दक्षता : आर्थिक वर्षाखेरीपूर्वी न चुकता ही कामे करा | पुढारी

दक्षता : आर्थिक वर्षाखेरीपूर्वी न चुकता ही कामे करा

आपला कर वाचवणे आणि अन्य कायदेशीर कटकटींपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. त्यासाठी आधार- पॅन लिंक करणे, केवायसी अपडेट करणे, अचूक माहिती भरणे याबाबी कटाक्षाने वेळेत करायला हव्यात.

आधार-पॅन लिंक : 

आधार क्रमांकाला पॅन क्रमांकाशी जोडण्याची शेवटची तारीख 31मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आपण हे काम वेळेत पूर्ण न केल्यास आपले पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि आपण आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. आजकाल प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी पॅनची गरज असल्याने हे काम वेळेत करणे आवश्यक आहे.

अ‍ॅडव्हान्स टॅक्स फायलिंग :

भारताच्या प्राप्तिकर कायद्यानुसार 10 हजार रुपयांपेक्षा अधिक कर भरणारा व्यक्ती हा 15 मार्चच्या अगोदर चार हप्त्यात आगाऊ कर भरण्यास बांधिल असतो. आपण नोकरदार असाल तर कंपनीने टीडीएस वेतनातून अगोदरच कापून घेतलेला असू शकतो.

बँकेबरोबर केवायएसी अपडेट करा :

बँकेच्या खात्याला केवायसी पूर्ण करण्याचा कालावधी हा 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. ग्राहकाला पॅनवरील रहिवासी पत्त्याचा पुरावा तसेच अन्य माहिती बँकेकडे अपडेट करावी लागेल.

कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करा :

एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे आकलन करण्यासाठी वेळ काढावा आणि कलम 80 सी नुसार कर बचतीसाठी किती रक्कम भरणे अपेक्षित आहे, याची गोळाबेरीज करावी. आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या बचत योजनांत अगोदरच गुंतवणूक केलेली असेल, तर ही खाती सक्रिय ठेवण्यासाठी 31 मार्चपूर्वी किमान योगदान द्यावे लागेल.

आयटीआर दाखल करा :

2021-22 आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आपण दंडापासून वाचण्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्राचा भरणा केलेला असेल, असे गृहीत धरता येईल. नसेल तर दंडासह विवरणपत्र दाखल करावे लागेल.

प्रलंबित कराचा भरणा :

‘विवाद से विश्वास’ या योजनेंतर्गत ज्या करदात्यांची याचिका प्रलंबित आहे, त्यांनी 31 मार्चला किंवा त्याअगोदर वाद असलेल्या कराचा भरणा करावा. जेणेकरून व्याज किंवा दंडापासून सवलत मिळेल. कोणत्याही आर्थिक वादाचा निपटारा आणि कर भरणा करण्यासंदर्भात प्राप्तिकर खात्यातून संपर्क विभागातून सल्ला दिला जातो.

प्रत्येक व्यक्तीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. कर वाचवणे आणि अन्य कायदेशीर कटकटीपासून बचाव करण्यासाठी वर्षाच्या प्रारंभीच योजना आखणे गरजेचे आहे. अर्थात, आपण वर्षभरात काहीच काम केले नाही आणि महत्त्वाची आर्थिक कामे उरकण्यासाठी मार्च एंडची वाट पाहत असाल, तर काही गोष्टींची यादी तयार करा. या यादीनुसार 31 मार्चपूर्वी सर्व कामांचा निपटारा करायला हवा.

– विशाखा पाध्ये 

Back to top button