चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे पोटाशी निगडित अनेक समस्या उद्भवतात. उलटी होणे, मळमळणे, पोटदुखी आणि पित्त होणे यांसारख्या छोट्या मोठ्या समस्या उद्वतातच. मात्र, या समस्यांकडे आपण बहुतेकदा दुर्लक्ष करतो. पण, सतत पोट दुखत असेल किंवा कंबरेच्या खालच्या बाजूला सतत पोटदुखी होत असेल; मात्र दुर्लक्ष करू नका. ह्या वेदना अपेंडिक्सच्या असू शकतात.
पोटात मोठे आतडे आणि लहान आतडे यांच्यादरम्यान लहानसा आतड्याचा भाग म्हणजेच अपेंडिक्स.
सततची बद्धकोष्ठता, पित्त, पोटातील संसर्ग यांच्यामुळे आतड्याच्या या छोट्या भागाला सूज येत राहते. त्यामुळे अपेडिंक्स होतो. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे अपेंडिक्सची शारीरिक लक्षणे कोणती असतात याची माहिती असायला हवी.
पोटदुखी ः पोटदुखी आपल्याला अनेकदा होऊ शकते; मात्र पोटाच्या उजव्या बाजूला बेंबीच्या खाली सतत आणि तीव्र वेदना होत असतील तर ही अपेंडिक्सची सुरुवात असू शकते.
उलट्या ः अपेंडिक्स झाल्यास पोटदुखीबरोबरच मळमळण्याचे प्रमाणही वाढते आणि सतत उलटी होईल की काय, असे वाटत राहते.
भूक न लागणे ः अपेंडिक्सचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला भूक लागत नाही. काहीही खाल्ल्यावर उलटी येऊ लागते.
जीभेवर पांढरा थर ः अपेंडिक्सचा त्रास होत असल्यास पोटात संसर्ग होत असल्याने जीभही स्वच्छ राहात नाही. जीभेवर एक पांढरा थर जमा होतो आणि तोंडाला वासही येतो.
ताप ः खूप जास्त संसर्ग झाल्यास ताप येतो एकंदर थकवाही वाढतो.
डायरिया ः पोट खराब होते आणि जुलाबही होऊ लागतात. पचनशक्ती कमजोर झाल्याने खाल्लेले पचवण्याची ताकद राहात नाही.
बद्धकोष्ठता ः अपेंडिक्स झाल्याने काही लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावते. वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यावा.