सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला, निफ्टीची दाणादाण! शेअर बाजार कोसळण्यामागे ‘हे’ ४ घटक कारणीभूत | पुढारी

सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला, निफ्टीची दाणादाण! शेअर बाजार कोसळण्यामागे 'हे' ४ घटक कारणीभूत

मुंबई; पुढारी ऑनलाईन

कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज गुरुवारी तब्बल १,१०० अंकांनी घसरला. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सची घसरण १ हजार अंकांची होती. त्यानंतर ही घसरण १,१५८ अंकांपर्यंत वाढून सेन्सेक्स ५२,९३० वर बंद झाला. तर निफ्टी ३५९ अंकांनी खाली येऊन १५,८०८ अंकांवर बंद झाला. निफ्टी गेल्या ५ दिवसांत सुमारे ५ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी पातळीवर घसरण झाली आहे

गुंतवणूकदारांचे एकूण नुकसान ३४ लाख कोटींवर….

शेअर बाजारातील आजच्या घसरणीचा गुंतवणूकदारांना ५.२६ लाख कोटींचा फटका बसला आहे. ११ एप्रिलपासून गुंतवणूकदारांचे एकूण नुकसान ३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बीएसई भांडवली बाजार मुल्य मागील सत्रातील २४६.३१ लाख कोटी रुपयांवरून २४१.०५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ११ एप्रिल रोजी BSE भांडवली बाजार मुल्य २७५.१७ लाख कोटी इतके होते.

आर्थिक वाढ मंदावण्याची भिती….

कमकुवत जागतिक संकेतांसोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या प्रमुख निर्देशांकांमध्ये झालेली विक्री ही सेन्सेक्स घसरणीसाठी प्रमुख कारणे ठरली आहेत. सतत वाढत असलेले व्याजदर, आर्थिक वाढ मंदावण्याची भिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अतिरिक्त कडक उपाययोजनांबद्दल गुंतवणूकदार चिंतेत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मोठ्या अर्थव्यवस्थेतील महागाई शिगेला…

अमेरिकेने महागाईचा डेटा प्रसिद्ध केला आहे. त्याचे पडसद देशांतर्गत शेअर बाजारात उमटले आहेत. अमेरिकेचा सीपीआय म्हणजे कंझ्युमर्स प्राइस इंडेक्स मार्चमधील ८.५ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये ८.३ टक्क्यांपर्यंत आला आहे. आर्थिक विश्लेषकांनी कंझ्युमर्स प्राइस इंडेक्स ८.१ राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्यापेक्षा हा अधिक आहे. याचाच अर्थ असा की जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत महागाई शिगेला पोहोचली आहे.

Back to top button