थंडीत घ्या बाळाची काळजी | पुढारी

थंडीत घ्या बाळाची काळजी

लहान मुलांच्या बाबतीतील रोगाची लक्षणे, त्यांची कारणे निश्चित माहीत असल्यास आपण त्यावर वेळीच उपाययोजना करून ‘आजाराची लांबड लागणे’ ही गोष्ट निश्चितपणे टाळू शकतो. त्यासाठी बाळाचे (बाळाची काळजी) थंडीपासून रक्षण करणे, योग्य असा आहार दिल्यास आणि डॉक्टरांच्या औषधांबरोबरच थोडेसे घरगुती उपचार केल्यास आजार लवकर तर बरे होतातच; पण त्याचा पुनर्उद्धभवही टाळू शकतो.

थंडीमध्ये दिसणारे विकार :

शिंका येणे, नाक गळणे, नाक चोंदणे, सतत सर्दी वाहने, खोकला, श्वास लागणे, कान खाजवणे या तक्रारींबरोबरच काहींमध्ये अपचन, जुलाब, भूक न लागणे हे पोटाचे विकार दिसतात. मुलांचे अंग फुटणे, ओठ फुटणे, अंग खाजवणे, त्वचेची आग होणे आणि या सगळ्यांच्याच परिणामी सतत किरकिर किंवा अस्वस्थपणा, वारंवार होणार्‍या औषधांच्या मार्‍यामुळे चिडचिडेपणा या तक्रारी आढळतात.

उपाययोजना :

ताप, सर्दी झाल्यावर मुलांची काहीही खाण्याची इच्छा होत नाही. परंतु; आईला मुलाने काहीतरी खावे असे सतत वाटते. त्यामुळे खाण्याची बळजबरी केली जाते. कफ वाढविणारे पदार्थ दिले जातात. त्यामुळे कित्येकदा अग्रिमांद्य होऊन लक्षणे वाढल्याची आढळतात. म्हणून कडकडून भूक लागेपर्यंत अजिबात खाण्याचा आग्रह करू नये, ही पहिली गोष्ट सर्व पालकांनी सांभाळावी. या कफाच्या विकारात डॉक्टरांच्या सल्ल्याने होणार्‍या औषधोपचारांबरोबर घरगुती उपचारही चालू करावेत.

सर्दी, खोकला, ताप :

1) आल्याचा तुकडा + तुळशीची पाने यांचा काढा द्यावा 2) सर्दी अधिक असल्यास वेखंड चूर्ण + मध चाटवावे, 3) ज्येष्ठमध + तुळस + लवंग यांचा काढा घेतल्याने खोकला कमी होतो. 4) कफ जास्त प्रमाणात असल्यास ज्येष्ठमध + दालचिनी + काळे मिरे + तुळस + खडीसाखर असा काढा द्यावा 5) ताप उतरल्यानंतरही सर्दी, खोकला असेल तर छातीला आणि पाठीला तिळाच्या तेलाने मालीश करून शेकावे 6) सर्दीने डोके दुखत असल्यास सुंठ + वेखंड यांचा लेप कपाळावर लावावा.

पोटाच्या तक्रारी :

वाढलेल्या कफाच्या परिणामी अपचन, भूक न लागणे, पोट फुगणे, जुलाब होणे या पोटाच्या तक्रारी बर्‍या झाल्याशिवाय सर्दी, खोकला कमी झालेला आढळत नाही.

1) दूध + आल्याचा तुकडा किंवा दूध + सुंठ उकळून द्यावे. 2) आल्याचा रस + मधाचे चाटण घ्यावे. 3) ओवा आणि गरम पाणी पाजावे. 4) चिकट जुलाब होत असल्यास सुंठ, तूप आणि गूळ यांची गोळी करून द्यावी. 5) पोटदुखीसाठी हिंग आणि मधाचे चाटण करावे. 6) पोटावर हिंग आणि ओवा यांचा लेप करावा व पोट शेकावे.

त्वचेच्या तक्रारी :

1) फुटलेल्या अंगावर तिळाचे तेल लावावे, 2) कोकम तेल गरम करून पातळ करून लावावे, 3) अंघोळीवेळी साबणाचा वापर टाहून डाळीचे पीठ + दूध लावावे, 4) मुले दिवसभर मातीत खेळतात म्हणून झोपताना गरम पाण्याने हातपाय धुवावेत व मग तेल लावावे, 5) पायाला भेगा पडल्यास एरंडेल तेल चोळून लावावे, झोपताना सॉक्स घालावे, 6) ओठ फुटले असता ओठाला तूप किंवा दुधाची साय लावावी.

आहार-विहार :

* आजाराची लक्षणे कमी झाल्याबरोबर अतिप्रमाणात खाणे, थंड पाणी पिणे, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, मिल्क शेक, आंबट फळे कधीही देऊ नयेत.

* काही मुलांना दही खूप आवडते. परंतु; या दिवसात दही देऊ नये. त्याऐवजी दुपारच्या वेळी थोडेसे ताक दिले तरी चालेल.

* गरम गरम ताजा, पचायला हलका असा आहार द्यावा. केवळ दूध जास्त प्रमाणात न देता विविध खिरी, लापशी यात सुंठ घालून द्यावे.

* नेहमीचे दूध सुंठ घालून द्यावे. सर्दी असताना त्याच्या जोडीलाच हळद आणि वेखंड वापरावे. यामुळे काही काळाने प्रतिकारशक्ती वाढते.

* आहारात फळभाज्या, पालेभाज्यांचे कडन; त्यामध्ये जिरे, ओवा, हिंग यांचा वापर करून द्यावे.

* थंडीपासून (बाळाची काळजी) बचाव करणारे ऊबदार कपडे नियमित वापरून याच्या जोडीलाच फॅनचा किंवा ए.सी.चा वापर कटाक्षाने टाळावा.
याप्रमाणे आयुर्वेदातील या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केल्यास आपल्या बालकासाठीसुद्धा कडाक्याची थंडी शत्रू न ठरता इतरांसारखीच हेल्दी सीझन होऊ शकते.

आनंद ओक

Back to top button