नाक चोंदले आहे काळजी नसावी हे करा घरगुती उपाय… | पुढारी

नाक चोंदले आहे काळजी नसावी हे करा घरगुती उपाय...

वैद्य विनायक खडीवाले

नाक चोंदून वारंवार श्‍वासास त्रास होणे, डोके दुखणे, जड होणे, नाकाचे हाड वाकडे असणे या अवस्थेत लक्ष्मीनारायण रस, ज्वरांकुश, दमा गोळी आणि लवंगा दिवटी प्रत्येकी तीन गोळ्या, दोन वेळा, चावून खाव्या. श्‍वासमार्ग सुधारतो का ते पहावे.

एवढ्या औषधांनी एक आठवड्यात काहीच सुधारणा न झाल्यास अणुतेल, बलदायी महानारायणतेल किंवा चांगले तूप वा शतधातैघृत नाकामध्ये दोन थेंब टाकून नाक मोकळे होते का ते पहावे. एवढ्यानेही नाकाचे आणि श्‍वसनाचे कार्य न सुधारल्यास नाक, हाडाचे वा मांसाचे क्षरण होण्याकरिता आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ आणि लाक्षादिगुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या, दोन वेळा, घ्याव्या. ही सर्व औषधे चालू असताना दीर्घश्‍वसन, प्राणायाम, सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची दहा पाने खाणे चालू ठेवावे.

विशेष दक्षता आणि विहार : शरीरात कुठलीही विकृत सूज आणि अडथळा, फाजील खाणे पिणे, विशेषत: पृथ्वी आणि जल तत्त्व जास्त असलेल्या, दही, मिठाई, फरसाण यामुळे होते. त्यावर लक्ष असावे.

पथ्य : तांदूळ भाजून भात, पुदीना, आले, लसूण, ओली हळद यांची चटणी, तुळशीची पाने, पालेभाज्या, सकाळी गोड ताक, सुरण, दुध्या भोपळा, दोडका, पडवळ, कारले, ज्वारीची भाकरी.

कुपथ्य : कडधान्ये, दही, तूप, गहू, साखर, मिठाई, गोड पदार्थ, फरसाण, बेकरीचे, आंबवलेले पदार्थ, कोल्ड्रिंक, दारू, तंबाखू, रात्री जेवण, दुपारची झोप, बैठे काम.

योग आणि व्यायाम : प्राणायाम, दीर्घश्‍वसन, किमान दहा सूर्यनमस्कार.

रुग्णालयीन उपचार : तज्ज्ञांचे देखरेखीखाली स्नेह, स्वेदपूर्वक नस्य, धूपन.

चिकित्साकाल : पंधरा दिवस ते तीन महिने.
हा त्रास असणार्‍यांनी मीठ आणि हळद पाण्यात उकळून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सायंकाळी लंघन करावे.

Back to top button