‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता कशी भरून काढाल? | पुढारी

‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता कशी भरून काढाल?

अनेक नैसर्गिक स्त्रोतांद्वारे ‘अ’ जीवनसत्त्वाची पूर्तता करता येते. परंतु; ‘अ’ जीवनसत्त्व याची कमतरता भरून काढण्यासाठी गोळ्या अथवा औषधे घेताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा; अन्यथा नव्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

‘अ’ जीवनसत्त्व हे चरबीमध्ये मिसळणारे आहे. ते प्रामुख्याने रेटीनॉईड आणि कॅरोटीनॉईड या दोन रूपांत आढळते. भाज्यांचा रंग जेवढा गडद आणि चमकदार, त्यामध्ये कॅरोटीनॉईडचे प्रमाण तेवढेच जास्त असते. आतापर्यंत जवळपास 600 प्रकारच्या कॅरोटीनॉईडबाबतची माहिती आहे. मात्र, बिटाकॅरोटीन, अल्फाकॅरोटीन आणि बिटा-जॅन्थोफिल सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यांना ‘प्रोव्हिटॅमिन ए’ असे म्हणतात. विशेष परिस्थितीत शरीर यांना रेटीनॉईडमध्ये परावर्तित करून घेते.

‘अ’ जीवनसत्त्वाची गरज –

‘अ’ जीवनसत्त्वाला रेटीनल असेही म्हणतात. कारण, हे डोळ्यांच्या रेटीनामध्ये पिग्मेंटस् उत्पन्न करते. ‘अ’ जीवनसत्त्व आपल्या डोळ्यांची दृष्टी राखण्याचे काम करते आणि कमी प्रकाशातही वस्तू बघण्यासाठी मदत करते. त्वचा, दात, हाडे, म्युकसमेंब्रेन यासाठी गरजेचे आहेच. पण त्याचबरोबर प्रजनन आणि स्तनपानासाठीही आवश्यक आहे.

रेटीनॉईड हे ‘अ’ जीवनसत्त्वाचे सक्रिय रूप आहे. शरीरात प्रोटीनची कमतरता जीवनसत्त्व ‘अ’च्या रेटीनॉईड स्वरूपाच्या कमतरतेचे कारण बनू शकते. चरबीमध्ये मिसळणारे असल्यामुळे ‘अ’ जीवनसत्त्वाच्या शोषणासाठी योग्य प्रमाणात चरबी आणि झिंकचेदेखील शोषण होणे अधिक आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्त्व हे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते.

त्यामुळे आपल्या पेशी अतिसक्रिय होण्यापासून बचावल्या जातात. यामुळे अनेक प्रकारच्या फूड अ‍ॅलर्जीचा धोका कमी होतो. ‘अ’ जीवनसत्त्व हे पेशींच्या सामान्य विकासासाठी आणि कार्यप्रणालीसाठी, प्रजननासाठी, पुरुषांमध्ये योग्य प्रमाणात स्पर्म तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्त्व हे एक अ‍ॅन्टीऑक्सिडंट आहे. अ‍ॅन्टीऑक्सिडंट हे पेशींना फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून बचाव करते. ‘अ’ जीवनसत्त्व हे हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आणि अनेक प्रकारच्या कर्करोगांपासूनही बचाव करते.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन ‘ए’ ची दोन मूलभूत रूपे आहेत. रेटीनॉईड हे दूध, दही आदीमध्ये आढळते आणि कॅरोटीनॉईड हे पालेभाज्यां आदींमध्ये आढळते. काही शारीरिक अवस्थांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाच्या रेटीनॉईड स्वरूपाची गरज असते. खासकरून प्रजनन, गर्भावस्था आणि स्तनपानादरम्यान मुलांच्या विकासासाठी, रातांधळेपणापासून बचाव करण्यासाठी, लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यासाठी, संक्रमणापासून सुरक्षितता राखण्यासाठी याची भूमिका महत्त्वाची असते.

या समस्या नसल्या तरीही ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कॅरोटीनॉईड रूपाची गरज असते. याचाही आरोग्यावर तितकाच परिणाम होत असतो. बहुतेक कॅरोटीनॉईड हे अ‍ॅन्टीऑक्सिडंटप्रमाणे काम करते. वेगवेगळे कॅरोटीनॉईड आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करते. उदाहरणार्थ- मानवी डोळ्यांच्या रेटीनामध्ये केवळ जॅन्थोफिल ल्युटीन आणि जी एक्सेनथीन भरपूर प्रमाणात असते.

स्वास्थ्यपूर्ण राहण्यासाठी दोन्ही प्रकारच्या ‘अ’ जीवनसत्त्वांचे सेवन केले पाहिजे. कॅरोटीनॉईड हे स्वरूप विशेष स्थितीत रेटीनाईड रूपात परिवर्तित होते. अल्फाकॅरोटीन, बिटाकॅरोटीन आणि बिटाक्रिप्टोजेंथीन हे व्हिटॅमिन-एची आणखी तीन रूपे आहेत. हे आपल्या शरीरात निश्चित परिस्थितीत रेटीनॉईड स्वरूपात परिवर्तित होतात.

मात्र, आनुवंशिक कारणे, पचनासंबंधी समस्या, पचनमार्गात जीवाणूंचे असंतुलन, मद्याचे अत्याधिक सेवन आणि काही औषधांच्या प्रभावामुळे हे घटक शोषून घेण्यास समस्या निर्माण होते. आपण खूप अधिक प्रमाणात कॅरोटीनॉईड घेत असाल तरीही ते रेटीनॉईड रूपात परिवर्तित होण्यामध्ये समस्या येते.

व्हिटॅमिन-एच्या रेटीनॉईड प्रकाराचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होऊन ती घातक स्तरापर्यंत पोहोचते. रक्तात ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण 50 एनएम/एल. आहे आणि रोज 2000 मायक्रोग्रॅम रेटीनॉईड रूपातील ‘अ’ जीवनसत्त्व घेतले गेले तर ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण आणखी वाढेल आणि ते हाडांसाठी अत्यंत हानिकारक ठरेल. म्हणूनच ‘अ’ जीवनसत्त्व हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंटच्या रूपात कधीही घेऊ नये.

शाकाहारी व्यक्तींना आणि मद्यपान करणार्‍या व्यक्तींना ‘अ’ जीवनसत्त्वाची अधिक गरज असते. यकृताचे आजार, सिस्टिक फायब्रोसिस आदींद्वारे पीडित लोकांनाही ‘अ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. अनेक लोक समजतात की, ‘अ’ जीवनसत्त्वम्हणजे केवळ एक विशेष पदार्थ असतो. मात्र, यामध्ये पोषक घटकांची एक विस्तृत शृंखला असते. प्रत्येक पौष्टिक पदार्थाचे स्वतंत्र लाभ असतात. अधिक प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्वाचे सेवन ‘के’ जीवनसत्त्वाच्या शोषणावर परिणाम करते. चरबीत मिसळणारे ‘के’ जीवनसत्त्व हे रक्त गोठवण्यासाठी गरजेचे असते.

अत्याधिक प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्वाचे सेवन केले तर ते विषारी ठरू शकते. नवजात बालक आणि लहान मुले ‘अ’ जीवनसत्त्वाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यांना जर ‘अ’ जीवनसत्त्व अथवा ज्या उत्पादनांमध्ये ‘अ’ जीवसत्त्व असते, त्याचा अधिक डोस दिला तर ती अधिक आजारी पडतात. म्हणूनच नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सने भिन्न वयोगटांसाठी त्याची उच्चतम सीमा निश्चित केली आहे.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button