अर्थचक्राला वेग, आर्थिक विकासाला गती | पुढारी

अर्थचक्राला वेग, आर्थिक विकासाला गती

गेल्या आठवड्यात गुरुवारी 20 जानेवारीला शेअर बाजार बंद होताना निर्देशांक 59,464 वर बंद झाला. तर निफ्टी 17,757 वर स्थिरावला. निर्देशांक आता 80 हजारांच्या दिशेने व निफ्टी आता 20 हजारांच्या द‍ृष्टीने वाटचाल करू लागला आहे. बाजाराला धक्‍का बसेल असे काहीही वर्तमान नाही. अर्थात, कमी-जास्त होणार्‍या आपल्या श्वासाप्रमाणे निर्देशांक व निफ्टी खालीवर होतात. दहा वर्षांपूर्वी बजाज फायनान्स 12000 रुपयांचा होता. तेव्हा कंपनीच्या एका शेअरचे 5 शेअरमध्ये विभाजन केले आणि एकास एक बोनस भाग दिले गेले.

सध्या महागाई हळूहळू डोके वर काढत आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण – मध्यपूर्वेतील तेलाचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात संयुक्‍त अरब अमिरातीवर (UAE) ड्रोन हल्ले झाले. त्यामुळे जगावर एक नवीन संकट उभे राहिले आहे.

भारताची गरज 70 टक्के पेट्रोल व डिझेल आयात करून भागवावी लागते. भारतातील माल वाहतूक आता मोठ्या प्रमाणावर महामार्गावरून होते. कच्च्या तेलाचे दर (क्रूड) सध्या 87 डॉलर प्रती बॅरल झाले आहेत. गेल्या 7 वर्षांतील हा उच्चांकी दर आहे.

डिसेंबरच्या तिसर्‍या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) या एका मोठ्या कंपनीने समभाग पुनर्खरेदीची योजना जाहीर केली आहे. ती 18 हजार कोटी रुपयांची आहे. बाजार भावापेक्षा सुमारे 18 ते 20 टक्के जास्त किंमत त्यासाठी दिली जाईल. म्हणजे पुनर्खरेदीचा दर 4500 रुपये प्रति शेअर असेल.

म्युच्युअल फंडांतील निधीत शेअर बाजारातील तेजीमुळे नुकत्याच संपलेल्या वर्षात 7 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. म्युच्युअल फंडांच्या निधीत वार्षिक 24 टक्के दराने भर पडली आहे. 2020 मध्ये म्युच्युअल फंडांतल्या गुंतवणूकदारांच्या खात्याचा आकडा 72 लाख इतक होता. तो आता 2021 मध्ये वाढून 2 कोटी 65 लाखांवर गेला आहे.

फेब्रुवारी 2021 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या विविध कंपन्यांत असलेल्या गुंतवणुकीची टक्केवारी कमी करण्याचा मनसुबा जाहीर केला होता. एकूण लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात 9,329 कोटी रुपयांची मामुली रक्‍कम गोळा केली गेली. चालू आर्थिक वर्षाचे 10 महिने संपत आले असले तरी केंद्र सरकार अजून त्याबाबत उदासीन आहे.

चालू आर्थिक वर्षात ‘एअर इंडिया’च्या विक्रीचा टाटा समूहाशी सर्वात मोठा व्यवहार केला आहे. ‘एअर इंडिया’वर 61 हजार 562 कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण टाटा समूह त्यापैकी 15,300 कोटी रुपयांची रक्‍कम (कर्ज) फेडणार आहे. उरलेली रक्‍कम एअर इंडियाच्या अन्य जिंदगीकडे वळवली जाईल. ‘एअर इंडिया’बाबत केंद्र सरकार व टाटा समूह दोघेही बेफिकीरच होते. कारण याबाबत जाब विचारणारे कोणीही नाही, अशी दोघांची भावना आहे. संसदेतही याबाबत कुणीही चौकसपणे प्रश्‍न मांडत नाही.

ज्या कंपन्यांमधील समभाग विक्री करून मोठ्या प्रमाणावर रक्‍कम उभी केली जाऊ शकते. त्यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे. ‘भारत पेट्रोलियम’, ‘शिपिंग कॉर्पोरेशन’, ‘कंटेनर कॉर्पोरेशन’, ‘आयडीबीआय बँक’, ‘भारत अर्थ मुव्हर्स (BEML)’ ‘पवनहंस’, ‘नीलाचन इस्पात’ इत्यादी कंपन्या आहेत. सर्वाधिक निधीची उभारणी सुमारे 90 हजार कोटी रुपये भारत पेट्रोलियमच्या विक्रीतून होणार आहे.

‘पवनहंस’द्वारे 350 ते 400 कोटी रुपये, ‘भारत अर्थ मुव्हर्स (BEML)’ आणि ‘शिपिंग कॉर्पोरेशन’द्वारे 3600 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन सरकारी बँका आणि एका सर्वसाधारण विमा कंपनीतील समभाग विक्री करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. अन्य कंपन्यांतील समभाग विक्रीतून सरकारने 3,994 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

कोरोनाचा संसर्ग त्यामुळे कासवाच्या गतीने सुरू राहिलेले आर्थिक व्यवहार यामुळे झालेल्या परिणामातून बाहेर येऊन आता अर्थचक्र वेगाने फिरू लागले आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी आर्थिक विक्रीस दर अर्थात (GDP) 7.6 टक्के राहील, असा विश्‍वास ‘इंडिया रेटिंग्ज’ या पत मानांकन संस्थेने व्यक्‍त केला आहे.

त्यांच्यात अपेक्षेनुसार 2022-23 मध्ये जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) 9.1 टक्के होईल. अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, हाँगकाँग, फ्रान्स यांच्या दरापेक्षा भारताचा दर कितीतरी वर आहे. राष्ट्रीय बँकांपैकी बँक ऑफ महाराष्ट्राचा 2021 अखेर संपलेल्या तिसर्‍या तिमाहीअखेर निव्वळ नफा 325 कोटी रुपयांचा झाला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची कामगिरी सदैव चढत्या क्रमाने होत आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 154 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Back to top button