८० सी व्यतिरिक्‍त सवलतीचे पर्याय  | पुढारी

८० सी व्यतिरिक्‍त सवलतीचे पर्याय 

राकेश माने

चालू आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत आहे. आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी आणि प्राप्तीकरात सवलत देणार्‍या योजनेत पैसा टाकण्यासाठी खूपच कमी वेळ राहिला आहे. जर आपण प्राप्तीकरचा लोकप्रिय कायदा कलम 80 सी नुसार दीड लाख रुपयांची सीमा पार केली असेल तरीही चिंता करण्याची गरज नाही. आपल्याला दुसर्‍या कलमाच्या मदतीने सवलत प्राप्त करू शकता. अशाच काही सवलत देणार्‍या प्राप्तीकर कायद्याची माहिती जाणून घेऊ.

कलम 80 डी (आरोग्यावर खर्च) : प्राप्तीकर कायदा कलम 80 डीनुसार आपल्या पती/पत्नी आणि मुलांच्या हेल्थ इन्शुरन्सवर 25 हजार रुपयांपर्यंत सवलत प्राप्त करू शकतो. आई-वडिलांच्या पॉलिसीवर देखील 25 हजारांपर्यंत सवलत मिळवू शकता. जर आर्ई-वडील अतिज्येष्ठ असतील तर 50 हजारांपर्यंत सवलत मिळू शकते. 

कलम 80 इ (शिक्षण खर्च) : आपण स्वत:, जोडीदार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोनच्या व्याजावर प्राप्तीकर कलम 80 ई नुसार सवलतीचा दावा करू शकता. या कायद्यानुसार आपल्याला सवलत मिळवण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. 

कलम 80 जीजी (भाड्यावर सवलतीचा दावा) : जर आपण नोकरी करत असाल आणि कंपनीकडून मिळणार्‍या वेतनात एचआरए समाविष्ट नसेल तर आपण या रक्‍कमेवर प्राप्तीकर कलम 80 जीजीनुसार करसवलतीचा दावा करू शकता. 

80 सीसीडी (निवृत्त  योजना) : एनपीएस  म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम यात गुंतवणूक करण्यासाठी प्राप्तीकरात सवलत मिळते. प्राप्तीकर कलम 80 सीसीडी (1बी) नुसार अतिरिक्‍त 50 हजारांची गुंतवणूक करून आणखी सवलतीसाठी दावा करू शकतो. 

80 डीडी (अपंगत्वासाठी सवलत) : जर आपल्या कुटुंबात एखादी व्यक्‍ती अपंग असेल तर त्याच्यावरील खर्चासाठी प्राप्तीकरात सवलतीसाठी दावा करू शकतो. कलम 80 डीडीनुसार 75 हजार रुपयांपर्यंत केलेल्या खर्चावर सवलतीसाठी दावा करता येतो. 

कलम 80 टीटीए : बँकेत बचत खात्यावर मिळणार्‍या व्याजावर आपण प्राप्तीकर कलम 80 टीटीनुसार सवलतीसाठी दावा करू शकता. आयटीआर भरताना आपण या रक्‍कमेला अन्य स्रोतांपासून उत्पन्नच्या रकान्यात सामील करून सवलत मिळवू शकता. त्याची मर्यादा दहा हजारांपर्यतच आहे. 

कलम 80 जी, 80 जीजीए आणि 80 जीजीसीमध्ये सुविधा : प्राप्तीकर कलम 80 जी अंतर्गत विविध फंड्समधील गुंतवणूक किंवा मंदिरास दानधर्म केल्यास 50 ते 100 टक्क्यांपर्यंत करसवलतीचा लाभ घेऊ शकतो. याशिवाय आपण कलम 80 जीजीसी अंतर्गत कोणत्याही राजकीय पक्षाला दिलेल्या निधीतून करसवलतीचा लाभ मिळवू शकतो. सरकारकडून अनुदानित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना दिलेल्या निधीवर कलम 80 जीजीएतंर्गत कर सवलतीचा लाभ मिळवू शकतो.  

कलम 80 टीटीबी : जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर बँकेत बचत खाते, पोस्ट ऑफिसमधील बचत, टर्म डिपॉझिट आणि रिकरिंग अकाऊंटमध्ये जमा असलेल्या उत्पन्नावर प्राप्तीकर कलम कायदा 80 टीटीबीनुसार सवलतीसाठी दावा करू शकतो. यात कमाल मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे. 

 

Back to top button