शेअर बाजार : ट्रेडिंगमध्ये नुकसान टाळण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी

शेअर बाजार : ट्रेडिंगमध्ये नुकसान टाळण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी
Published on
Updated on

गुंतवणूकदाराने आपल्या नुकसानीची मर्यादा अगोदरच निश्चित करायला हवी. त्या सीमेपर्यंत पोहोचल्यानंतर आपण त्या दिवशीचा व्यवहार थांबवायला हवा. पुढील व्यवहार दुसर्‍या दिवशीच करा. जर आपण अशा प्रकारची शिस्त बाळगली नाही, तर नुकसान होण्याची शक्यता अधिक राहते.

जर आपण शेअर बाजार किंवा फॉरेक्स बाजारात गुंतवणूक करत असाल, तर त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे असते. हल्ली मोबाईल अ‍ॅपवरून ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक जण आपली इतर कामे करता करता ट्रेडिंग करताना दिसतात. पण शेअर बाजार हे जोखमीचे दुसरे नाव आहे, असे म्हटले जाते. इथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. अशा वेळी आपले नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊनच आपले ट्रेडिंग करायला हवे.

अनेक जण शेअर किंवा फॉरेक्स बाजारातून पैसा कमवू शकत नाहीत कारण ते व्यवहारिक पातळीवर नाही, तर भावनिक पातळीवर गुंतवणूक करत असतात. भावनात्मक द़ृष्टिकोनातून ट्रेडिंग केल्यास नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळण्यासाठी…

दररोजच्या नुकसानीचे आकलन करा : एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या नुकसानीची मर्यादा सकाळीच निश्चित करायला हवी. त्या सीमेपर्यंत पोहोचल्यानंतर आपण त्या दिवशीचा व्यवहार थांबवायला हवा. पुढील व्यवहार दुसर्‍या दिवशी करा. जर आपण अशा प्रकारची शिस्त बाळगली नाही, तर नुकसान होण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवा आणि पैसा सुरक्षित ठेवा. जर आपण दिवसभराच्या नुकसानीची लक्ष्मणरेषा आखली आणि त्या रेषेच्या मर्यादेतच राहून काम केले, तर ती एक योग्य रणनीती ठरू शकेल.

सतत नुकसान होत असेल तर व्यवहार बंद करा : गुंतवणुकीतून सतत नुकसानच पदरी पडत असेल, तर तत्काळ दिवसभरासाठी व्यवहार बंद करावेत. एकदा नाही-दोनदा नाही, तर तिसर्‍या प्रयत्नातही हाती काहीच लागले नाही, तर त्यादिवशी व्यवहार करू नयेत. काही मंडळी उगाचाच भावनेच्या आहारी जातात आणि त्यापेक्षा अधिक नुकसान पदरात पाडून घेतात. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवा आणि नुकसानीपासून स्वत:ला वाचवा. तोटा झाल्यास हताश होऊ नका आणि लाभ झाल्यास स्वत:ला तिसमार खाँ समजू नका. संतुलित राहूनच व्यवहार निश्चित करावा.

क्षमतेपेक्षा अधिक गुंतवणूक नको : जर आपल्याला बाजाराची भीती वाटत असेल, तर आपण गरजेपेक्षा अधिक गुंतवणूक करत असल्याचे समजा. जोखीम उचलण्याची जेवढी क्षमता आहे, तेवढाच गुंतवणुकीचा विचार करा. रात्री झोप उडेल, अशी गुंतवणूक करू नका. एक उत्तम गुंतवणूकदार म्हणून स्वत:ची क्षमता ओळखणे गरजेचे आहे.

काही वेळासाठी संगणकापासून दूर राहा : ऑप्शन ट्रेडिंग करणार्‍यांचा अभ्यास करता असे लक्षात येते की, अनेकांना याचे जणू व्यसनच जडले आहे. ते जडू नये यासाठी दररोज एक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर काही काळासाठी संगणकापासून दूर राहा. थोडे रिलॅक्स होऊन पुन्हा ट्रेडिंग करा. सतत ट्रेडिंग करत राहिल्यास मनातला गोंधळ वाढत जाऊन नुकसान पदरी पडण्याची शक्यता असते. याउलट थोडा ब्रेक घेतल्यास विचार करायला वेळ मिळतो.

नितीन कुलकर्णी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news