मणक्याचे आरोग्य जपा - पुढारी

मणक्याचे आरोग्य जपा

मणक्याचे आरोग्य बिघडले की पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी यासारखे त्रास सुरू होतात. आपल्या बसण्याच्या, उभ्या राहण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे मणक्यावर ताण पडतो. त्यामुळेच पाठीची, मानेची, कमरेची दुखणी चालू होतात.

सायटिका, स्लिपडीस्क, स्पाँडिलायटीस यासारखी दुखणी मणक्याचे आरोग्य बिघडल्यामुळे उद्भवतात. सायटिका हे दुखणे पाठीजवळचे स्नायू दुखावल्यामुळे, कमकुवत झाल्यामुळे निर्माण होते. चुकीच्या स्थितीत बराच वेळ बसून राहिल्यानेही ही व्याधी उद्भवते. शहरांमध्ये दुचाकी चालवत असताना आपले आपण कसे बसलो आहोत याकडे लक्ष नसते. दुचाकी चालवत असताना पोक काढून अथवा वाकून बसल्यामुळे आपल्या मणक्यावर ताण येत असतो. तसेच रस्त्यावरील खड्ड्यातून वाहन गेल्यास त्याचाही ताण मणक्यावर पडतो. त्यातूनच स्लिपडीस्कसारखी दुखणी आपल्या मागे लागतात.

अलीकडे सर्वच जणांना संगणकावर काम करावे लागते. तासन्तास खुर्चीत संगणकासमोर बसून काम करण्याची जीवनशैली आपल्या आयुष्याचा भाग झाली आहे. मात्र संगणकासमोर खुर्चीत बसताना आपण चुकीच्या पद्धतीने म्हणजे कमरेत वाकून बसलो तर त्यातूनही आपल्याला मान, खांदादुखी यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागते. म्हणून कॉम्प्युटरसमोर बराच वेळ बसताना ताठ बसायला शिका. खुर्चीत ताठ बसलात तरच अशी दुखणी आपल्यामागे लागणार नाहीत.

तरुणांमध्ये सायटिका, स्पाँडिलॉसीसीस यांसारखी दुखणी प्रामुख्याने आढळून येत आहेत. 20 ते 30 या वयोगटातील मुलांना अशी दुखणी सतावत आहेत. याचे कारण प्रामुख्याने खुर्चीत बसण्याची चुकीची पद्धत हेच आहे. आपल्या पाठीच्या कण्याचे आरोग्य ठिकठाक राहावे याकरिता आपली जीवनशैलीही बदलण्याची गरज आहे.

हल्लीच्या काळात लहान मुलांना अनेक इलेक्ट्रॉनिक खेळ दिले जातात. कॉम्प्युुटर गेम्स वगैरेसारखे खेळ मुले तासन्तास खेळत असतात. बैठ्या पद्धतीचे हे खेळ मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे ठरतात. लहान मुलांना मैदानावर जाऊन खेळायची सवय लावायला हवी. त्याऐवजी मुले कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर तासन्तास गेम्स खेळू लागली तर त्यांच्या मानेचे आणि पाठीच्या कण्याचे कार्य बिघडून जाते. म्हणूनच लहान मुलांना असे खेळ खेळायला देऊ नयेत. लहानपणी त्याचे परिणाम जाणवत नाहीत. मोठेपणी पाठ आणि मानेचे अनेक आजार यामुळे उद्भवतात.

उभे राहताना, चालताना आपण सरळ म्हणजे ताठ उभे राहण्यास शिकले पाहिजे. कोणत्याही स्थितीत एक तासापेक्षा अधिक वेळ राहू नका. म्हणजे खुर्चीत बसला असाल तर एक तासाने उठून उभे राहा, तसेच एक तास उभे राहिला असाल तर लगेच थोडावेळ बसून घ्या. सततच्या उभे राहण्यानेही पाठीच्या कण्यावर ताण येत असतो.

म्हणूनच सतत बसावे लागत असेल किंवा कामाकरिता उभे राहावे लागत असेल तर मधूनअधून बसत जा किंवा उभे राहात जा. आपले काम बैठे आहे की उभे आहे, यावर हा निर्णय घ्यायचा असतो. ऑफिसमध्ये काम करीत असताना दीर्घकाळ खुर्चीत बसून राहणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर घरी आल्यावर बेडवर झोपून टीव्ही पाहण्याचा कार्यक्रमही टाळला पाहिजे. खुर्चीत बसताना आपल्या पाठीच्या खालच्या भागाला आधार मिळेल, अशा पद्धतीने बसले पाहिजे. लॅपटॉप वापरणार्‍या मंडळींनी बसताना खूपच काळजी घेतली पाहिजे.

डॉ. संतोष काळे

Back to top button