गर्भाशयातील रक्तस्राव व गाठी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेंद्रे

गर्भाशयाचे काही आजार असे आहेत, की ज्यामध्ये गर्भाशय काढणे अपरिहार्य असते. उदाहरणार्थ, गर्भाशय, गर्भनलिका, गर्भाशयाचे मूख, स्त्री बिजांडकोशाचा कर्करोग (कॅन्सर) या व्यतिरिक्त विकोपास पोचलेले (एंडोमेट्रोसिस) व (अ‍ॅडिनो मॉयोसीस) तसेच बाळंतपणादरम्यान होणारा अतिरिक्त रक्तस्राव जर आटोक्यात आला नाही, तर गर्भाशय काढावे लागते.

गर्भाशयाच्या स्नायूंची रचना ही तीन थरांमध्ये असते. स्नायूंचे धागे उलटसुलट असतात. बाळंतपण झाले, की हे सर्व स्नायू घट्ट होतात. म्हणजे आकुंचन पावतात. आकुंचन होत असताना या स्नायूंतून होणारा रक्तपुरवठा संपूर्ण बंद केला जातो. नैसर्गिक पिटोसीन द्रव्य बाळंतपणानंतर आपोआप रक्तात स्रवते व ते पुढील कार्य करू लागते. त्याचे कार्य म्हणजे गर्भाशय आकुंचन पावून घट्ट करणे आहे. या क्रियेमुळे गर्भाशयाला व वारेला रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्या दाबल्या जाऊन पुढे रक्तपुरवठा बंद होतो.

बाळंतपणादरम्यान प्रथम बाळ जनन मार्गाद्वारे शरीराबाहेर येते व नंतर वार बाहेर येते. गर्भाशयाला जिथे वार चिकटलेली असते, तिथे थोडी जखम असल्याने (Raw area) व गर्भाशयाच्या आकुंचनामुळे तिथे बाळाच्या वारेस असणारा रक्तपुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्या बंद होतात. हा रक्तपुरवठा व्यवस्थित बंद होणे फारच गरजेचे असते. कारण, तो तसाच चालू राहिला, तर मात्र बाळंतिणीस रक्तस्राव होऊन तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. गर्भाशय जर व्यवस्थितपणे आकुंचन पावले नाही, तर इंजेक्शन व इतर उपाय म्हणजे 1) गर्भाशयाला हलकी मालिश करणे, 2) 'B'linch नावाचा टाका घालणे, 3) गर्भाशयाला होत असलेला रक्तपुरवठा बंद करणे, 4) तसेच Internat Iliac Artery Ligation गर्भाशयाचा रक्तपुरवठा बंद करणे, असे उपाय करूनही जेव्हा गर्भाशय व्यवस्थित आकुंचन पावले नाही व रक्तस्राव होतच राहिला, तर पेशंटचा जीव वाचविण्यासाठी असे गर्भाशय तिथेच काढून टाकावे लागते. याला सिझेरीयन हिस्ट्रेक्टॉमी म्हणतात.

जगभर आपल्या स्वतःच्या विचाराने उपचार करून घेण्याची पद्धत ही खूप वाईट सवय आहे. असेच एकदा अमेरिकेतल्या स्त्रियांच्या डोक्यात गर्भाशयाची कटकट काढून टाकण्याचे फॅड आले. तेव्हा अपेक्षित अपत्ये झाली, की सिझेरीयनच्या वेळेसच गर्भाशये काढू लागल्या व सर्रास गर्भाशय काढणे सुरू झाले; परंतु ही शस्त्रक्रिया जोखमीची असल्याने व तसेच त्यात Complication जास्त झाल्याने ती प्रथा बंद झाली. तर अशा प्रकारे अगदी अपवादात्मक प्रसंगी पेशंटचा जीव वाचविण्यासाठी सिझेरीयनच्या शस्त्रक्रियेवेळी गर्भाशयसुद्धा काढावे लागते. असे गर्भाशय काढल्यावर पेशंटचा जीव वाचविलेल्या डॉक्टरांविरुद्ध कोर्टात नातेवाईकांनी तक्रारी घातल्या आहेत; परंतु एखाद्या आपल्या कुटुंबातील घटकाची जीव वाचविण्यासाठी कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेसंबंधी समजून न घेता गैरसमजूत करून घेणे योग्य नाही. कोणताही वैद्यकीय व्यवसायिक अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी आपले ज्ञान व कौशल्य पणाला लावीत असतो व जेव्हा नाईलाज होतो, तेव्हाच असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. you can explain morbility but cannot explain the mortality गर्भाशय का काढले, याचे तुम्ही नंतर उत्तर देऊ शकता; पण एकदा का पेशंट अतिरिक्त रक्तस्रावाने गतप्राण झाला, तर तुम्ही दिलेले कोणतेही उत्तर पेशंटच्या नातेवाईकांचे समाधान करू शकत नाही. म्हणूनच, ज्याचा शेवट गोड त्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी गोड, ज्याचा शेवट गोड नाही, त्यासाठी काहीही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही.

बरे, असो. आता थोडेसे गर्भाशयाच्या गाठीबद्दल आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी, की गर्भाशयाच्या गाठी व स्त्रीबिजांड कोषाच्या गाठी या संपूर्णतः भिन्न आहेत. त्याचा उगम, त्याचे होणारे दुष्परिणाम व लक्षणे वेगवेगळी असतात. जननेंद्रियाला गाठ झाली, याचा अर्थ एकच घेऊ नये; तर आपण प्रथम सामान्यतः सर्वत्र आढळणारा आजार म्हणजे गर्भाशयाच्या फायब्राईडच्या गाठीबद्दल पाहू या! फायब्राईडची गाठ म्हणजे, गर्भाशयाच्या स्नायूंची तयार झालेली एक निरुपद्रवी गाठ होय, ही गाठ म्हणजे कोणताही कर्करोग (कॅन्सर) नसतो. साधारणः 30 वर्षे वयाच्या 20 टक्के स्त्रियांमध्ये ती आढळते. सर्वच फायब्राईडच्या गाठी वाईट नसतात. फायब्रॉईडच्या गाठीमध्ये केवळ एक टक्के कॅन्सरची शक्यता असते.

फायब्राईडच्या गाठीचे उपचार करीत असताना खालील गोष्टींचा विचार करून त्याचे उपचार ठरतात. तसेच कायमचे उपचार हवे, की काही ठरावीक कालावधीसाठी, हापण मुद्दा विचारात घ्यावा लागतो.

स्त्रीचे वय, आणखी मूल हवे का? वंध्यत्व असल्यास, पोटदुखी, अतिरिक्त रक्तस्राव, मूत्राशयावर दाब येऊन होणारा त्रास व गुद्द्वारावर दाब असल्याने होणारा त्रास, तसेच गर्भाशयामध्ये फायब्राईड कोठे आहे व शेवटी त्या पेशंटची गर्भाशय टिकवण्याची इच्छा आहे किंवा नाही, काही फायब्राईडच्या गाठी मोठ्या असूनही त्यासाठी स्त्रियांना त्रास नसल्यास गर्भाशय कधीच काढावे लागत नाही.

वय ः कमी वय असल्यास फायब्राईडची गाठ काढतात. गर्भाशय काढण्यासाठी बाकी गोष्टींचा विचार करून अगदी नाईलाज असेल तेव्हाच कमी वयात फायब्राईडच्या गाठीसाठी गर्भाशय काढावे लागते.

मूल हवे असल्यास फक्त गाठ काढतात अशा स्त्रियांमध्ये क्वचितप्रसंगी अनेक फायब्रॉईडच्या गाठी असतात. त्यावेळी गर्भाशयाला MRI करूनच गाठी काढण्याच्या किंवा नाही हे ठरते तसेच पारंपरिक टाक्याच्या ऑपरेशनने किंवा दुर्बिणीद्वारे करायचे, हे ठरते. गर्भाशयाची रचना आपण लक्षात घेतली, तर ही एक जाडसर स्नायूंची पिशवी असते. त्याला दोन्ही बाजूंना गर्भनलिका जोडलेल्या असतात व खालचा भाग हा गर्भाशयाच्या मुखाद्वारे जननमार्ग, म्हणजेच योनीमार्गाला जोडलेला असतो. याच्या आत एक पोकळी असते (Endometrial Cavity) कोणताही फायब्राईड या पोकळीत असेल, तर अतिरिक्त रक्तस्राव होतो व त्याचबरोबर पोटात मासिक पाळीच्या दरम्यान  वेदना होत राहतात. अशा प्रकारची गाठ एंडोस्कोपी अर्थात हिस्टरोस्कोपीद्वारे पोटाला कोणताही छेद न होता अगदी जननमार्गाद्वारे काढता येते. अशा प्रकारच्या गाठीला  काढावेच लागते. पोकळीतील गाठ खूप मोठी झाली असल्याससुद्धा पोटातून ती गाठ लॅप्रोस्कोपी किंवा पारंपरिक शस्त्रक्रियेद्वारे काढणे शक्य असते व काढावीच लागते. कारण, रजोनिवृत्तीपर्यंत अशा गाठीमुळे जास्तीचा रक्तस्राव होत राहतो. गर्भाशयाच्या पृष्ठभागावरच्या गाठी काढल्या नाही तरी चालतात; पण जर असा एखादा फायब्रॉईड देठ असेल, तर त्या देठास पिळा पडला तर त्याचे ऑपरेशन अथवा लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करावी लागते.

जर फायब्राईड गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये असेल, व त्याचा गर्भाशयाच्या पोकळीवर दाब येत असल्यास ही गाठ काढावी लागते. आपण पाहिले असेल, कोणत्याही कारणाने गर्भाशयच काढावे लागते, असे नाही. परंतु, जोपर्यंत स्त्रीचे स्त्रीबिजांड Oestrogen तयार करते तोपर्यंत फायब्राईडची गाठ काढल्यानंतर इतर सूक्ष्म (लहान) असलेल्या गाठी पुन्हा मोठ्या होऊन त्रास देणार नाहीत, याबद्दल खात्री देता येत नाही. तसेच अतिरिक्त रक्तस्राव व मूत्राशयावर दाब, गुद्द्वारावर दाब येत असल्यास फायब्राईडच्या गाठी काढाव्या लागतात. शेवटी, अगदी रजोनिवृत्ती झाल्यानंतरसुद्धा एखाद्या स्त्रीस आपले गर्भाशय काढायचे नसेल, तर गर्भाशय न काढता फायब्राईडच्या गाठी काढून तक्रारी दूर करता येतात. मोठ्या गाठी दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे काढत असताना त्याचे मशिनद्वारे छोटे छोटे तुकडे करून पोटाला मोठा छेद न घेता काढता येतात.

फायब्राईड काढायच्या शस्त्रक्रियेशिवाय नवीन औषधे, गोळ्या घेऊन तात्पुरती रक्तस्राव व वेदनेपासून मुक्तता करता येते. तसेच रेडिओफ्रिक्वेन्सीद्वारे गाठ छोटी करता येते. तसेच MRI / USG Guided Focused Ultrasound Surgery (FUS) करता येते. यात पोटावर कोणताच छेद द्यावा लागत नाही. यात फायब्राईडचा आकार 40 टक्के कमी करून वेदना व रक्तस्रावाची तक्रार कमी करता येते. आता जागोजागी एंजिओग्राफी करणारी मशिन्स आहेत. त्याद्वारे फायब्राईडला दिला जाणारा रक्तपुरवठा खंडित करता येतो व पोटातल्या पोटात फायब्राईड लहान करणे शक्य आहे.

थोडक्यात, फायब्राईडच्या गाठींनी ग्रस्त असलेले गर्भाशय न काढता इतर अनेक पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत. तेव्हा स्त्रीच्या वयाच्या 40 ते 45 वर्षांपूर्वी गर्भाशय काढण्याचा सल्ला मिळाला असेल, तर इतर उपचारांबद्दल चौकशी करणे रास्त आहे.

शेवटी, फायब्राईडची गाठ म्हणजे गाठ काढणे किंवा गर्भाशय काढणे हाच उपाय नसून, अनेक विविध उपचार आज उपलब्ध आहेत. याचा ज्या त्या स्त्रीप्रमाणे वेगळा विचार करावा लागतो. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रत्येक पेशंटचा सदरा मापाप्रमाणे शिवावा लागतो. उक्ते (Readymade) कपडे जसे चपखल बसत नाहीत, तसे त्या पेशंटानुरुप उपचारपद्धतीचा अवलंब करावा लागतो. So it is tailor made, not readymade answer to any problem in Modern medicine. यानंतर आपण गर्भाशयाचा अतिरिक्त रक्तस्रावाबद्दल पाहू.

DUB अर्थात Dysfunctional Uterine Bleeding गर्भाशयाचा कोणताही विकार फायब्रॉईडच्या गाठी, इतर गाठी किंवा कोणतीही चिन्हे आढळत नसताना मासिक पाळी अथवा मासिक पाळीव्यतिरिक्त होणारा रक्तस्राव म्हणजे DUB.

अशा गर्भाशयात बाह्यरूपी सोनोग्राफी, सिटीस्कॅन अथवा एमआरआयद्वारे निदान होत नाही व केवळ गर्भाशयावर होणार्‍या ostrogen स्त्री संप्रेरकाच्या अतिरिक्त परिणामामुळे होणारा जास्तीचा रक्तस्राव असे म्हणता येईल. यासाठीसुद्धा गर्भाशय काढावेच लागते, असे नाही तर TCRE किंवा Baloon Ablation म्हणजे गर्भाशयात गरम पाणी असलेला फुगा ठरावीक कालावधीसाठी ठेवून Endometrium चा जनक असलेल्या पेशी नष्ट करता येतात व गर्भाशय काढायचे टाळता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news