होम आयसोलेशन आणि विमा कवच | पुढारी

होम आयसोलेशन आणि विमा कवच

– आशिष जोशी

आरोग्य विम्याच्या अनेक पॉलिसीत घरातच उपचाराची सुविधा असते. परंतु दोन स्थितीतच अशा प्रकारची परवानगी मिळते. पहिले म्हणजे रुग्णालयात बेड उपलब्ध नसेल तर आणि दुसरे म्हणजे गंभीर रुग्ण हा रुग्णालयापर्यंत पोहचू शकत नसेल, तर अशा वेळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर विमा कंपन्यांकडून दिले जाणारे लाभ हे पॉलिसीधारकाला दिले जातात. यात कोव्हिड रुग्णांचा समावेश आहे. हा पर्याय सहा ते सात वर्षांपासून नियमित दिला जात आहे. बहुतांश विमा कंपन्या या घरातच उपचारापोटी आलेल्या खर्चाची भरपाई देण्याबाबत नियोजन करतात. परंतु दावा करताना पॉलिसीत हॉस्पिटलायजेशन अँट होमची अट आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे.  

कोरोना कवचामुळे उपचाराची हमी

गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोव्हिडवरील उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान 50 हजार आणि कमाल 5 लाखांचे कवच मिळते. कोव्हिड कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चदेखील मिळतो. विशेष म्हणजे पॉलिसीची रक्‍कम ही केवळ एकाच व्यक्‍तीला मिळू शकते. कुटुंबातील अन्य सदस्यांना वेगवेगळी पॉलिसी घ्यावी लागेल. इर्डाने पॉलिसीचा कालावधी हा 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला असून तो अगोदर 31 मार्च होता. 

होम केअरची विशेष सुविधा

अनेक विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना होम केअर पॅकेजची सुविधादेखील उपलब्ध करून देत आहेत. या पॅकेजच्या आधारे आयसोलेट राहून उपचार करणार्‍यांना विमा योजनाचा लाभ मिळू शकतो. विमा कंपन्या या होम केअर पॅकेजमध्ये औषध, घरातच नर्स, डॉक्टरचे कन्सेल्टेशन, सीटी स्कॅन, एक्स रे आणि कोव्हिड चाचणीचा खर्च देत आहे. जोपर्यंत रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत सर्व वैद्यकीय खर्च यात कव्हर केले जातात. 

आयसीयूचा खर्च कंपनीकडून नाही

घरातच कोरोनावर उपचार करताना आयसीयूसारखी सुविधा आणि उपचाराची गरज भासल्यास  विमा कंपन्या खर्च देतील की नाही, हे सांगता येत नाही. याबाबतचे स्पष्टीकरण नव्याने पॉलिसी घेताना पॉलिसी कंपनीकडून घेतले पाहिजे. अनेक कंपन्या होम केअरच्या सुविधांतर्गत पॉलिसीच्या एकूण रकमेपैकी दहा ते 50 टक्केच रक्‍कम देत आहेत. 

दावा करताना काळजी घ्या

  • होम केअरनुसार विम्याचा दावा करताना सर्व तपासणी रिपोर्ट, औषध खरेदीच्या पावत्या, सीटी स्कॅन रिपोर्ट, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आदी कागदपत्रे असणे गरजेचे आहे. 
  • कोणत्याही कंपनीचा आरोग्य विमा घेताना होम आयसोलेशन किंवा होम केअरची सुविधा आहे की नाही, हे तपासून पाहवे.
  • पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी आरटीपीसीआरचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हा आयसीएमआरच्या मंजूर प्रयोगशाळेतील असावा. यात स्पेसिमन रेफरल फॉर्म आयडी असणे देखील गरजेचे आहे. होम आयसोलेशन आणि उपचारादरम्यानचा डॉक्टरांचा सल्ला असणे आवश्यक आहे. 
  • घरातच उपचार करण्यासंदर्भातचा सल्ला डॉक्टरांनी लिखित स्वरूपात दिलेला असावा. ही शिफारस विमा कंपनीला दाखवावी लागेल. 
  • काही कंपन्या नेटवर्कमधील रुग्णालयाच्या डॉक्टराची होमकेअरची शिफारस ग्राह्य धरतात.

Back to top button