वाटचाल शेअर बाजाराची... | पुढारी | पुढारी

वाटचाल शेअर बाजाराची... | पुढारी

अनिल पाटील

गत आठवडा हा जागतिक गुंतवणूकदार आठवडा म्हणून साजरा करण्यात आला. या आठवड्यामध्ये सेबी, एनएससी, बी एसइ, सीडीएसएल, एनएसडीएल, म्युच्युअल फंड कंपन्या या सर्वांच्याकडून संपूर्ण आठवडाभर गुंतवणूकदारांचे हिताचे संरक्षण करणे, त्यांना आर्थिक साक्षर करणे, त्यांच्यामध्ये गुंतवणूकविषयी जागरूकता निर्माण करणे, यासाठी मोहीम राबवली गेली. 

आपल्या देशामध्ये सेक्युरिटी बोर्ड ऑफ एक्स्चेंज इंडिया, सेबी हे नेहमीच गुंतवणूकदारांना रोखे बाजार समजायला हवा. नवनवीन योजनेची समज आली पाहिजे, यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार फार प्रभावीपणे कार्य करत आहे. गुंतवणूकदाराची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक व्हावी, त्यांचा आर्थिक विकास साधावा, हा उद्देश ठेवून सेबी गेली तीन दशकांपासून फार चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे.

गुंतवणूकदार जागृती अभियानअंतर्गत विविध ठिकाणांवरील कंपन्यांच्या वतीने नेहमी संपूर्ण देशभर कार्यक्रम होत आहेत. गुंतवणूकदारांना योग्य सल्‍ला मिळावा यासाठी सेबीने अलीकडे सेबी रजिस्टर गुंतवणूक सल्‍लगार यांची फौज निर्माण केली आहे. NISM INVESTMENT ADVISOR 1,2 ही परीक्षा देऊन सेबी रजिस्टर गुंतवणूक सल्‍लागार होता येते. ही परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला गुंतवणूक सल्‍लागार हा शब्द वापरण्यासाठी बंदी घातली आहे. यापूर्वी कोणीही गुंतवणूक सल्‍लागार, वेल्थ मॅनेजमेंट, वेल्थ प्लानर, मनी मॅनेजर, कॅपिटल मॅनेजमेंट असे शब्द वापरून वरील परीक्षा न देता गुंतवणूकदारांना सल्‍ला देत होते. ते आता येथून पुढे चालणार नाही. यावर सेबीने कडक निर्बंध घातले आहेत.

रोखे बाजार, भांडवली बाजार, म्युच्युअल फंड, नाणे बाजार या सर्वच ठिकाणी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होईल या द‍ृष्टीने सेबी कठोर नियमावली नेहमी बनवत असते. याचा परिणाम, मागील काळात कित्येक विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या बोगस कंपन्या बंद पडलेल्या आपण पाहतो आहोत. या सेबीच्या कार्याला बर्‍यापैकी चांगले यश मिळत असलेले दिसून येते.

प्रत्येकाच्या जीवनातील पैशाचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयास अनुसरून आपल्या देशामध्ये आर्थिक व्यवस्थापनाविषयी ज्ञान कोणत्याही शालेय शिक्षणात मिळालेले नाही. आजही सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आर्थिक निरक्षरता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक रोखे बाजार, शेअर मार्केट, बाँड मार्केट, म्युच्युअल फंडपासून वंचित आहेत. परिणामी, या लोकांचा पैसा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होत आहे. आज आपल्या देशाच्या 130 कोटी जनतेपैकी फक्‍त 4.76 कोटी इतकी शेअर मार्केटमध्ये डिमॅट अकाऊंट काढलेले खातेदार आहेत.  एकूण लोकसंख्येच्या तुलनेने भांडवली बाजारात गुंतवणूक करणार्‍याची संख्या 4% इतकीच आहे. ही संख्या फारच कमी आहे. देशात मंदी असूनही आज भारतीय   शेअर मार्केटमधील सेन्सेक्स उच्चतम पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 41 वर्षांत आपल्या देशाने अल्पकालीन सरकार, दोन  पंतप्रधानांची हत्या, जागतिक मंदी आणि आर्थिक घोटाळे पाहूनही खालीलप्रमाणे शेअर मार्केटची वाटचाल वरच्या दिशेने चालूच आहे.

* 1979 —-100 निर्देशांक चालू झाला.

* 1985 —-400 झाला. (प्रथम चारपट होण्यासाठी सहा वर्षे लागली.)

* 1991  —- 1600 निर्देशांक झाला. (दुसर्‍या वेळी चार चार पट होण्यासाठी सहा वर्षे लागली.)

* 2004 —- 6400 झाला. (तिसर्‍या वेळी चारपट होण्यासाठी 13 वर्षे लागली.)

* 2014 —- 25600 निर्देशांक झाला. (चौथ्या वेळी चारपट होण्यासाठी दहा वर्षे लागली.)

कोरोना 2020 साली महामारीच्या  काळात जानेवारी 2020 मधील 41565/- उच्च पातळीवरून तो 26000 पर्यंत खाली आला होता. आज नोव्हेंबर मध्ये परत 44 हजार 500 वर पोहोचलेला आहे. कोरोनाची भीती अजून गेली नाही.संपूर्ण उद्योग धंदे अजून चालू झाले नाहीत. बाजारात मंदीचे सावट आहे. तरीही मागील सहा-आठ महिन्यांत सेन्सेक्स 69% नी वाढला आहे. मागील 41 वर्षांत 1979 पासून 100 चा निर्देशांक आज 44 हजारांपर्यंत पोहचला आहे. या निर्देशांकाने सरासरी परतावा वार्षिक चक्रवाढ 16% दिलेला आहे. 1979 पासून दिलेला शेअर बाजारच्या निर्देशांकाच्या तुलनेत इतर खालील मालमत्तेमध्ये केलेल्या गुंतवणुकीत फारच कमी प्रमाणात परतावा दिला आहे.

महागाई 6.92% वाढली आहे.

सोने 9.28% टक्के वाढलेले आहे   चांदी 7.92% नी वाढलेली आहे. 

बँक एफडी 8.62% वाढले आहे.

पीपीएफ 9.40 टक्के वाढले आहे.

शेअर मार्केटने 16% परतावा दिला आहे.

आजअखेर देशात तीन ते चार टक्के लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रचंड फायदा मिळविला आहे. शेअर मार्केट ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. अल्पकाळासाठी केलेली गुंतवणूक ही  जोखमीची असते. असे असूनही पारंपरिक विमा योजनेत 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करतात, 5 – 6% परतावा घेतात अन् शेअर्समध्ये गुंतवणूक करून दोन-तीन वर्षांत गुंतवणूक वाढलीच नाही म्हणून काढून घेतात. हे खरे सर्वसामान्य अज्ञान आहे. कित्येक लोक शेअर मार्केट एक जुगार आहे. तिथे पैसे बुडले जातात, ही समजूत  करून फार दूर राहून स्वतःचे नुकसान करून घेताना दिसले.

खरं तर शेअर मार्केट ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे, हे आपल्या देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या लक्षात आले पाहिजे.

म्युच्युअल फंड परिणाम 

आपल्या देशांमध्ये म्युच्युअल फंडाचा प्रवास 1963 साली झाला. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना खर्‍या अर्थाने 1993 व 1995 सालच्या महत्त्वाच्या टप्प्यात सेबीच्या नियंत्रण अंतर्गत खासगी कंपन्यांना अधिकृतपणे फंडांमध्ये गुंतवणूक सुरू करण्यास मुभा देण्यात आली, तेथून स्पर्धात्मक वातावरण तयार होत गेले. हे क्षेत्र फार जोमात वाढलेले दिसते. बाजारातील फंड मॅनेंजरसारख्या तज्ज्ञाकडून चांगले वित्तीय व्यवस्थापन, कमी खर्चात चांगला परतावा आणि गुंतवणुकीतील पारदर्शीपणा ही आपल्या म्युच्युअल फंडाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आपल्या देशात म्युच्युअल फंड क्षेत्र फार जोमात वाढत आहे.

आपल्या देशामध्ये गुंतवणूकदारांना एका रात्रीपासून चाळीस वर्षांपर्यंत दीर्घकाळासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सुमारे 3000 पर्यंत योजना उपलब्ध आहेत. गुंतवणूकदाराच्या प्रत्येक गरजेसाठी म्युच्युअल फंड हा पर्याय चांगला उपलब्ध आहे. या क्षेत्राने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. यातून गुंतवणूक मूल्य आपल्या मोबाईलवरून पाहता येते. गुंतवणूक करता येते.

2005 पासून म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक प्रगती किती प्रमाणात झाली आहे, यासाठी खाली आकडे देत आहे. 2008 साली 5.05 लाख कोटी, 2008 साली 5.87 लाख कोटी, 2015  साली 10.82 लाख कोटी, 2018 साली 23.21 लाख कोटी आणि 2020 सप्टेंबर 28.34 लाख कोटीपर्यंत गुंतवणूक मालमत्ता पोहोचली आहे. मात्र वरील एकूण म्युच्युअल फंड गुंतवणुकीपैकी 74% गुंतवणूक देशातील फक्‍त पाच मोठ्या शहरांतून झालेली दिसत आहे. अजूनही सर्वसामान्य गुंतवणूकदार या क्षेत्रापासून फारच दूर आहे. याचे मूळ कारण मिळणारा अल्प प्रमाणात मोबदला. गेल्या दोन वर्षात मिळणारा मोबदला फारच कमी झालेने कित्येक म्युच्युअल फंड सल्लागारांनी काम बंद केलेचे दिसून येते.नवीन सल्लगार येण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य गुंतवणूकदार या क्षेत्रापासून वंचित आहे. 

तरीही आपल्या देशात (SIP) एसआयपी योजना म्हणून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी गुंतवणूक प्रतिवर्षी होत आहे. आजअखेर 3.34 कोटी खातेदारांकडून दरमहा 8000 कोटी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक होत आहे. हे आकडे प्रगतीकडे जाणार्‍या बदलत्या भारतातील बदलत्या गुंतवणूक क्षेत्रातील आहेत. एसआयपीमधील इक्‍विटी म्युच्युअल फंडाचा इतिहास पाहिल्यास 12% ते 18% परतावा चांगल्या योजनांनी दीर्घकाळात दिला आहे. पण म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजारातील जोखीम ही जाहिरात पाहूनच अनेक गुंतवणूकदार या योजनांकडे पाठ फिरवितात, असे वाटते. आपल्या देशात सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना म्हणजे बँकेतील मुदतठेव. 2000 साली बँकांचे व्याजदर 10% ते 12% पर्यंत मिळत होते. तेव्हापासून सातत्याने ते खाली खाली येत आहेत. कोरोनामुळे सध्या राष्ट्रीयीकृत  बँकांचे व्याजदर 5.50% पर्यंत खाली आले आहेत. या ठिकाणी  झालेल्या व्याजाच्या उत्पन्‍नावर अवलंबून असणार्‍या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. भविष्यात असेच व्याजदर खाली येत राहतील, असे वाटते. म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदारानी स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. आपल्या भविष्यातील गरजांचे नियोजन केले पाहिजे. आर्थिक साक्षर झाले पाहिजे. रोखे बाजार, शेअर बाजार, नाणे बाजार, रोखता बाजार, म्युच्युअल फंड या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. भविष्यातील आपल्या आर्थिक गरजेनुसार आर्थिक नियोजन करून गुंतवणूक केली पाहिजे. 

(प्रवर्तक : एस. पी. वेल्थ,

         कोल्हापूर)

Back to top button