नागीण विकार : हे आहेत रामबाण उपाय - पुढारी

नागीण विकार : हे आहेत रामबाण उपाय

अचानकपणे उत्पन्न होणारा आणि त्यातून होणार्‍या तीव्र त्रासामुळे आणि त्याबद्दल असणार्‍या गैरसमजांमुळे माणसाच्या मनात भीती उत्पन्न करणारा एक विकार म्हणजे ‘नागीण’. त्याचप्रमाणे काही आजार झाल्यानंतर सुरुवातीपासूनच आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे प्रवृत्ती आढळते अशा विकारांपैकी एक विकार म्हणजे ‘नागीण’.

नागिणीबद्दलचे गैरसमज :

तुलनेने कमी प्रमाणात आढळणारा असल्याने या आजाराबद्दल अनेक गैरसमज समाजात आहेत. एक म्हणजे हा आजार करणीमुळे, नवस फेडायचे राहिल्यामुळे, लागीर झाल्यामुळे आदी दैवी कारणांनी होतो हा मोठा गैरसमज आजही ग्रामीण भागात आढळतो. एका बाजूला नागीण झाली असेल तर ती वाढत जाऊन दुसर्‍या बाजूला मिळाल्यास म्हणजे तिने विळखा घातल्यास माणूस जगत नाही, हा एक मोठा गैरसमज आहे.

या गैरसमजामुळेच अनेकवेळा हा विकार झाल्यावर तज्ज्ञांकडून उपचार घेण्याऐवजी मंत्रतंत्र करणारे, साधू, बाबा यांचा आसरा घेतला जातो. तर काहीवेळा कुठल्या तरी झाडपाल्याचे औषध पदवी नसणार्‍या, पण परंपरेने औषध देत राहिलेल्या भोंदू वैद्यांकडून घेतले जाते. या गोष्टींमुळे अनेक रुग्णांत आजार बळावून रुद्र रूप धारण करतो. तसेच काही वेळा तर अशा दुर्लक्षामुळे डोळ्यासारखा महत्त्वाचा अवयवही गमावलेले पाहायला मिळतात.

विकाराची उत्पत्ती :

‘हरपीस झोस्टर’ या विषाणूमुळे हा विकार होतो. रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या माणसात याचा प्रादुर्भाव झाल्याने मणक्यातून बाहेर पडणार्‍या व त्वचेकडे जाणार्‍या नाड्यांमध्ये आणि संबंधित त्वचेमध्ये या विकाराची उत्पत्ती होते. उष्ण प्रकृतीचा तसेच पित्त वाढविणार्‍या पदार्थाचे प्रमाण जास्त असणार्‍या व्यक्तींमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात लवकर होत असल्याचे आढळते.

नागीण विकाराची लक्षणे :

पाठ, काख, छाती या क्रमाने नाडीच्या विस्तार मार्गावर वेदना, अस्वस्थता, स्पर्श सहन न होणे, बारीकसा ताप ही प्राथमिक लक्षणे जाणवतात. त्वचेवर नाडीच्या मार्गावर भाजल्याप्रमाणे फोड येतात. त्यामध्ये स्राव असतात. काही वेळा पू आढळतो. त्या जागेवर वेदना व दाह वाढतो. बहुतेक वेळा शरीराच्या कोणत्या तरी एका बाजूला वरील लक्षणे येतात. साधारण 2 ते 3 आठवड्यांत हे फोड फुटून खपल्या धरतात. काळे डाग शिल्लक राहतात. काही वेळा विकाराचा प्रादुर्भाव चेहर्‍यांशी संबंधित नाड्यांवर झालेला आढळतो. उदा. डोळा सुजणे, लाल होणे, द़ृष्टी कमी होणे ही डोळ्यांची, तर नाकात फोड येणे, घसा सुजणे, कान दुखणे अशी इतरही लक्षणे पाहावयास मिळतात.

नागिणीचे उपद्रव :

वयस्कर माणसांमध्ये नागीण होऊन गेल्यानंतर संबंधित जागेवर तीव्र वेदना, अस्वस्थता राहिलेली आढळते. काही लोकांना त्या जागेवर दाह, टोचल्याप्रमाणे, मुंग्या आल्याप्रमाणे संवेदना होत राहतात. काही जणांत उन्हात फिरल्यानंतर, उष्णतेजवळ काम केल्यानंतर गरम पाण्याच्या स्पर्शाने हा त्रास वाढलेला आढळतो.

नागिणीवरील आयुर्वेदिक उपचार :

स्थानिक उपचार :

चंदन, वाळा, दूर्वा, कमळ, निंब, सारिवा, तांदूळ, आवळा इत्यादींनी युक्त लेप त्वचेवर लावणे. त्यामुळे आलेले फोड बसून या परिसरातील सूज कमी होते. नंतरच्या काळात याच औषधांनी सिद्ध केलेले तेल हलक्या हाताने लावले जाते. पोटातून प्रवाळ, रांजीरे मौक्तिक भस्म निंब, त्रिफळा, सारिवा, मंजिष्ठा, गंधक, वाळा, चंदन इत्यादी औषधांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली विविध औषधे, गोळ्या रुग्णांच्या प्रकृतीनुसार दिल्या जातात.

विशेष सूचना :

एचआयव्ही विषाणूंचा शरीरात प्रादुर्भाव झाल्यावर काही रुग्णांत सुरुवातीच्या काळात नागीण हा विकार झालेला आढळतो. त्यामुळे नागीण हा विकार झालेल्यांनी लगेचच आपल्या रक्ताची एचआयव्हीसाठी केली जाणारी तपासणी करून घ्यावी व शंकानिरसन करावे. अर्थात, नागीण झालेल्या प्रत्येक रुग्णात हा दोष असतोच असे नाही; पण दुर्दैवाने एचआयव्हीचा दोष झालेला आढळल्यास वरील औषधांबरोबरच रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी, रक्तशुद्धी करणारी अशी सादिक औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरित सुरू करावी. लागतात.

डॉ. आनंद ओक

Back to top button