फॅटी लिव्हर ची समस्या | पुढारी

फॅटी लिव्हर ची समस्या

डॉ. संतोष काळे

पचनसंस्थेतील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत. यकृत हा अवयव अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही. म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येईपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते.

यकृताची क्रिया मंदावली तर पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. आहाराचे पचन झाल्यावर जो आहाररस तयार होतो तो सर्वप्रथम यकृताकडे जातो आणि नंतरच सर्व शरीराचे पोषण होते. थोडक्यात, खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी आणि नंतर त्याचे शरीरधातूत रूपांतर होण्यासाठी यकृताचे योगदान महत्त्वाचे असते. शरीरातील अनावश्यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. त्यामुळेच यकृतासंबंधीच्या तक्रारींकडे नेहमीच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

अलीकडच्या काळात यकृतासंबंधीच्या ‘फॅटी लिव्हर’ नामक व्याधीने डोके वर काढले आहे. यकृतामध्ये चरबी आणि पाणी जमा होणे म्हणजे ‘फॅटी लिव्हर.’ प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान करणे, तसेच मांसाहार करणे ही फॅटी लिव्हरची कारणे सांगितली जातात.

ही व्याधी झाल्यावर पोटाच्या उजव्या भागाला सूज येते, या भागात वारंवार दुखू लागते. तसेच डोळे पिवळे होतात. काविळीमध्ये जी लक्षणे दिसतात, तीच लक्षणे या व्याधीमध्येही दिसतात. फॅटी लिव्हरला अल्कोहोलिक हिप्पॅटायटीस असेही म्हणतात. जर यकृताच्या कार्यात बिघाड झाला तर अन्नाचे पचन करण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो.

तसेच अन्नातून पौष्टिक घटक शोषून घेण्याच्या कार्यातही अडथळे निर्माण होतात. वेगवेगळ्या कारणांमुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते. तसे झाल्यास अन्नपचन करण्याच्या यकृताच्या कार्यात बिघाड उत्पन्न होतो. ही व्याधी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात मद्यपान करणार्‍यांना अधिक असते. गेल्या काही वर्षात तिशी-पस्तिशीतील युवकांनाही फॅली लिव्हरचे आजार होऊ लागल्याचे दिसून येत आहे. काही जणांना मद्यपान न करताही ही व्याधी होऊ शकते.

मद्यपान न करणार्‍यांना अनुवंशिकतेमुळे ही व्याधी होण्याची शक्यता असते, असे डॉक्टर मंडळींचे म्हणणे आहे. मात्र मुळात मद्यपान न करणार्‍यांना ही व्याधी का होते, याची कारणे अजून स्पष्ट होऊ शकलेली नाहीत. हिप्पॅटायटीस सी, अतिजाडी, आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मद्यपान न करणार्‍यांना ही व्याधी झाल्यास त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज (एनएएफएलडी) असे म्हणतात. मध्यमवयीन व्यक्‍तींमध्ये, अति स्थूल व्यक्‍तींमध्ये अचानक ही समस्या उद्भवते. औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन करणे, व्हायरल हिप्पॅटायटीस, कुपोषण आदी कारणांमुळेही ही व्याधी उद्भवते.

या संदर्भातील संशोधनांनुसार आतड्यांमध्ये विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ झाल्यामुळे फॅटी लिव्हरची व्याधी उद्भवते. फॅटी लिव्हर झाल्यावर त्या व्यक्‍तीच्या यकृताला सूज येते, तसेच यकृताचा आकार प्रमाणापेक्षा मोठा होतो. या व्याधीवर वेळीच उपचार केले नाही तर लिव्हर सोरायसीस, यकृताचा कर्करोग आदी गंभीर व्याधी होण्याची शक्यता असते. यकृताचे कार्य वारंवार बिघडू लागले तर त्या रुग्णावर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतात. याची परिणती रुग्णाच्या मृत्यूमध्येसुद्धा होण्याची शक्यता असते.

ही व्याधी झाली आहे, हे प्रारंभिक अवस्थेत ओळखू येण्यासाठी विशेष लक्षणे रुग्णामध्ये दिसत नाहीत. पोटाच्या उजव्या बाजूमध्ये अधूनमधून दुखणे हे एकमेव लक्षण सांगता येते. ज्यांना मधुमेह झाला आहे, अशा व्यक्‍तींनाही ही व्याधी होण्याची शक्यता असते.

यकृतामध्ये संसंर्ग होण्यास हिप्पॅटायटीस बी, सी ही कारणेसुद्धा असल्याचे सांगितले जाते. आपल्या यकृताच्या कार्यात वारंवार बिघाड होतो आहे, असे लक्षात आल्यास तज्ज्ञ डॉक्टरकडून त्वरेने तपासणी करून घेणे आवश्यक असते. या व्याधीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे रूपांतर यकृताच्या कर्करोगात होण्याची शक्यता असते.

यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागल्यास भूक कमी होऊ लागते, अन्न पचत नाही, पोटावर सूज येते, हात आणि पायावरही सूज येते, खाज उठते, अशक्‍तपणा जाणवतो. यापैकी काही लक्षणे आपल्यात दिसल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवणे. अशी व्याधी झाल्यास नियमित व्यायाम करून आपले वजन नियंत्रणात आणावे लागते. नियमित व्यायामामुळे वजन आणि मधुमेह नियंत्रणात येतो. या व्याधीवर आयुर्वेदिक पद्धतीनेही उपचार करता येतात. अधिक तळलेले मसालेदार पदार्थ खाणे, दही, लस्सी असे थंड पदार्थ वारंवार खाणे,

जंकफूडचे सेवन यासारख्या आहाराच्या सवयींमुळेही ही व्याधी उद्भवू शकते. प्रसूतीनंतर महिलांमध्येही ही व्याधी होण्याची शक्यता बळावते. चयापचय क्रियेत बिघाड निर्माण झाल्याने यकृतावर चरबी जमा होऊ लागते. या आजारावर होमियोपॅथीद्वारेही प्रभावी उपचार होऊ शकतात.

Back to top button