एन्डोमेट्रियोसिस ची समस्या | पुढारी

एन्डोमेट्रियोसिस ची समस्या

डॉ. प्राजक्ता पाटील

जगभरातील अनेक तरुणी एन्डोमेट्रियोसिस च्या समस्येने ग्रस्त आहेत. 25 ते 30 या वयोगटातील स्त्रियांमध्ये पोटदुखी आणि गर्भधारणा न होणे यासाठी हे एक मुख्य कारण आहे. ही समस्या झाल्यास गर्भाला खाली ढकलणार्‍या पेशी या ओव्हरीज किंवा गर्भाशयाच्या आसपासच्या जागी विकसित होतात. त्यामुळे वंध्यत्वही येऊ शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास ओटीपोटाला सूज येते.

एन्डोमेट्रियोसिस हा गर्भाशयात होणारा विकार आहे. त्यात एन्डोमेट्रियम पेशींमुळे गर्भाशयाच्या आत एक स्तर तयार होतो. गर्भाशयाच्या आतील स्तर तयार करणार्‍या या एन्डोमेट्रियम पेशी असामान्य प्रमाणात वाढतात आणि त्या गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतात. काही वेळा एन्डोमेट्रियमचा स्तर गर्भाशयाच्या बाहेरील आवरणाव्यतिरिक्त अंडाशय, आतडे आणि इतर प्रजननाशी निगडित अवयवांपर्यंत येतो. या स्थितीला एन्डोमेट्रियोसिस म्हणतात. वाढलेल्या एन्डोमेट्रियोसिसच्या स्तरामुळे प्रजननाची अंगे किंवा फेलोपियन ट्यूब, अंडाशयाची क्षमता यांच्यावर परिणाम होतो. एन्डोमेट्रियोसिस हा आजार स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव आणि वेदना होण्यासही कारणीभूत ठरतो. त्यामुळे स्त्रियांना खूप अडचणींचा सामना करावा लागतोच; पण त्यामुळे वंध्यत्वदेखील येऊ शकते. अर्थात, हा त्रास कोणत्याही बाह्यसंसर्गामुळे न होता शरीरातील अंतर्गत प्रणालीतील कमतरतेमुळे होतो.

एन्डोमेट्रियोसिस ही समस्या मासिक पाळीशी निगडित आहे. सर्वसामान्यपणे एन्डोमेट्रियल पेशी आपले कार्य व्यवस्थित करतात आणि मासिक पाळीनंतर या पेशींचे आवरण तुटते. हे आवरण तुटल्यानेच मासिक पाळीतील रक्तस्राव होत असतो. कारण गर्भाशयाबाहेर हा स्तर असेल तर तो तुटल्यानंतर रक्तस्राव होण्यास मार्ग नसल्याने त्या ठिकाणी इजा होते. तसेच आवरणामुळे अवयव चिकटू लागतात. ही अवस्था खूप वेदनादायक असते आणि यामध्ये रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणात होतो. याच एन्डोमेट्रियोसिस पेशींचा फैलाव अंडाशयापर्यंत झाल्यास अंडाशयावर सिस्ट तयार होतात.

एन्डोमेट्रियोसिसची लक्षणे-

या विकाराची काही प्राथमिक लक्षणे आहेत. त्यात मासिक पाळीच्या काळात ओटीपोटात खूप जास्त वेदना होतात. काही महिलांना स्नायूंना ओढ बसते. ज्याच्या वेदना मासिक पाळीच्या वेदनांच्या तुलनेत तीव्र असतात आणि जास्त काळ झाला की, वेदना अधिक तीव्र होऊ लागतात. त्याशिवाय एन्डोमेट्रियोसिसच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणेही पाहायला मिळतात.

* मासिक पाळीच्या सुरुवातीला स्नायू ओढल्यासारखे वाटतात आणि वेदना सुरू होतात. मासिक पाळीनंतरही या वेदना कामय राहातात आणि शरीराच्या खालच्या भागात खूप अधिक वेदना होतात. या शारीरिक परिस्थितीत मलमूत्र विसर्जन करण्यासही त्रास होतो.
* वंध्यत्वाच्या तपासणीदरम्यान अनेक महिलांमध्ये एन्डोमेट्रियोसिसची लक्षणे आढळून येतात.
* लैंगिक संबंध येताना किंवा संबंधांनंतर वेदना होणे ही गोष्ट एन्डोमेट्रियोसिसमध्ये अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे.
* खूप जास्त रक्तस्राव होणारी मासिक पाळी किंवा दोन मासिक पाळींच्या दरम्यान होणारा रक्तस्राव.
* त्याशिवाय थकवा, बद्धकोष्ठता, चक्कर येणे आणि मासिक पाळीदरम्यान मळमळ ही देखील सर्वसामान्य लक्षणे आहेत.

कारणे –

प्रजनन अवयव किंवा गर्भाशय आणि गर्भाशय पोकळीतील अंतस्तर एम्ब्रोनिक पेशींपासून तयार होतो. जेव्हा या स्तराचा छोटासा भाग एन्डोमेट्रियल पेशींमध्ये बदलतो, तेव्हा एन्डोमेट्रियोसिसचा त्रास उत्पन्न होतो.

मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव, एन्डोमेट्रियल पेशी यांचा स्तर सुटतो किंवा तुटतो त्यामुळे होत असतो. पण मासिक पाळीत बाहेर पडणारे रक्त बाहेर न पडता ओटीपोटाच्या किंवा उदरपोकळीत जमा होऊ लागते. तेव्हा या स्थितीला रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन म्हटले जाते.

शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये होणार्‍या इजांमध्ये एन्डोमेट्रियल पेशी असू शकतात. रक्तपेशी किंवा पेशीदेखील एन्डोमेट्रियल पेशी शरीरातील इतर भागात पसरण्यास कारणीभूत ठरतात. प्रतिकार शक्तीमध्ये समस्या येत असल्यास शरीर गर्भाशयाच्या बाहेर वाढणार्‍या एन्डोमेट्रियल पेशींना बाह्य घटक मानून नष्ट करण्यास सुरुवात करतात. या कारणांमुळे काही वेळा एन्डोमेट्रियल पेशी ओटीपोटाच्या स्तराला चिकटून वाढू लागतात. त्यामुळे गर्भाशयातील स्तर जाड होऊन प्रत्येक वेळी मासिक पाळीच्या दरम्यान तुटून रक्तस्रावास कारणीभूत ठरते.

इतर आजारांमध्ये घेतल्या जाणार्‍या औषधोपचारांमुळे मासिक पाळीत अडथळा निर्माण झाला किंवा पूर्वी झालेला ओटीपोटाचा संसर्ग,

अनुवांशिक कारणे आणि युटेराईन समस्यांमुळेही एन्डोमेट्रियोसिस होण्याचा धोका वाढतो.
गर्भधारणेच्या वेळी तात्पुरती आणि मेनापॉजनंतर एन्डोमेट्रियोसिसची समस्या संपून जाते. तथापि, मेनापॉजनंतर कोणत्याही प्रकारची अ‍ॅस्ट्रोजेन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे हार्मोन्सची थेरेपी घेतल्यास ही समस्या होण्याची शक्यता असते.

उपचार-

रुग्णाचा पूर्वेतिहास, काही चाचण्या आणि सोनोग्राफीच्या मदतीने एन्डोमेट्रियोसिसची समस्या पडताळून पाहता येते. अनेकदा लॅप्रोस्कोपीच्या मदतीनेही या आजाराचे निदान करता येते. त्याच वेळी त्यावर उपचारही करता येतो. त्यासाठी पोटाला 2-3 छोटे छेद दिले जातात आणि कॅमेरा आणि इतर उपकरणांच्या मदतीने ओटीपोटाच्या आतल्या एन्डोमेट्रियॉटिक भाग हटवून किंवा लेझरच्या मदतीने ते जाळले जातात. अर्थात शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एन्डोमेट्रियोसिस होण्याची शक्यता असत.े काही रुग्णांवर बर्‍याचदा शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

वैद्यकीय उपचार करून कृत्रिम मेनापॉजच्या मदतीने एन्डोमेट्रियोसिस थांबवता येऊ शकते. त्यासाठी काही हार्मोन्सची औषधे किंवा महिन्यातून एक इंजेक्शन घ्यावे लागते. मात्र, हा उपचारही पक्का इलाज नाही आणि त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्याशिवाय एन्डोमेट्रियोसिसच्या समस्येने तरुण रुग्ण ग्रस्त असल्यास त्याला मूल व्हावे अशी इच्छा असल्यास त्यांच्यासाठी आययूआय आणि आयव्हीएफसारखे विशेष उपचार उपलब्ध आहेत. रुग्णाचे वय अधिक असल्यास आणि अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या असल्यास गर्भाशय आणि ओव्हरीज काढण्याची हिस्टेरेक्टॉमी म्हणजे पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपाय आहे.

Back to top button