मुले अंगठा का चोखतात, सवय कशी सोडवाल? | पुढारी

मुले अंगठा का चोखतात, सवय कशी सोडवाल?

डॉ. प्राजक्‍ता पाटील

लहान छोटेसे गोंडस बालक कोणालाही हवेहवेसे वाटते. लहानग्यांच्या छोट्या छोट्या हालचालीसुद्धा अतिशय मोहक वाटतात आणि म्हणूनच बाळाने केलेली कुठलीही कृती कौतुकाचा विषय ठरते. बाळाने अंगठा चोखणे ही सवयसुद्धा त्यापैकीच एक. अंगठा चोखण्याची सवय प्रत्येक लहान मुलांमध्ये नैसर्गिक रूपानेच येते.

काही वेळेला ही सवय म्हणजे भूक लागल्याचा संकेत असतो. तर काही वेळेला अंगठा किंवा बोट चोखल्यामुळे मुलांना आरामदायक, सुरक्षित जाणीव होते. मूल लहान असते तोपर्यंत या सवयीचे काही वाटत नाही. पण मूल जसजसे मोठे होऊ लागते तसतसे ही सवय चिंतेचा विषय बनते. मुलांची ही सवय कशी सोडवावी, असा मोठा प्रश्‍न पालकांसमोर उभा राहतो.

अंगठा चोखल्याने एन्डोफिन्स नावाच्या स्रावाची निर्मिती होते. त्यामुळे बाळाचा मेंदू शांत होतो आणि त्याला लवकर झोप येते. परंतु मूल मोठे झाल्यानंतर आई-वडिलांची चिंता योग्यच असते. कारण अंगठा चोखल्यानंतर वरच्या दातांचे हाड बाहेरच्या बाजूने येते. यामुळे मुलांचे दात वाकडे तिकडे होतात. दुधाचे दात योग्य वेळी पडले नाहीत किंवा वेळेपूर्वीच पडले किंवा जबड्याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाली तर यामुळेही मूल अंगठा चोखते. अनेकदा सतत अंगठा चोखत राहिल्यामुळे पोटात नखांमधली घाणही जाते आणि बाळ आजारीदेखील पडू शकते.

मुले अंगठा का चोखतात? : ज्या वेळी मुलांना भूक लागते तेव्हा ते आपले हातपाय हलवतात. याच दरम्यान अंगठा त्यांच्या तोंडात जातो. त्याला ते निप्पल समजून चोखायला सुरुवात करतात. मुलाचे पोट भरलेले नाही हेदेखील या कृतीतून संकेत देते. सहा महिन्यांपर्यंत मूल भूक लागल्यानंतर अंगठा चोखते. पण पोट भरल्यानंतर देखील तो अंगठा तोंडात टाकत असेल तर ही सवय सोडणे गरजेचे असते. सर्वसामान्यपणे जी मुले स्तनपान करतात, त्यांच्यासाठी वीस मिनिटांचे फिडिंग पुरेसे असते. पण त्यानंतरही ते अंगठा चोखत असेल तर त्यांना काही वेळेसाठी आणखी स्तनापन करावे. कदाचित यामुळे ते अंगठा चोखणार नाहीत.

बहुतेकवेळा असे दिसून येते की, जी मुले बाटलीने दूध पितात ती मुले मोठी झाल्यानंतर वीस मिनिटात संपणारी बाटली दहा मिनिटात संपू लागते. यामुळे ते देखील अंगठा चोखू लागतात. मूल मोठे झाल्यानंतर त्याला शक्‍ती येते आणि त्यामुळे बाटलीचे निप्पल कमकुवत बनते. अशा वेळी मुलांना दूध पाजताना बाटली पकडून त्याची दूध पिण्याची गती नियंत्रित करावी किंवा अतिशय बारीक छिद्रे असणारे निप्पल त्याला लावावे. कारण यामुळे मुलांना दूध पिण्यास थोडा वेळ लागेल आणि ताकदही थोडी जास्त लागेल. त्यामुळे तो अंगठा चोखणार नाही.

ज्या मुलांचे दात येत आहेत, त्यांच्यामध्ये देखील अंगठा किंवा बोट चोखण्याची सवय असते. बरेचदा दात येताना हिरड्या दुखतात, त्यामुळे
मुलाला बोट चोखल्याने बरे वाटते. या काळात अंगठा चोखण्याची सवय चुकीची मानू नये. काही मोठी मुले भरपूर प्रेम न मिळाल्यास असुरक्षितता किंवा उपेक्षित असल्याची जाणीव होत असल्यास, झोप येत नसल्यास आणि तणावाच्या स्थितीत अंगठा चोखतात. अशा मुलांना प्रेमाची आणि विश्‍वासाची गरज असते.

मुलांची सवय कशी सोडवाल? : ही सवय

मुळापासून घालवण्यासाठी मुलांच्या दूध पिण्यामधील कालावधी कमी करावा आणि त्याचसोबत त्याला सतत व्यस्त ठेवावे. मुलांना भरपूर प्रेम द्यावे. जेवढ्या लवकर मुलांची ही सवय सोडवाल तेवढे चांगले. अन्यथा नंतर ही सवय सोडवायला खूप त्रास होऊ शकतो.

ज्या वेळी मूल अंगठा चोखत असेल त्या वेळी त्याला त्याची जाणीव न करता, नकळत त्याचे लक्ष दुसरीकडे वळवावे. एखादे खेळणे देऊन किंवा गाणे लावून त्याला डान्स करायला सांगावा. अंगठा चोखणार्‍या मुलांना वारंवार रागावू नये. कारण असे केल्याने ते तणाव दूर करण्यासाठी आणखीन अंगठा चोखू लागतील. त्यामुळे त्यांना प्रेमाने समजवावे. ज्या वेळी मूल थोडे समजूतदार होऊ लागले तेव्हा त्याला अंगठा न चोखण्याच्या बदल्यात चॉकलेट किंवा एखादा गेम द्यावा.

मुलांच्या अंगठ्यावर किंवा बोटांवर ते चोखू नयेत म्हणून काही पालक मिरची किंवा आणखी काहीतरी लावतात. पण असे केल्यास मूल मुद्दाम ही कृती पुन्हा पुन्हा करू लागेल. म्हणूनच मुलांना प्रेमाने, गप्पांमधून, खेळता खेळता ही सवय सोडण्यासाठी उद्युक्‍त करावे.

काही वेळेला मुले तणाव आणि उपेक्षित असल्याची जाणीव मनात ठेवतात आणि त्यामुळे या जाणिवेत अंगठा चोखतात. त्यामुळे मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्या वेळी मुलाला एकटे असल्याची जाणीव होऊ लागेल तेव्हा त्याच्या आवडीचे एखादे काम करण्यास द्यावे. ज्या वेळी तो आपल्या कामात यशस्वी होईल तेव्हा त्याला शाबासकी द्यावी.

यामुळे त्याला अभिमान वाटेल, आत्मविश्‍वास जाणवेल आणि तो अंगठा चोखणे बंद करेल. कधीही दुसर्‍यासमोर मुलांच्या या सवयीबद्दल टीका करू नये. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास आणखी कमी होईल. थोडक्यात, मुलांची ही सवय घालविण्यासाठी त्यांची मानसिकता समजावून घेऊन ती सोडवण्यासाठी अत्यंत संयमाने प्रयत्न केले पाहिजेत.

Back to top button