डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय? | पुढारी

Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

आपण खालेल्या अन्‍नामुळे आणि प्रदूषित वातावरणामुळे शरीरात काही विषारी द्रव्ये तयार होतात. ही विषद्रव्ये वेळच्यावेळी बाहेर फेकल्यास शरीरातील अंतर्गत यंत्रणा सुरळीतपणे चालते. ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याच्या प्रक्रियेला 'डिटॉक्सिफिकेशन' म्हटले जाते. याची नेमकी प्रक्रिया काय आणि त्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊ…

डिटॉक्झिफिकेशन म्हणजे शरीरातील अंतर्गत संस्थामध्ये साचलेले विषारी द्रव्ये बाहेर फेकणे. आपण खाल्‍लेल्या अन्नाद्वारे हे विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने महिन्यातून एक वेळा तीन ते चार दिवस आपण डिटॉक्झिफिकेशन करुन घेणे गरजेचे आहे. डिटॉक्झिफिकेशन किंवा डिटॉक्झ आहार बराच लोकप्रिय असला तरी हा वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित केला गेलेला नाही. आयुर्वेद आणि चायनिज औषध प्रणालीसोबतच कित्येक देशामध्ये अनेक वर्षे ही औषधे प्रचलित आहेत. 

आहाराचे नियोजन

मद्यपान, कॉफी, सिगारेट, रिफाईंड साखर आणि सॅच्युरेटेड फॅट या सर्वांमुळे शरीरामध्ये विषारी द्रव्ये तयार होतात. या विषारी द्रव्यांमुळे शरीरातील अंतर्गत यंत्रणेत बिघाड निर्माण होतो. त्यामुळे या आहाराचे सेवन करणे टाळणे उत्तम.

शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर निघून जाण्यासाठी 60 टक्के पातळ पदार्थ आणि 40 टक्के घनपदार्थ घेणे गरजेचे आहे. डिटॉक्झिफिकेशनसाठी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राखणे गरजेचे आहे. 

टरबूज, पपई यांसारख्या फळांचा रस घेणे चांगले असते. द्राक्षांचा रस घेऊ नये कारण यामुळे डिटॉक्सिफिकेशनच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. 

हिरव्या पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकली खावीत. याव्यतिरिक्‍त कांद्यामुळेही विषद्रव्ये साफ होण्यास मदत होते. विशेषतः यकृतातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी याचा फायदा होतो. 

सूर्यफूल, तीळ यांच्या बियांचा देखील फायदा होतो. 

कधी आणि केव्हा?

तीन महिन्यांतून एकदा डिटॉक्स आहार घेणे गरजेचे असते. तुम्ही स्थूल असाल तर दर महिन्याला डिटॉक्स आहार घेऊ शकता. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल किंवा तुम्हाला उच्च रक्‍तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही दोन महिन्यांतून एकदा डिटॉक्स आहार घेणे चांगले. तुम्ही तणावग्रस्त असाल तर दर पंधरा दिवसांतून एकदा अवश्य डिटॉक्स आहार घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदा डिटॉक्स आहार जरूर घ्या. डिटॉक्स आहार घेत असताना प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले असतील असे पदार्थ अजिबात घेऊ नका. साखर आणि जास्त चरबीयुक्‍त आहार, जंक फूडदेखील वर्ज्य करा. खूप दिवसांसाठी डिटॉक्स आहार घेणेही शरीराला अपायकारक ठरू शकते कारण यामुळे शरीरातील खनिजद्रव्ये आणि जीवनसत्त्वे कमी होतात. 

विषद्रव्ये तयार होण्याचे संकेत

आधुनिक जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि पर्यावरणातील वाढते प्रदूषण यामुळे आपल्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्यांचे प्रमाणही वाढत आहे. शरीरातील विषद्रव्यांचे प्रमाण वाढल्यावर खालील लक्षणे दिसून येतात. 

*थकवा येणे, अशक्‍तपणा जाणवणे

*संप्रेरकांसंबंधी समस्या, स्वभावदोष निर्माण होतात

*एकाग्रता कमी होते

*डोकेदुखी, अंगदुखी जाणवते

*त्वचा विकार उद्भवतात

*पचनक्रिया बिघडते

डिटॉक्झिफिकेशनची प्रक्रिया

*उपवासाद्वारे अवयवांना विश्रांती देणे

*शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी यकृताला चेतना दिली जाते.

*फुफ्फुसे, आतडी आणि त्वचेद्वारे विषद्रव्ये बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेत वेग आणणे

*रक्‍ताभिसरण सुधारते

*शरीरातील पोषणद्रव्यांची झीज भरून काढते

डिटॉक्स करण्याचे फायदे

*रोगप्रतिकारशक्‍ती आणि ऊर्जा वाढवते.

*पचनसंस्थेची स्वच्छता करते.

*रक्‍त शुद्ध होते.

*त्वचेचा तजेला वाढतो.

*ऊती नष्ट करणार्‍या फ्री रॅडिकल्सना शरीराबाहेर फेकण्यास मदत करते.

*कॅन्सरसारख्या आजाराचा धोका टळतो.

*यकृत आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

* डिटॉक्स आहार हा आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच होणे गरजेचे आहे.

*डिटॉक्स आहार घेत असताना उपाशी राहणे टाळा.

*आपल्या आहारामध्ये ताजी फळे आणि पालेभाज्या, ज्यूस, लिंबूपाणी, नारळ पाणी, दही, ताक, मोड आलेली कडधान्ये यांचा अवश्य समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे.

*गर्भवती महिला, स्तनपान करणार्‍या महिला, थायरॉईड, यकृत आणि किडनी संबंधित तक्रारी असणार्‍या रुग्णांनी डिटॉक्स आहार पद्धतीचा वापर करू नका. मल्टिव्हिटॅमिनचे सेवन करणार्‍या व्यक्‍तींनी डिटॉक्स दरम्यान हे सेवन बंद करावे. मधुमेह, उच्च रक्‍तदाब, थायरॉईड आणि हृदयविकार असणार्‍या रुग्णांनी डिटॉक्स सोबत मल्टिव्हिटॅमिन औषधांचे सेवन केल्यास चालेल. ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झालेले आहे, अशा व्यक्‍तींनी डिटॉक्स आहार घेऊ नये. वृद्ध आणि लहान मुलांना देखील हा आहार देऊ नये.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news