हिपॅटायटीस चा धोका - पुढारी

हिपॅटायटीस चा धोका

दैनंदिन होणार्‍या छोट्या-छोट्या चुका अनेकदा मोठ्या समस्येला जन्म देतात. हिपॅटायटीस हा आजारदेखील आवश्यक दैनंदिन कामांमध्ये करण्यात येणार्‍या दुर्लक्षामुळे होतो. स्वच्छता, योग्य खाणे-पिणे यांसारख्या गोष्टींवर थोडेसे लक्ष दिले तर या आजारापासून बचाव करता येतो.

यकृतावर सूज आली म्हणजे त्याला हिपॅटायटीस अर्थात कावीळ असे म्हणतात. हा आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये वेगवेगळी औषधे, अल्कोहोल आणि काही खास प्रकारच्या आरोग्य समस्या यांचा समावेश असतो. मात्र, बहुतेक बाबतीत हा आजार विषाणूंमुळे होतो; ज्यामुळे यकृताचे नुकसान होते. हा आजार अ, ब आणि क या प्रकारांत होतो.

लक्षणे : अनेकदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात कुठलेही लक्षण दिसत नाही. मात्र, संसर्ग झाल्यानंतर या आजाराच्या तीनही प्रकारांत अशक्तपणा, चक्कर येणे, भूक कमी होणे, पोटात दुखणे, बारीक ताप, त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळेपणा अशी लक्षणे दिसतात. ज्यावेळी हिपॅटायटीस-बी आणि सी हा प्रकार क्रॉनिक होतो, तेव्हा जवळपास एक वर्षापर्यंत या आजाराचे कुठलेही लक्षण दिसत नाही. मात्र, काळासोबत कुठलीही सूचना न देता लिव्हर आधीच डॅमेज झालेले असते.

हिपॅटायटीस-ए : हा वेगाने पसरणारा संसर्ग असतो. सामान्यपणे हा प्रकार व्यक्तीला थोड्या प्रमाणात आजारी बनवतो. अनेकांना आपण आजारी आहोत हे समजतही नाही. हा विषाणू काही काळानंतर आपोआप जातो आणि लिव्हरला कुठलीही हानी पोहोचत नाही. हिपॅटायटीस-ए हा प्रामुख्याने संक्रमित अन्न अथवा पाण्यापासून पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या मळाद्वारेदेखील हा आजार पसरतो. न धुतलेल्या भाज्या, फळे, अर्धवट शिजवलेले अन्न ही काही सामान्य कारणे आजार पसरवू शकतात. डे केअर सेंटरद्वारेसुद्धा हा आजार पसरण्याची शक्यता असते. तेथील कर्मचारी लहान मुलांचे डायपर बदलल्यानंतर हात स्वच्छ करत नसतील तर त्यांना धोका असतो. तसेच अधिक प्रवास करणार्‍या लोकांना देखील त्याचा धोका असतो. प्रवासादरम्यान बाहेरचे कच्चे अन्न खाल्ल्यामुळे किंवा दूषित पाण्यामुळे याचा धोका वाढतो.

हिपॅटायटीस-बी : ज्या लोकांना हा आजार होतो, त्यांच्यात अतिशय अल्प लक्षणे दिसतात. ही लक्षणे काही दिवसांत आपोआपच बरी होतात. मात्र, काही लोकांमध्ये याचा संसर्ग शरीरातून जात नाही. त्याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. 90 टक्के मुलांमध्ये ज्यावेळी या विषाणूंचा संर्सग होतो, तेव्हा त्यांच्यामध्ये तो दीर्घकाळ राहतो. क्रॉनिक हिपॅटायटीस-बीमध्ये लिव्हर डॅमेज, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे संक्रमण व्यक्तीचे रक्त, बॉडी फ्लूईड आणि असुरक्षित शारीरिक संबंध यांमुळे होते. अनेकदा हे संक्रमण संक्रमित व्यक्तीची सुई, रेझर किंवा टूथब्रश यांसारख्या वस्तूच्या वापरामुळे देखील पसरतेे. हा अजार आईकडून गर्भातील बाळालाही होऊ शकतो.

हिपॅटायटीस-सी : जवळपास 25 टक्के लोक हिपॅटायटीस-सीच्या विषाणूंच्या संसर्गापासून बाहेर पडतात; पण बहुतेक लोकांमध्ये हा विषाणू दीर्घकाळ राहतो. क्रॉनिक हिपॅटायटीस-सीच्या अवस्थेत अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. यामध्ये लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर याचीही शक्यता असते. यातील चांगली गोष्ट म्हणजे, या विषाणूंवर उपचार करता येतात आणि लिव्हरवर होणारा याचा परिणाम कमी करता येतो.

आजार कसा पसरतो? : हा आजार संक्रमित रक्ताद्वारे पसरतो. तसेच संक्रमित इंजेक्शनमुळे हा आजार होण्याचा धोका असतो. टॅटू किंवा बॉडी पिअर्सिंगमध्ये जर संक्रमित सुईचा वापर केला तर एकाकडून दुसर्‍याला होण्याची शक्यता असते. एचआयव्हीसारख्या कारणांमुळेे देखील हा आजार पसरण्याचा धोका असतो. ज्या लोकांना चुकीचे इंजेक्शन दिले जाते, त्यांना हा धोका अधिक असतो. अनेक वर्षांपूर्वी टोचलेले इंजेक्शन देखील क्रॉनिक हिपॅटायटीस-बीचे कारण बनू शकते.

आजाराची ओळख कशी करावी? : क्रॉनिक हिपॅटायटीस कुठल्याही प्रभावी लक्षणाशिवाय लिव्हरला प्रभावीत करू शकतो. मात्र, असे असले तरी संसर्ग ओळखता येऊ शकतो आणि त्यावर इलाज करू शकतो. रक्ताच्या तपासणीद्वारे व्यक्तीला विषाणूजन्य कावीळ आहे की अन्य प्रकारची, हे ओळखता येते.

चाचणी जर पॉझिटिव्ह आली तर कुटुंबातील लोकांना यापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा. हिपॅटायटीस-ए पासून बचाव करण्यासाठी आपले हात वारंवार स्वच्छ करावेत. हिपॅटायटीस-बी आणि सीच्या स्थितीत आपल्या वैयक्तिक वस्तू म्हणजे नेलकटर, रेझर, टूथब्रश यांसारख्या वस्तू दुसर्‍यांना देऊ नयेत.

घरातील प्रत्येक व्यक्तीने हिपॅटायटीस- बीची लस टोचून घ्यावी. ए आणि बी दोन्ही प्रकारची लस उपलब्ध असून, लहानपणीच हे लसीकरण करून घ्यावे. हिपॅटायटीस-ए मध्ये 99 टक्के लोक बरे होतात. मात्र, एक टक्का लोक यामुळे गंभीरपणे आजारी पडून कोमात जाऊ शकतात.

हिपॅटायटीस-बी आणि सी होण्याचे प्रमुख कारण संक्रमित सुया हे असते. ज्या लोकांना दहा वर्षांपासून हिपॅटायटीस-बी आहे, अशा दोन ते तीन टक्के रुग्णांना लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर सोरायसिस होण्याचा धोका असतो. गर्भवतींनी हिपॅटायटीसच्या संक्रमणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कारण, यामुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो.

डॉ. संतोष काळे

Back to top button