हात थरथरत असतील तर वेळीच व्हा सावध आणि जाणून घ्या कारणे | पुढारी

हात थरथरत असतील तर वेळीच व्हा सावध आणि जाणून घ्या कारणे

डॉ. संतोष काळे

हाताला कंप सुटणे म्हणजे विश्रांती घेत असताना अथवा काम करत असतानाही हात कमालीचा थरथरणे. ही क्रिया बराच काळ होत राहते. या विकाराविषयी जाणून घेणे आवश्यक ठरते. ट्रेमर किंवा कंप किंवा हाता-पायांची आपोआप होणारी हालचाल हा विकार जीवघेणा नाही; पण आपल्या दैनंदिन कामात यामुळे अडथळा निर्माण होतो, तसेच चारचौघांत अशी स्थिती निर्माण झाल्यास विचित्र वाटते. योग्य निदान आणि औषधांमुळे यावर मात करता येते..

शरीराच्या कोणत्याही अवयवाला कंप सुटतो आणि तो थांबत नाही. काम करताना, विश्रांती घेताना असा कंप सुटत असतो. बर्‍याचदा हा कंप हातांना सुटतो. शिवाय हा कंप म्हणजे नुसते थरथरणे असत नाही तर हात पुढे मागे असा हलत राहतो. केवळ हातच नाही तर खांदे, डोके, चेहरा, आवाज, पाय अशा विविध अवयवांत असा कंप निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे हा विकार कोणत्याही वयात होऊ शकतो; पण मध्यम वयातील आणि उतारवयातील लोकांमध्ये तो जास्त दिसतो.

मल्टिपल स्क्लेरोसिस, अर्धांगाचा झटका, मेंदूला जखम किंवा मेंदूच्या अन्य विकारांमुळे मेंदूचे आणि मेंदूतील पेशीं खराब होतात आणि त्यामुळे हातांना कंप सुटतो. याशिवाय मद्याचे व्यसन, थायरॉईड, यकृत निकामी होणे अशा आजारांमुळेही हात थरथरतात. तसेच चिंता, तणाव, वार्धक्य, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे, एखाद्या गोष्टीचा तिटकारा, किळस येणे यामुळेही हा विकार जडतो. काही औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनही हा आजार होतो.

ही थरथर मेंदूतील स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणार्‍या भागाचे काम बिघडल्याने घडते. हातांची थरथर तुम्ही विश्रांती घेत असताना किंवा काम करत असतानाही जाणवू शकते. हात कधी थरथरणार हे त्या कंपाच्या वैशिष्ट्यांवरून ठरते. उदाहरणार्थ विश्रांती घेत असताना हात थरथरत असेल तर त्याचा संबंध कडक स्नायू आणि मंद हालचाली हे पार्किन्सनशी निगडित असते.

हात थरथरण्याशी नाडीचे ठोके जलद पडणे आणि वजन झपाट्याने कमी होणे हेही निगडित असेल तर त्यामागे थायरॉईड हार्मोनचा स्तर वाढणे हे कारण असते.

काही वेळा काही विशिष्ट औषधे घेतल्यावर हातांना कंप सुटतो. तेव्हा तो दोष त्या औषधांचा असतो.

काही विशिष्ट हालचालींनंतर हातांची थरथर होत असेल तर मेंदूतील काही समस्येमुळे हे घडते.

मधुमेहाच्या रुग्णांतही असा कंप निर्माण होतो. त्यामागे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी देण्यात आलेली औषधे हे कारण असण्याची शक्यता असते. या औषधांमुळे रक्तातील साखर कमी होते; पण साखर कमी झाल्यामुळे हात थरथरू लागतो.

हात थरथरण्यामागे अनेक कारणे आहेत. सतत कसली तरी चिंता वाटत राहणे ते मेंदूतील बिघाड अशी अनेक विध कारणे यामागे असू शकतात. हाताच्या कंपामागील विविध कारणे खालीलप्रमाणे-

विश्रांतीच्या वेळी होणारा कंप :

हाताला जेव्हा विश्रांती मिळते म्हणजे हात जेव्हा काहीही काम करत नसतो तेव्हा हाताची हालचाल होऊ लागते आणि ती थांबवता येत नाही. रुग्ण जर तणावाखाली असेल तर ही हालचाल आणखी वाढते. अशा प्रकारचा कंप खालील काही विकारांमध्ये दिसून येतो.

पार्किन्सन : पार्किन्सन ही अशी अवस्था असते की, ज्यामध्ये मेंदूतील डोपामाईन नावाच्या रसायनाची पातळी खालावलेली असते. यात जेव्हा हात निष्क्रिय असतो तेव्हा त्यात कंप येतो; पण जेव्हा हातांची हालचाल सुरू झाली की थांबते. यात हात विशिष्ट पिल रोलिंग पद्धतीने म्हणजे अंगठा आणि तर्जनी यांचे टोक जुळून हात हलत राहतो.

ताण वाढला किंवा भावनावेग आला की ही थरथर आणखी वाढते. पार्किन्सनच्या थरथरीत हनुवटी, ओठ, पाय आणि धड यावरही परिणाम होतो. शिवाय पाय ओढत चालणे, स्नायू कडक होणे आणि हालचालींतील मंदपणा अशीही लक्षणे दिसतात. पार्किन्सन प्रतिरोधक औषधांमुळे हातांतील कंप कमी होतो.

औषधांमुळे होणारा कंप :

न्युरोलेप्टिक्स, मेटोक्लोप्रामाईड आणि प्राक्लोर्पेराझाईन अशा औषधांमुळे रेस्टिंग ट्रेमर म्हणजे हात निष्क्रिय असताना होणारा कंप जाणवतो. हा कंप पार्किन्सनमुळे होणार्‍या कंपाप्रमाणेच असतो.

मेंदूच्या मध्यभागातील बिघाडामुळे होणारा कंप :

याला होम्स ट्रेमर असे म्हणतात. मेंदूच्या मध्यभागातील नसांच्या बिघाडाशी हा कंप निगडित आहे.

सक्रिय असताना होणारा कंप :

हालचाल होत असताना होणारा कंप याला सक्रिय किंवा अ‍ॅक्शन ट्रेमर असे म्हणतात.

हेतूत: कंप :

याला इंटेन्शनल ट्रेमर असे म्हणतात. हा कंप एखादी सहेतूक केलेल्या हालचालीनंतर उद्भवतो. म्हणजे लेखन केल्यानंतर, एखादे बटन दाबल्यानंतर किंवा हात लांब करून एखादी वस्तू घेतल्यानंतर असा प्रकार घडतो.

सेरेब्रल ट्रेमर :

हालचाली आणि संतुलन यात आपल्या मज्जासंस्थेतील मेंदू हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. अर्धांगाचा झटका, ट्यूमर किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारख्या विकारांमध्ये मेंदूचे बरेच नुकसान होते. त्याचा परिणाम इंटेन्शनल ट्रेमरमध्ये होतो. सेरेब्रल ट्रेमर हा अतिशय मंद प्रकार आहे आणि तो एखादी कृती केल्यानंतर म्हणजे बटन दाबल्यानंतर किंवा अगदी नाकाला बोट लावल्यानंतर घडतो. काही औषधांचा अतिरिक्त वापर किंवा मद्यपानाची जुनाट सवय यामुळेही हे घडते. हा कंप नेहमी अनियमित आणि झटका लागल्याप्रमाणे असतो. रुग्णाच्या चालण्याची क्रिया बिघडते, त्याच्या हातापायात मेळ राहत नाही. डोळ्यांची बुबुळे वेगाने आणि एकदमच फिरू लागतात आणि बोलण्यातही सुसंगती राहत नाही.

विल्सन्स डिसीज या रोगात रुग्णाला असामन्य कॉपर

मेटॅबॉलिजमचा त्रास होतो. यात रुग्णाचे हात पक्ष्याचे पंख फडफडल्याप्रमाणे हलतात. याशिवाय स्नायूंचा कडकपणा, हालचाली मंदावणे ही लक्षणेही रुग्णात दिसून येतात.

काही वेळा हात किंवा पाय विशिष्ट स्थितीत असताना थरथर होते. म्हणजे तुम्ही लिहीत असताना, किंवा डोक्यावर टोपी घालताना किंवा नुसते हात-पाय हलवताना हा ट्रेमर येऊ शकतो.

बिनाईन इसेन्शियल ट्रेमर हा कंपाचा आणखी एक प्रकार आहे. साधारणपणे वयाची चाळीशी उलटल्यावर हा ट्रेमर दिसून येतो. अर्थात हा सर्वत्र आढळणारा प्रकार आहे. विशेषत: हा हातांना होतो; पण डोके, आवाज, जीभ आणि धड यावरही त्याचा परिणाम होतो. हा कंप सौम्य असतो आणि अनेक वर्षांच्या काळात हळूहळू वाढत जातो. हा तणाव, ताप, भावनावेग यामुळे हा विकार वाढत जातो. औषधाने यावर मात करता येते.

फिजियॉलॉजिकल ट्रेमर

हा प्रकार प्रत्येक व्यक्तीत आढळून येतो आणि तो नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. भीती किंवा चिंता यांसारख्या गोष्टींनी हा विकार आणखी वाढतो. यामुळे सर्व स्नायूंवर परिणाम होतो.

याशिवाय कंपाचे आणखीही अनेक प्रकार आहेत. डॉक्टरांचा सल्ला याबाबत मोलाचा ठरतो. ट्रेमर किंवा कंप किंवा हाता-पायांची आपोआप होणारी हालचाल हा विकार जीवघेणा नाही; पण आपल्या दैनंदिन कामात यामुळे अडथळा निर्माण होतो, तसेच चारचौघांत अशी स्थिती निर्माण झाल्यास विचित्र वाटते. योग्य निदान आणि औषधांमुळे यावर मात करता येते.

Back to top button