षीचा आकडा 1,56,291  कोटी रुपये होता. 

आयुष्मान भारतच्या योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बिल गेट्स यांनी कौतुक केले आहे. या योजनेतून 10 कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबांना स्वस्त दराने वैद्यकीय सेवा पुरविली जाणार आहे. या योजनेला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. येत्या निवडणुकीत मोदी सरकारला त्याचा फायदा होईल. दर दिवशी सुमारे 500 कुटुंबे याचा फायदा घेतात. 

 

Back to top button