अल्सरेटिव्ह कोलायटीस आणि आयुर्वेद - पुढारी

अल्सरेटिव्ह कोलायटीस आणि आयुर्वेद

डॉ. आनंद ओक

ज्या विकारात आतड्याच्या अंतस्त त्वचेला सुजेमुळे जखमा होऊन वारंवार रक्तमिश्रित संडासला होते, त्या विकाराला ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ असे म्हटले जाते. वयाच्या 20 ते 40 वयादरम्यान जास्त करून होणारा हा विकार महिलांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात दिसून येतो.

खरे तर या विकाराचे निश्चित असे एकच कारण अजूनही सापडलेले नाही. परंतु तरीही 3-4 प्रकारची कारणे मानली जातात.

जंतुसंसर्ग : कोणत्याही एका विशिष्ट जीवाणूचा संबंध आढळत नाही. परंतु काही जीवाणूंचे विषाक्त परिणाम अथवा काही व्हायरस यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन हा विकार होत असावा, असे मानले जाते.

अनुवंशिकता : काही वेळा विशिष्ट कुटुंबात आढळून येते.

मानसिक तणाव : प्रत्येक तणावग्रस्त व्यक्तीला हा विकार होतोच असे नाही. पण हा विकार झालेल्या व्यक्तीला चिंता, काळजी, विवंचना, भीती, अस्वस्थता इत्यादीमुळे मानसिक तणाव वाढल्यास या विकाराची तीव्रता वाढलेली दिसते. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये झालेला विशिष्ट बदल या विकारामध्ये आढळून येतो.

चुकीचा आहार : अतितिखट, अतिमसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, अतिमद्यपान, जास्त प्रमाणात मांसाहार, दूध, उघड्यावरील पदार्थ, अशुद्ध पाणी, अतिजागरण, जास्त कष्टाची कामे यासारख्या कारणांमुळे हा विकार जास्त प्रमाणात वाढतो किंवा वारंवार त्रास देतो. यावरील उपचार घेताना हे कटाक्षाने टाळणे महत्त्वाचे.

विकार नक्की कसा होतो?

सर्वसाधारणपणे मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागातील अंतस्त त्वचेला विकाराची सुरुवात होते. तेथून तो मोठ्या आतड्याच्या वरच्या बाजूने पसरत जातो. काही वेळा लहान आतड्याच्या शेवटचा भागदेखील विकारग्रस्त झालेला असतो. आतड्याच्या आतील श्लेष्मल त्वचेला सूक्ष्म फोड येतात. या फोडाच्यामध्ये चिरणीप्रमाणे जखमा झालेल्या असतात. या जखमांमध्ये ‘पू’ झालेला असतो. तो या अंतस्त त्वचेवर पसरलेला असतो. हा रक्तमिश्रित ‘पू’ संडासबरोबर बाहेर पडत असतो.

अल्सरेटिव्ह कोलायटीस मुळे होणार्‍या तक्रारी :

पाण्याप्रमाणे पातळ संडासला होणे, पोटात दुखणे, संडासवाटे रक्तमिश्रित शेम बाहेर पडणे या मुख्य तक्रारी असतात. काही रुग्णांत सुरुवातीला कधीतरी हा त्रास वारंवार होऊ लागतो. ओटीपोटात दुखणे, कळ करणे, घाईघाईने संडासला जावे लागणे. त्यावेळी पोटात दुखणे, संडास पातळ, रक्त,शेममिश्रित होणे, अचानक कळ येऊन घाई होत असल्याने भीती वाटत असले. वारंवार होणार्‍या या त्रासाने पोषण कमी होऊन, वजन कमी होते. अशक्तपणा जाणवत असतो. कोणत्याही स्वरूपाचा मानसिक ताण वाढल्यास इतर कोणताही विकार झाल्यास, महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी हा विकार पुन्हापुन्हा होत राहतो. अशक्तपणा वाढत असतो.

अल्सरेटिव्ह कोलायटीसचे दुष्परिणाम :

रक्ताची टक्केवारी कमी होणे म्हणजेच ‘अ‍ॅनिमिया’, रक्तातमील प्रोटिन्स कमी होणे, विविध जीवनसत्त्वे कमी पडणे, काही काळाने हाडे ठिसूळ होणे, हाडांची लवकर झीज होणे, शरीरात तीव्र अशक्तपणा, शरीराची वाढ, लैंगिक वाढ कमी होणे, महिलांमध्ये पाळी न होणे इत्यादी दुष्परिणाम होतात.

या आजाराचा दुष्परिणाम विविध अवयांवरदेखील होतो. वारंवार डोळे येणे, डोळ्यात सूज येणे, पायाचे घोटे, गुडघे यामध्ये सूज येणे, मणके जखडणे, ‘अँकिलॉईझिंग स्पाँडिलायटीस’ हा विकार होणे, हाडांना, सांध्यांना सूज येऊन वेदना होणे असे दुष्परिणाम काही रुग्णात आढळून येतात.

वारंवार तोंड येणे, त्वचेवर फोड येणे, त्यामध्ये पू होणे, त्वचा लाल होणे, हातापायाची बोटे वाकडी होणे हा त्रास होऊ शकतो.
काही रुग्णात लिव्हरला सूज येणे, पिताशयात खडे होणे, लिव्हर सिरॉसिस, पित्ताशयाला सूज येणे असे उपद्रव होतात. किडनीला सूज येणे, मुतखडे होणे हेदेखील होऊ शकते.

या विकारात शरीरातील सर्वच धातूचे कमी अधिक प्रमाणात पोषण कमी होत असते. त्यामुळे हातापायाचे, पाठीचे, कमरेचे स्नायू दुखणे, पायाला गोळे येणे, हातापायाला मुंग्या बधीरपणा जास्त वेळ उभे राहू न शकणे, तीव्र अशक्तपणा या तक्रारी सतावत असतात.

अल्सरेटिव्ह कोलायटीस वरील आयुर्वेदिक उपचार :

आयुर्वेदिक उपचार करताना अष्टविध परीक्षेने रुग्ण तपासणी करून त्याच्या सर्व तक्रारींची माहिती घेतली जाते. विकारामुळे उत्पन्न झालेल्या सर्व उपद्रवांची, दुष्परिणामांची माहिती घेतली जाते. रुग्णाची प्रकृती, शरीरबळ, मनोबल इत्यादीचा सखोल विचार करून संयुक्त औषधे ‘सांघिक’ पद्धतीने वापरली जातात.

रोगाचे मुख्य कारण असलेल्या ‘जखमा’ भरून आणणारी तेथील जंतुसंसर्ग दूर करणारी, आतड्याची सूज कमी करणारी, रक्तस्तंभन करणारी, अंतस्त त्वचेचा दाह शमन करून तेथील पेशींची प्रतिकार शक्ती वाढविणारी आणि याबरोबरच पोटातील वातप्रकोप कमी करून आतड्याची वाढलेली अनावश्यक गती नियंत्रित करणारी, औषधे वापरली जातात.

यासाठी कुटज, बिल्व, दारुहरीद्रा, आवळा, लोध्र, भूनिंब, वरुण, निरगुडी, जेष्ठमध, गुळवेल सत्व, किराततित्क, मोचरस, धातकी, जातीफल, अनंतमूळ, रसपर्पटी, पंचामृत पर्पटी, सुवर्ण पर्पटी, चंद्रपुटी प्रवाळ, जहर मोहरापिष्ठी, मौक्तिक भस्म, कपर्दीक भस्म, सुवर्णमाक्षिक, अभ्रक, रौप्य, सुवर्ण इ. भस्म यापासून केलेली संयुक्त औषधे वापरली जातात.

मनोबल वाढविण्यासाठी ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामांसी, खुरासनी ओवा, अश्वगंधा इत्यादीचा उपयोग होतो. हाडांची झीज दूर करण्यासाठी कपर्दीक, कुकुंटांड, श्रृंगभस्म यांचा उपयोग केला जातो.

वात प्रकोप कमी व्हावा, शरीर बल वाढावे, मनोबल वाढावे या दृष्टीकोनातून औषधी तेलाने सर्व शरीराला हलक्या हाताने मसाज, शिरोभ्यंग, शिरोधारा, हलकासा शेक यांचा उपयोग केला जातो. रक्त स्तंभक काढ्याचा अथवा सिद्ध तुपाचा बस्तीदेखील काही रुग्णात वापरला जातो. उपचारांबरोबरच आहाराची पथ्ये सांभाळणे, काही योगासने व थोडा प्राणायाम यांचेही मार्गदर्शन केले जाते.

आयुर्वेदिक उपचारांचा फायदा :

औषधे नियमित घेण्याची अशीच चिकाटी दीर्घकाळ ठेवल्यास रक्त पडणे, जुलाब खूपच कमी होतात व विविध आहार पचू लागतो. शरीरबल, वजन वाढते, आत्मविश्वास वाढून नैराश्य, चिंता कमी होतात. शरीराच्या इतर तक्रारी कमी होऊन उत्साह, कार्यक्षमता सुधारते.

Back to top button