वॉलेटमधून वॉलेटमध्ये... | पुढारी | पुढारी

वॉलेटमधून वॉलेटमध्ये... | पुढारी

सुभाष वैद्य

वॉलेट आणि पेमेंट कार्डचा वापर करणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. वॉलेटला आणखी लोकप्रिय करण्यासांठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठे पाऊल उचलले आहे. आरबीआयने वॉलेट कंपनीला 31 मार्च 2022 पर्यंत एका वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2022 पासून मोबाईल वॉलेट इंटरऑपरेबिलिटी बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार एका वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य होणार आहे. 

अलिकडेच जारी केलेल्या अधिसूचनेत आरबीआयने आर्थिक वर्ष 2023 म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून मोबाईल वॉलेट इंटरऑपरेबिलटी बंधनकारक केली आहे. त्यामुळे आपण एका वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे पाठवू शकतो आणि स्वीकारू शकतो. सध्या ही सुविधा दिली जात नाही. तज्ञांच्या मते, या निर्णयामुळे वॉलेट आणि प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट (पीपीआय) प्रदान करणार्‍या सेवांचा विस्तार होण्यास आणखी हातभार लागणार आहे. या निर्णयामुळे डिजिटल व्यवहारात वेग येईल. 

केवायसीचे नियम पाळणे गरजेचे 

एका वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे पाठवण्यासाठी यूजरला पूर्ण केवायसीचे पालन करणे बंधनकारक आहे. निर्देशानुसार केवायसी केल्यानंतरच ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. इंटरऑपरेबिलिटी सुरू झाल्यानंतर आपण पेटीएमने फोनपेमध्ये पैसे पाठवणे किंवा फोनपेहून पेटीएममध्ये पैसे पाठवण्याचा लाभ घेऊ शकता. 

एटीएम किंवा पीओएसचा वापर करता येणार

आरबीआयचे निर्देश लागू झाल्यानंतर वॉलेट किंवा प्रीपेड कार्डचा उपयोग हा एटीएम, मायक्रो एटीएम आणि प्वाइंट ऑफ सेल टर्मिनलमधून रोकड काढण्यासाठी करता येऊ शकेल. या निर्णयामुळे डिजिटल व्यवहाराला आणखी चालना मिळू शकते. 

तक्रार ऐकण्याचीही व्यवस्था 

आरबीआयने म्हटले की, वॉलेट आणि पीपीआयची सुविधा देणार्‍या बिगर बॅकिंग कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करावी लागणार आहे. आरबीआयने आपल्या सर्कुलरमध्ये म्हटले की, व्यवहाराच्या तक्रारी या संबंधित लोकपालच्या कक्षेत येतात आणि ग्राहकांची जबाबदारी निश्चित करतात. अशा वेळी हेल्पडेस्क असणे गरजेचे आहे. 

सार्वजनिक पेमेंट कार्डला बाजूला ठेवले

सार्वजनिक व्यवहारासाठी जारी केलेल्या पीपीआयला नेटवर्क किंवा एखाद्या ठिकाणी त्याचा वापर करण्यापासून बाजूला ठेवले आहे. गिफ्ट कार्ड (पीपीआय) जारी करणार्‍यांना मात्र कोणत्या नेटवर्कला व्यवहाराची सुविधा द्यायची हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असेल.   

महिनाभरात 10,000 रुपये काढण्याची सुविधा

आरबीआयने काढलेल्या सर्कुलरमध्ये म्हटले की, यूजर हा एकदाच पेमेंट कार्ड किंवा मोबाइल वॉलेटचा उपयोग करून 2000 रुपये काढू शकतो. त्याचवेळी महिन्यातून कमाल दहा हजार रुपये काढता येण्याची मुभा असेल. नव्या सर्कुलरनुसार वॉलेटची मर्यादा एक लाखाहून 2 लाख रुपये केली आहे. 

शिल्लक रकमेवर व्याज नाही  

तज्ञांच्या मते, वॉलेटमधून पैसे काढणे किंवा दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे भरण्याचे काम हे बँकेप्रमाणेच असणार आहे. फरक एवढाच की, बँकेप्रमाणे वॉलेटमधील शिलकी रकमेवर व्याज मिळत नाही. 

Back to top button