जामीनदार होताना… | पुढारी | पुढारी

जामीनदार होताना... | पुढारी

राकेश माने

भावंडांना कर्जाच्या रूपाने आर्थिक मदत करणे नातेसंबंधात तणाव निर्माण करण्याचे कारण बनू शकते. अशा स्थितीत जर आपले भाऊ किंवा बहीण जामीनदार होण्यास आपल्याला आग्रह करत असेल तर काय करावे? एक जुनी म्हण आहे – बाप बडा न भैया, सबसे बडा रुपय्या.  कदाचित जामीनदार होताना आपल्याला नुकसान दिसत नसेल. परंतु कालांतराने ते कर्ज आर्थिक अडचणीत आणणारे ठरू शकते. दुसरे म्हणजे बहीण किंवा भावाला किंवा नातेवाईकाला थेट नकार देता येत नाही. तरीही जामीनदार होण्यापूर्वी काही बाबी समजून घेतल्या पाहिजेत. 

जामीनदाराची जबाबदारी कोणती?

आपण कोणत्या प्रकारची हमी घेतो किंवा कोणत्या प्रकारे जामीनदार राहता यावर आपली जबाबदारी निश्‍चित होत असते. जर आपण आर्थिक जामीनदार राहत असेल तर आपल्याला त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांनी कर्ज वेळेवर फेडले तरी त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच राहील. जर नॉन फायनान्शियल जामीनदार असाल तर आपल्याला बँक आणि भावंड यांच्यात संवादाची कडी म्हणून भूमिका बजवावी लागेल. कर्जदार बँकेच्या क्षेत्रात राहत नसेल तेव्हा अशा कर्जप्रकरणात राहणार्‍या जामीनदाराला नॉन फायनान्शियल असे म्हणतात. याचाच अर्थ, भाऊ किंवा बहीण वेळेवर कर्ज फेडत नसतील आणि बँक त्यांच्याशी संपर्क साधण्यास अपयशी ठरत असेल तर त्यांचा शोध घेण्यासाठी बँक आपली मदत घेईल. एवढेच नाही तर थकबाकी भरण्यासही आपल्याला सांगितले जाईल. जर आपण फायनान्शियल गॅरेंटर असाल तर आपल्याला संपूर्ण कर्ज फेडावे लागेल. परिणामी आपल्या नातेसंबंधात ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. 

आर्थिक स्थिती जाणून घ्या

भावंडांना कर्ज देण्यापूर्वी बँक जामीनदाराची मागणी करत असेल तर आपल्याला भाऊ-बहीण यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचा ट्रॅक रिकॉर्ड पाहणे गरजेचे आहे. जामीनदारावरून बँकेची वेगवेगळी पॉलिसी आहे. मात्र खराब क्रेडिट स्कोर असेल तर, आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर किंवा उत्पन्नाचे निश्‍चित साधन नसेल तर बँक अशा स्थितीत जामीनदाराची मागणी करते. म्हणूनच भाऊ किंवा बहीण यांना जामीनदार राहताना त्यांची आर्थिक स्थितीची माहिती जाणून घ्या. अन्यथा कर्ज फेडण्यासाठी सज्ज राहण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. 

क्रेडिट स्टेटसवर परिणाम

जर आपण बहीण-भावासाठी जामीनदार राहत असाल तर त्यांच्याप्रमाणेच आपला क्रेडिट रेकॉर्ड तयार होईल. कर्जदाराने वेळेवर हप्ते भरले नाही तर त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोरवर होईल. याशिवाय जर आपण 30 लाखाच्या कर्जावर जामीनदार असाल आणि नंतर थकबाकी होत असेल अन् जर 50 लाखाची गरज पडल्यास बँक 20 लाखाचेच कर्ज मंजूर करेल. यातून आपले काम बिघडू शकते तसेच बहीण-भावातील नातेसंबंधाही तणाव निर्माण होऊ शकतो. 

जबाबदारीतून मुक्‍ती

जर आपल्या हमीवर भाऊ-बहिणीने 20 वर्षांचे गृहकर्ज घेतले असेल तर जोपर्यंत आपण दुसरा जामीनदार देत नाही तोपर्यंत बँक आपल्यावरच जबाबदारी निश्‍चित करेल. आपल्या भावंडांना हप्त्यावर विमा कवच घेण्याचा सल्ला द्या. याचा फायदा म्हणजे हप्ते अडकून पडल्यास अडचण येणार नाही.

 

Back to top button