रोजगार सुधारणा आणि निर्यातीत वाढ  | पुढारी

रोजगार सुधारणा आणि निर्यातीत वाढ 

वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यात गुरुवारी 17 जूनला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक  52,323 होता. तसेच निफ्टी 15,691 वर बंद झाला. काही महत्त्वाच्या शेअर्सचे भाव असे होते.

हेग 2164 रुपये, आयसीआयसीआय डायरेक्टने हा शेअर 2800 ची सीमा ओलांडेल, असे म्हटले आहे. ओएनजीसी 125 रु. जिंदाल स्टील (हिस्सार) 185 रु., मन्नापुरम फायनान्स 163 रु. बजाज फिनान्स 6050 रुपये, फिलीप कार्बन 227 रुपये, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 114 रुपये, अशोका बिल्डकॉन 100 रुपये, जे कुमार इन्फ्रा 192 रुपये, रेप्को होम्स 390 रुपये, जिंदाल स्टील 395 रुपये, मुथुट फायनान्स 1482 रुपये, केइआय इंडस्ट्रीज 700 रुपये, लार्सेन अँड टुब्रो 1488 रुपये, लार्सेन अँड टुब्रो इन्फोटेक 4170 रुपये,भारत पेट्रोलियम 476 रुपये, इंडिया बुल्स हाऊसिंग 283 रुपये, ग्राफाइट 668 रुपये, हिंदुस्थान पेट्रोलियम 309 रुपये, स्टेट बँक 420 रुपये, स्टील स्ट्रीप्स व्हील्स लि. 741 रुपये, पीएनबी हाऊसिंग 749 रुपये, बजाज फिनसर्व्ह 11818 रुपये.

कोरोनाचा प्रभाव देशभर वाढत असताना शेअर बाजारावर त्याचा काहीही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. देशात रोजगारीचा कल वाढत असल्यामुळे बेरोजगारी कमी होत चालली आहे. ज्या राज्यात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (उचखए) च्या मते यापुढेही रोजगारीत सुधारणा होत जाईल. केंद्र सरकार व काही राज्य सरकारे रोजगार सुधारण्यासाठी अनुकूल पावले टाकत असल्यामुळेच ही प्रगती दिसत आहे. 13 जून रोजी संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारीचा दर 14.7 टक्क्यांवरून 9.7 टक्क्यांवर आला आहे. ही घसरण चांगली मानली जात आहे. भारत आणि चीन यांच्यात गलवान खोर्‍यात झालेल्या धुमश्‍चक्रीला 15 जून रोजी 1 वर्ष पूर्ण झाले आहे. चिनी वस्तू तुलनेत स्वस्त वाटत असल्या तरी भारतीय नागरिक आता या मुद्द्याला महत्त्व देत नाहीत. देशभरात मंगळवार 15 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक झाले आहे. हॉलमार्किंगमुळे सोन्याची शुद्धता कळणे सोपे झाले असून ग्राहकांची फसवणूक यापुढे होणार नाही.

गेले काही दिवस पेट्रोल व डिझेलचे भाव सतत वाढत असल्यामुळे केंद्र सरकार इंधन दरवाढ नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सर्वप्रथम बसतो. म्हणूनच हे भाव जर नियंत्रित राहिले, तर महागाईदेखील आटोक्यात येईल. सध्या देशातील 7 राज्यात पेट्रोलने शंभरीचा आकडा पार केला आहे.

भारताच्या निर्यातीत मे 2020 च्या तुलनेत मे 2021 मध्ये 69 टक्के वाढ झाली आहे. भारतीय वस्तूंना आता परदेशात प्राधान्य मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट असूनही मे 2019 च्या तुलनेत यावर्षीच्या मे मध्ये 8 टक्क्यांची वाढ दिसते. या वर्षाच्या मे मध्ये भारतीय औषधांची निर्यात 8 टक्क्यांनी वाढली आहे. डॉलर व रुपयाचे विनिमय मूल्य आता 74.07 इतके झाले आहे. डॉलर रुपयाचे विनिमय मूल्य 73.32 वरून आता 74.7 रुपयांवर गेले आहे. आता आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. पण आपल्या औषधांच्या निर्यातीचे जास्त मूल्य आपल्याला मिळेल. ज्या कंपन्यांचे कारखाने अमेरिकेतच आहेत. अशा अरबिंदो फार्मासारख्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल. सध्या अरबिंदो फार्माच्या शेअरची किंमत 933 रुपये आहे. वर्षभरात हा भाव 1100 रुपयांच्या पुढे जावा. जग सध्या मंदीच्या विळख्यात सापडले असले तरी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ डॉलरच्या मजबुतीबद्दल खात्री बाळगत आहेत. याचा परिणाम अमेरिकेत शिक्षणासाठी ऑगस्ट-सप्टेंबर जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्यावर होईल.

 

Back to top button