Bariatric surgery : स्थूलपणा यावर शस्त्रक्रिया करताय? | पुढारी

Bariatric surgery : स्थूलपणा यावर शस्त्रक्रिया करताय?

डॉ. प्राजक्ता पाटील

जास्त वजन कमी करण्यासाठी महिलांना काहीवेळा शस्त्रक्रियेची गरज भासते. स्थूलता कमी करण्यासाठी बॅरियाट्रिक लायपोसक्शन इत्यादी लोकप्रिय शस्त्रक्रिया आहेत. त्यानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकता येते; मात्र तज्ज्ञांच्या मते, स्थूलता कमी करणार्‍या शस्त्रक्रियेनंतर गर्भवती होण्याविषयी विचार करत असाल, तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हल्ली महिलांमध्ये बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया (Bariatric surgery) करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. गर्भावस्थेत होणार्‍या अनेक समस्या समोर येत आहेत.

त्यामुळे बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया (Bariatric surgery) केली असेल, तर गर्भधारणेसाठी काही काळ थांबा. शक्य असल्यास 12 ते 14 महिन्यांपर्यंत गर्भधारणेविषयी विचार करू नका. शस्त्रक्रियेनंतर पोट आणि गर्भाशय सामान्य होण्यासाठी काही काळ जावा लागतो. या काळात गर्भधारणा न झाल्यास शरीर स्वस्थ होते आणि थोड्या काळानंतर आपण सुरक्षितपणे गर्भधारणा करू शकता. त्या कालावधीपूर्वीच गर्भधारणा होऊ इच्छित असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.

स्थूलता कमी करण्यासाठीच्या कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी भविष्यात गर्भधारणेवर किंवा होणार्‍या बाळावर काय परिणाम होईल आणि शस्त्रक्रियेनंतर किती कालावधीनंतर शरीर गर्भधारणेसाठी तयार होईल, ही गोष्ट डॉक्टरला जरुर विचारावी. त्याच बरोबर शस्त्रक्रियेनंतर सतत डॉक्टरच्या संपर्कात राहावे आणि गर्भावस्थेदरम्यान कोणतीही समस्या असेल, तर सर्जरी करणार्‍या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी

बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेनंतर (Bariatric surgery) गर्भधारणेपूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञांशी याविषयी जरुर सल्लामसलत करावी. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर गर्भधारणेविषयी कधी विचार करावा आणि कोणती काळजी घ्यावी, तसेच शरीर गर्भधारणेसाठी योग्य आहे की नाही, याविषयी तज्ज्ञ तपासणी करून सांगू शकतात. कोणत्याही परिस्थितीत शस्त्रक्रियेनंतर 6 महिन्यांपूर्वी पहिल्या गर्भधारणेविषयी विचार करू नये.

पोषक घटकांची कमतरता

गर्भावस्थेत शरीराला जीवनसत्त्व, खनिजे, प्रथिने आणि इतर पोषक घटकांची गरज नेहमीपेक्षा अधिक असते. बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेनंतर शरीराच्या काही क्रिया सामान्य होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे शरीराला पोषक घटकांची कमतरता भासू शकते. त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. त्यामुळे थोडा वेळ वाट पाहणे योग्य ठरेल.

शस्त्रक्रियेनंतर पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये गर्भवती महिलांना पोटदुखीची तक्रार असतेच; पण वेगळ्या प्रकारची पोटदुखी किंवा वेदना होत असतील, तर मात्र त्वरित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यामुळे गर्भावस्थेतील वेदना आणि बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेशी संबंधित वेदना यातील फरक समजून घ्यावा. प्रसूतीतज्ज्ञांना केलेल्या बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेविषयी माहिती द्यावी आणि गर्भावस्थेदरम्यान बॅरियाट्रिक सर्जनच्या संपर्कात राहावे. गर्भवतीने तिला आणि पोटातील बाळाला योग्य पोषण मिळते ना, याची माहिती घ्यावी.

Back to top button