महत्त्वाची ‘अर्थ’सूत्रे - पुढारी

महत्त्वाची ‘अर्थ’सूत्रे

डॉ. विजय ककडे

गुंतवणुकीचे निर्णय हे जरी गुंतागुंतीचे व त्रासदायक वाटत असले तरी काही सोपी; परंतु उपयुक्‍त अर्थसूत्रे किंवा नियम आपल्याला निश्‍चितच मदत करू शकतात. त्यातील काही नियम आपण पाहिले. काही नियम पुढीलप्रमाणे आहेत.

100 वजा वय ः आपली जोखीम क्षमता मोजण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपले वय 100 मधून वजा केल्यास येणारे प्रमाण म्हणजे जोखीम प्रमाण होय. उदा. जर अमितचे वय 25 असेल तर 100-25 म्हणजे 75% त्याने आपल्या गुंतवणुकीच्या जोखीम क्षेत्रात व 25% सुरक्षित क्षेत्रात ठेवावे. जर वय 40 असेल तर आता 100-40 म्हणजे 60% जोखीम क्षेत्रात (जसे शेअर्स किंवा म्युचल फंड) ठेवावे. वाढत्या वयासोबत गुंतवणुकीचे जोखीम प्रमाण घटवणे हे या नियमाचे सार आहे.

हप्‍ता 40% चा नियम : कर्ज घेतल्याशिवाय मध्यमवर्गीय आपत्ती आर्थिक स्वप्ने साकार करू शकत नाही. अल्प उत्पन्‍न गट वारंवार व विविध ठिकाणांहून कर्जे घेतो. खरे तर कर्ज अपरिहार्यता असेल तरच घ्यावे, पण महत्त्वाचे म्हणजे कर्ज हप्‍ता आपल्या उत्पन्‍नाच्या 40% पेक्षा अधिक असू नये. ही सीमारेषा सुरक्षितता ठरविले. अतिप्रमाणात कर्ज आर्थिक चिंता वाढवतात.

20 पट विमा ः आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण कवच विमा असणे अत्यावश्यक घटक आहे. परंतु चुकीचा व अपुरा विमा घेणारे व विमा न घेणारे सारखेच ठरतात. विमा हे गुंतवणुकीचे नव्हे, तर आर्थिक संरक्षणाचे साधन असल्याने आपल्या वार्षिक उत्पन्‍नाच्या 20 पट विमा असावा अणि तो मुदती विमा (ढशीा खर्पीीीरपलश) असावा. सरकारमार्फत आर्थिक सुरक्षा प्रधानमंत्री जीवनज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा अल्प हप्त्यात मिळतात, त्याचा लाभ घेणे महत्त्वाचे ठरते.

आपत्ती निधी उत्पन्‍नाच्या 3 पट हवा ः आजारपण, अपघात, नोकरी जाणे, व्यवसाय थांबणे, सध्याचा व्यवसाय/नोकरी सोडून दुसरा व्यवसाय करणे अशा आपत्ती अचानक येऊ शकतात. त्यासाठी आपल्या दरमहा उत्पन्‍नाच्या किमान 6 पट आपत्ती निधी असावा.

50-30-20 चा नियम ः आपल्या एकूण उत्पन्‍नाचा विभागवार वाटा कसा असावा, याचे उत्तर 50-30-20 सूत्रात सापडते. त्यानुसार 50 टक्के खर्च आवश्यक गरजा जसे घरभाडे, गृहखर्च (किराणा व इतर), वीज बिल, केबल, इंटरनेट देयके इ.) यासाठी असावा, तर 30% खर्च आरामदायी जीवनासाठी (हॉटेलिंग, सहल) यासाठी करावा. 20% भाग हा बचतीसाठी प्रथम ठेवून उर्वरित खर्च करावेत.

10-5-3 परतावा नियम ः आपल्या गुंतवणुकीवर जोखीम प्रमाणात वाजवी परतावा अपेक्षित ठेवून परतावा भरमसाट देणार्‍या फसव्या योजनेपासून दूर राहण्यासाठी 10-5-3 नियम महत्त्वाचा ठरतो.

त्यानुसार : 1) म्युचल फंड, शेअर्स अशा जोखीमपूर्ण गुंतवणुकीतून 10% परतावा अपेक्षित ठेवावा. 2) जोखीम कमी असणार्‍या मुदत ठेवीसारख्या गुंतवणुकीवर 5% परतावा अपेक्षित ठेवावा. 3) बचत खात्यावरील शिल्‍लक रोकडच असल्याने त्यावर 3% परतावा अपेक्षित ठेवावा.
(समाप्‍त)

Back to top button