जैविक घड्याळ : निरोगी जीवनासाठीची दिनचर्या - पुढारी

जैविक घड्याळ : निरोगी जीवनासाठीची दिनचर्या

प्रमोद ढेरे

2017 मध्ये अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेत्या तीन शास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील जैविक घड्याळाचे गुपित उघड केले. मानवी शरीरामध्ये एक जैविक घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक सक्रिय असते, ज्याला अवयवांचे घड्याळ असेही म्हणतात. या जैविक घड्याळाप्रमाणे मानवी शरीर दिवसभर कार्यरत राहते. हे जैविक घड्याळ मानवी शरीराला नियंत्रित करत असते. यामध्ये बदल केला तर त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात व विविध आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे जैविक घड्याळाप्रमाणे आपण आपली दिनचर्या निश्चित केली, तर आपण निरोगी जीवनाचा दीर्घकाळ आनंद घेऊ शकतो.

जैविक घड्याळ प्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी दोन-दोन तासांचा कालावधी मिळत असतो. त्या-त्या अवयवांसाठी राखून ठेवलेल्या त्या-त्या दोन तासांच्या कालावधीमध्ये ते-ते अवयव अधिक सक्रिय असतात. त्या-त्या कालावधीमध्ये त्या-त्या अवयवांकडे रक्ताभिसरण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असते किंवा आपण असे म्हणू शकतो, की त्या-त्या अवयवासाठी राखून ठेवलेल्या त्या-त्या कालावधीमध्ये आपल्या शरीरातील प्राणशक्ती त्या-त्या अवयवाच्या ठिकाणी काम करत असते.

पहाटे तीन ते पहाटे पाचपर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपली फुफ्फुसे अधिक सक्रिय असतात. अशावेळी मोकळ्या हवेत श्वसनाचे व्यायाम करावेत ज्यायोगे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. या कालावधीमध्ये श्वसनाचे व्यायाम केल्यास आपली फुफ्फुसे अधिक ऊर्जावान होतात म्हणजेच रिचार्ज होतात.

पहाटे 5 ते सकाळी 7 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले मोठे आतडे अधिक सक्रिय असते. अशावेळी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिऊन मलविसर्जन करावे. मलविसर्जनाचा नैसर्गिक वेग याच वेळेत असतो. अशाप्रकारे जे नियमितपणे याच वेळेत मलविसर्जन करतात त्यांना बद्धकोष्टतेचा त्रास कधीच होत नाही. मलविसर्जनानंतर या कालावधीमध्ये नियमितपणे व्यायाम करावा.

सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले पोट अधिक सक्रिय असते. हा काळ राजासारखं म्हणजे पोट भरून जेवायला उत्तम काळ असतो. त्यामुळे या वेळेत पोटभरून जेवावे.

सकाळी 9 ते सकाळी 11 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले प्लिहा व स्वादुपिंड अधिक सक्रिय असतात. या काळात पाचक रस स्रवत असतात. त्यामुळे सकाळी सात ते सकाळी नऊ या काळात आपण जे पोट भरून जेवतो त्याचे उत्तम प्रकारे पचन व्हायला लागते.

सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले हृदय अधिक सक्रिय असते. या काळात हृदय उत्तम प्रकारे पंपिंग करते. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थितपणे होते व शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन व न्यूट्रिशन व्यवस्थितपणे पोहोचवले जाते. याच काळात सकाळच्या जेवणानंतर जेव्हा चार तास पूर्ण होतात तेव्हा दुपारचे जेवण घ्यावे. साधारण दुपारी एक वाजता जेवावे व यावेळी पाचक रस स्रवण्यासाठी डाव्या कुशीवर पडून पंधरा-वीस मिनिटे ते अर्ध्या तासाची झोप घ्यावी. ज्याला आयुर्वेदामध्ये वामकुक्षी म्हणतात.

दुपारी 1 ते दुपारी 3 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले लहान आतडे अधिक सक्रिय असते. या काळात अन्न पचन झाल्यानंतर जो आहाररस तयार होतो तो लहान आतड्यातून रक्तात शोषला जातो व हा आहाररस रक्ताभिसरणाने संपूर्ण शरीरभर पोहोचवला जातो.

दुपारी 3 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले मूत्राशय अधिक सक्रिय असते. या काळात चयापचय प्रक्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात ते मूत्राशयात येतात. किडनीमध्ये गाळण प्रक्रिया, शुद्धीकरण होते व टाकाऊ पदार्थ, विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात आणि पुढे हे लघवीवाटे शरीराबाहेर टाकण्यात येतात.

संध्याकाळी 5 ते 7 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले मूत्रपिंड अधिक सक्रिय असते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य अधिक प्रभावीपणे चालू असते. या काळात संध्याकाळी सातच्या आत रात्रीचे जेवण करावे व रात्रीच्या जेवणानंतर रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी थोडं चालणं महत्त्वाचं आहे ज्याला शतपावली म्हणतात.

संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले हृदयाशय अधिक सक्रिय असते. हे रक्ताभिसरण संस्थेशी संबंधित आहे. या काळात पोषकतत्वे केशिका व पेशींपर्यंत पोहोचत असतात.

रात्री 9 ते रात्री 11 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये अंतस्रावी ग्रंथी अधिक सक्रिय होतात. या काळात अंतस्रावी ग्रंथींमधून संप्रेरके स्रवत असतात व पुन्हा भरली जातात म्हणजेच रिप्लॉनिश होतात. यावेळी झोप आणणारे मेलाटोनिन संप्रेरक बनत असल्यामुळे झोप लागायला लागते. या काळात रात्री अकराच्या आत झोपलेच पाहिजे तरच शरीराला पूर्ण विश्रांती मिळते. जशी भूकेची वेळ टळून गेली की भूक पळून जाते तसे झोपेचीही वेळ टळून गेली की, झोपही पळून जाते व भविष्यात निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. मात्र, या वेळेत नियमितपणे झोपणार्‍यांना भविष्यातही निद्रानाश होऊ शकत नाही. या कालावधीत आपल्या शरीरातील सर्व अवयव व सर्व सिस्टिम पुन्हा नव्या ऊर्जेने कार्यरत होण्यासाठी तयार होत असतात. त्यामुळे या कालावधीत झोपणार्‍यांना पुढील दिवस उत्साहात जातो.

रात्री 11 ते रात्री 1 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये पित्ताशय अधिक सक्रिय असते. या काळात झोपलेले असणे महत्त्वाचे आहे कारण, या काळात नवीन ऊर्जा आपल्या शरीरात साठायला लागते व ती पुढील दिवसभरात सर्व कामे करण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळेच या काळात झोप झाल्यावर पुढील दिवसभर उत्साही वाटते.

रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंतचा कालावधी-

या कालावधीमध्ये आपले यकृत अधिक सक्रिय असते. या काळातही झोपलेले असणे महत्त्वाचे आहे कारण, या काळात आपले यकृत शरीरशुद्धीकरणाचे महत्त्वाचे काम करत असते. या काळात जागे राहिले तर यकृत शरीरशुद्धीकरण नीट करू शकत नाही. त्यामुळे विषारी द्रव्य यकृतामध्येच राहतात व यकृत विषारी द्रव्ययुक्त बनते व त्या संबंधित आजार व्हायला लागतात. त्यामुळे रात्री अकरा ते तीन या काळात जर झोप व्यवस्थित झाली, तरच पुढील दिवस उत्साहात जातो.

त्यामुळे अशा या जैविक घड्याळाप्रमाणे म्हणजेच निसर्गचक्राप्रमाणे जर आपण आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली, तर आपण निश्चितपणे दीर्घकाळ निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकू

Back to top button