पायात गोळे येण्याची समस्या आणि उपचार | पुढारी

पायात गोळे येण्याची समस्या आणि उपचार

डॉ. महेश बरामदे

पायात गोळे येण्याची समस्या अनेकांना जाणवत असते. पायात गोळे आल्यावर त्या वेदना अनेकजण सहन करू शकत नाहीत. काहींना पायातील गोळ्यांमुळे अचानक मध्यरात्री जाग येते. म्हणूनच या व्याधीला नाईट क्रॅम्प असेही म्हणतात.

व्यायाम करताना, चालताना, पोहताना, सायकल चालवताना अशा कोणत्याही वेळी पायात गोळे येऊ शकतात. ज्या ठिकाणी गोळा आलेला असतो, त्या ठिकाणचा भाग कडक होतो. कोणत्या कारणांमुळे पायात गोळा येतो याविषयी संशोधन झाले आहे. पायाशी संबंधित स्नायूंमध्ये इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटी वाढल्यामुळे गोळे येत असावेत, असा तर्क बांधला जातो. काही जणांना विशिष्ट व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवत असल्याने पायात गोळे येतात. शरीरातील द्रव्य घटकांचे संतुलन बिघडल्यामुळेही गोळे येतात.

काही जणांना मांडीतही गोळे येतात. गोळा आल्यानंतरची स्थिती काही सेकंदच कायम राहते. काही जणांना गोळा आल्यावर तो दहा मिनिटे राहतो, असेही आढळून आले आहे. गोळा आल्यानंतर पायात एवढ्या वेदना होतात की, माणसाला झोपेतून जाग येते. त्यानंतर जवळपास दिवसभर त्याच्या वेदना माणसाला जाणवत असतात. गोळा आल्यानंतर शरीराला अन्य कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे ही व्याधी गंभीर समजली जात नाही.

काही वेळेला मात्र गोळा येणे हे मधुमेहासारख्या गंभीर व्याधीचे लक्षण मानले जाते. तर काही जणांमध्ये गोळा येणे हे रक्‍तवाहिन्यांच्या आजाराचे लक्षण मानले जाते. आपले वय जसजसे वाढू लागते, तसतशी पायात गोळा येण्याची समस्या वाढू लागते. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या तिघा जणांपैकी एकाला गोळा येण्याची समस्या सतावत असते, असे संशोधनातून दिसून आले आहे. 80 पेक्षा अधिक वयाच्या निम्म्या लोकांना ही समस्या वारंवार जाणवते, असेही दिसून आले आहे. सर्वसामान्य महिलांपेक्षा गर्भवती महिलांमध्ये पायात गोळा येण्याचे प्रमाण अधिक असते. 40 टक्के लोकांना आठवड्यातून तीन वेळा ही समस्या जाणवते. काही जणांना तर दररोज ही समस्या जाणवते.

पायाच्या एखाद्या स्नायूवर खूपच ताण पडला तर त्याची परिणती गोळा येण्यात होते, असा काही संशोधकांचा अंदाज आहे. म्हणजे बराच वेळ व्यायाम केल्यानंतर कोणत्या तरी एका पायात गोळा येऊ शकतो. व्यायाम करत असतानाही एखाद्या पायावर अतिरिक्‍त ताण पडला तरी गोळा येतो.

धावपटू तसेच अन्य खेळाडूंना पायात गोळा येण्याचा त्रास अनेकदा जाणवतो. क्रिकेट मैदानावर खेळाडूंच्या पायात गोळा येण्याचे प्रसंग आपण पाहतो. फुटबॉल खेळाडूंनाही मैदानावर ही समस्या जाणवत राहते. एखादा धावपटू बराच वेळ पळण्याचा सराव करत असेल, तर त्याच्या शरीरातून घामावाटे भरपूर सोडियम बाहेर पडते. त्याचा परिणाम म्हणून पायात गोळा येतो.

नियमित व जास्त प्रमाणात मद्यपान करणे, डिहायड्रेशन, सोरायसीस, हगवण, मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे, पोटाची शस्त्रक्रिया अशा काही कारणांमुळे पायात गोळे येऊ शकतात. पार्किनसन्सची व्याधी असणे, गर्भनिरोधक गोळ्या घेणे हीही गोळा येण्याची काही कारणे सांगितली जातात.

पायात गोळा आल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर रुग्णाच्या पायाची तपासणी करतात. गोळा आल्यानंतर वेदना किती प्रमाणात होत्या, याची विचारणा डॉक्टरांकडून केली जाते. गोळा आल्यानंतर तुमची झोप मोडली का? मूड बदलला का? आदी प्रश्‍नही विचारले जातात. असे प्रश्‍न विचारण्यामागे त्या रुग्णामध्ये मधुमेहाचे लक्षण जाणवते आहे का, हे तपासण्याचा डॉक्टरांचा हेतू असतो.

पायात गोळे आल्यानंतर तातडीने काही उपचार करता येतात. यातील एक उपचार आहे, पाय ताणण्याचा (स्ट्रेचिंग), व्यायाम डॉक्टरांकडून सुचवला जातो. जर पोटरीत गोळा आला असेल तर असे व्यायाम करावेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याकरिता आपला पाय सरळ करा आणि गुडघ्यात वाकवा. असे केल्याने आपल्या पोटरीला ताण बसतो. आपल्या तळवे सरळ ठेवत भिंतीला हात टेकवून उभे राहा. भिंतीपासूनचे अंतर एक मीटर असले पाहिजे.

हात टेकवून पुढच्या बाजूला शरीर झुकवा, असे करताना आपले खांदे ताणले जातील हे पहा. मात्र या वेळी पाय जमिनीला टेकून राहतील याची काळजी घ्या. अशा वेळी टाचा उचलल्या जाण्याची शक्यता असते. मात्र टाचा उचलू देऊ नका. या स्थितीत किमान दहा सेकंद उभे रहा. ही क्रिया पाच ते दहा वेळा करा. यामुळे पायातील गोळ्यांची वेदना वेगाने कमी होते, असा अनुभव अनेकांना येतो. त्याचबरोबर ही समस्या जाणवण्याचे प्रमाणही कमी होऊ लागते. दिवसातून दोन-तीन वेळा अशा पद्धतीने व्यायाम करा.

आठवड्यातून दोन -तीन दिवस पायात गोळे येण्याचा त्रास होत असेल, तर हा व्यायाम नियमित केल्याने पंधरा दिवसातून व पुढे महिन्यातून कधीतरी गोळे येण्याची समस्या जाणवते. गोळे आल्यानंतर होणार्‍या वेदना अनेकांना सहन होत नाहीत. अशांकरिता तातडीने वेदनाशामक गोळ्या घेणे हा उपाय सुचविला जातो. पण वेदनाशामक गोळ्या घेतल्याने या समस्येवर मात करता येत नाही.

शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर ही समस्या जाणवते, असे काही वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. वैद्यकीय तपासणीत पोटॅशियमची कमतरता आढळून आल्यास अशा व्यक्‍तींनी केळी, जर्दाळू, कोबी, ब्रोकोली, संत्री, द्राक्षे यांचा समावेश आहारात करावा. या पदार्थांमध्ये भरपूर पोटॅशियम असते.

गोळा आलेल्या ठिकाणी गरम पाणी अथवा वाळूने शेक द्या. गोळा आलेल्या ठिकाणच्या भागावर हळूहळू मसाज करा. भरपूर पाणी प्या. झोपताना पायाखाली लोड अथवा तक्क्या घेऊन झोपा. झोपण्यापूर्वी आपले दोनही पाय वर उचलण्याचाही व्यायाम करा.

Back to top button