हाता-पायांची आग होत असल्यास... - पुढारी

हाता-पायांची आग होत असल्यास...

वैद्य विनायक खडीवाले

रोगाचे नाव : दाह, आग होणे.
संबंधित व्याधी : हाता-पायांची आग, सर्वांगाची आग, डोळे, कानशिलाची आग.
दोष : पित्त दोष टाळणे, वात.

गुरुकुल पारंपरिक उपचार : हाता-पायांची आग होत असल्यास, प्रवाळ, कामदुधा, 3-3 गोळ्या बारीक करून दोनवेळा घेणे. शतघौतघृत चोळणे, चंदनादिवटी, योनीदाह असल्यास, उपळसरी, रसायचूर्ण सकाळी आणि संध्याकाळी पाण्याबरोबर घेणे. प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी, नेत्र, कर्णदाह असल्यास नेत्रपूरण, शतावरीसिद्धेतेल, कर्णपूरण. हाता-पायांना तूप चोळावे, प्रवाळ, कामदुधा, त्रिफळाचूर्ण. उदरदाह असल्यास, प्रवाळपंचामृत, आम्लपित्तवटी, त्रिफळाचूर्ण. शतधौतघृत 2 चमचे घ्यावे. दशांगलेप डोळ्यांभोवती लावावा.

लघवीची आग तिडीक असल्यास उपळसरीचूर्ण, रसायनचूर्ण, पोटावर (काळी माती) लेप लावावा. गार पाण्याची पट्टी, प्रवाळ (भस्म) याने आग न थांबल्यास मौक्तिकभस्म पाव ते अर्धा ग्रॅम घ्यावे. चंदन, वाळा, नागरमोथा, धने, ताजी गुलाब फुले, हे सर्व पाण्यात भिजत टाकून, सकाळ-संध्याकाळ घ्यावे. आगीबरोबर मलावरोध असल्यास, गरम दुधाबरोबर 1 चमचा तूप रात्री जेवताना घ्यावे.

तुळशीचे बी रात्री भिजत ठेवून ते सकाळी घ्यावे. गुलकंद (कांजिण्या, उन्हाळी, ह्यांवर) मौक्तिक भस्माबरोबर खावा. गोखरूचे पाणी लघवीचे आगीवर घ्यावे. मलप्रवृत्तीसाठी, बाहवामगज, गुलाबकळी, जेष्ठमध आणि बाळहिरडा यांचा काढा, घ्यावा. छातीत ठराविक जागी जास्त जणजळ असल्यास, एकूण सर्वांगाची आग होत असल्यास काढा घ्यावा, पिवळे जर्द पित्त पडेल. दुर्वांचा रस अंगाला चोळावा.

ग्रंथोक्त उपचार : शरीरातील उष्णता वाढल्यास, रूक्षता आल्यास, कानांत तेल, डोक्यावर तेलाची पट्टी, नाकात नस्य (तूप) टाकावे. नेत्रपूरण, शिरोबस्ती घ्यावा. हलक्या हाताने तेलाचा मसाज (खोबरेल तेल, शतावरी) लघवी कमी होत असल्यास टबबाथ घ्यावा.

विशेष दक्षता आणि विहार : आहारावर नियंत्रण, चमचमीत पदार्थ वर्ज्य, किमान व्यायाम, दुपारी झोप वर्ज्य. त्याने अंगातील उष्णता वाढते, हलका आहार रात्री घ्यावा.

पथ्य : ज्वारी, भूग, धने, जिरे, थोड्या प्रमाणात दूध, थोडे गोेड ताक, पालेभाज्या, गायीचे तूप वापरावे. तीव्र औषधे घेऊ नयेत.

कुपथ्य : तिखट, आंबट, चमचमीत, आंबवलेले पदार्थ, सोडायुक्त पदार्थ, खारट वर्ज्य जागरण, उन्हात हिंडणे-त्यावर बर्फाचे पाणी पिणे, अतिश्रम, चिंता, राग-मंद चहा, कॉफी या गोष्टी टाळाव्यात.

योग आणि व्यायाम : वजन कमी होऊ नये, याकडे लक्ष. जास्त श्रमाची कामे वर्ज्य. हलका व्यायाम. नियमित पळणे.

रुग्णालयीन उपचार : तेलाचा पिचू, डोक्यावर तेलाची पट्टी, (शिरपिचू), कानांत तेल, अंजन, गार पाण्याची धार.

अन्य उपक्रम (पंचकर्मादी) : पाण्याची धार धरावी (आगीच्या जागी) हाता-पायांना तूप चोळावे.

चिकित्साकाल : सकाळी आणि संध्याकाळी.

निसर्गोपचार : काश्याच्या वाटीने तूप चोळावे (हाताला आणि पायांना) डोळे गार पाण्याने धुवावेत. चंदनाचा लेप परत परत लावावा.

अपुनर्भवचिकित्सा : हाता-पायांची आग होण्याचे थांबल्यास परत विकार न होण्यासाठी काळजी घ्यावी. आहार, विहार, व्यायाम, योग यांचे यमनियम पाळावे.

Back to top button