शीतपित्ताच्या समस्येवर आयुर्वेद उपचार ठरू शकतात प्रभावी | पुढारी

शीतपित्ताच्या समस्येवर आयुर्वेद उपचार ठरू शकतात प्रभावी

शीतपित्ताच्या समस्येवर आयुर्वेदोपचार आणि आयुर्वेदशास्त्रानुसार केलेले पथ्यपालन निश्चितपणे प्रभावी ठरते. त्यांविषयी…

गुरुकुल पारंपरिक उपचार : शीतपित्ताचा त्रास असणार्‍यांनी लघुमालिनीवसंत सहा गोळ्या, प्रवाळ आणि लघुसूतशेखर प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा, सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी जेवणाअगोदर बारीक करून घ्यावे. रात्री त्रिफळा चूर्ण थोड्या तूप आणि गरम पाण्याबरोबर घ्यावे. अनियमित आकाराची पसरट सूज, किंवा गांधी, उठत असल्यास चांगल्या साजूक तुपात मिरपूड खाजेच्या जागी घासून लावावी. खाज थांबते. अग्निमांद्य तीव्र असताना वरील औषधाबरोबरच मिरपूड सकाळ, संध्याकाळ खावी.

शीतपित्तामध्ये पित्ताचा जोर जास्त असल्यास कामदुधा तीन गोळ्या आणि मौक्तिकभस्म पन्नास मि. ग्रॅम, ही दोन जादा औषधे घ्यावीत. उदरवात आणि मलावरोध तीव्र असल्यास त्रिफळाचूर्णाऐवजी गंधर्वहरीतकी घ्यावी. काहीच न मिळाल्यास तुपावर परतलेली गेरूची पावडर घ्यावी. शीतप्रकृतीच्या रुग्णांनी तुळशीची पाने वाटून त्याचा रस अंगाला लावून खाज थांबते का ते पाहावे. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी कोकम आणि कोथिंबीर वाटून त्याचा चोथा अंगाला लावावा.

ग्रंथोक्त उपचार : प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकभस्म, शतावरीघृत.
विशेष दक्षता आणि विहार : कटाक्षाने पंख्याखाली किंवा खूप गार वारे लागेल अशा ठिकाणी झोपू नये. खूप उष्ण गुणाचे क्षोभकारक पदार्थ टाळावेत, भेळ, मिसळ, इडली टाळावे.

पथ्य : तूप, मधुर ताक, कोहळा, नारळपाणी, मनुका, द्राक्षे, अंजीर, मुगाची डाळ, लोणी, फिके जेवण, डाळिंब, ताडफळ, धने, कोथिंबीर.
कुपथ्य : आंबट, खारट, तिखट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, मिरच्या चहा, पाव, दारू, धूम—पान, तंबाखू, मशेरी, भेळ, मिसळ.
रसायनचिकित्सा : लघुमालिनीवसंत, प्रवाळ, लघुसुतशेखर, त्रिफळाचूर्ण.

योग आणि व्यायाम : माफक व्यायाम.
रुग्णालयीन उपचार : चांगल्या तुपात मिरपूड कालवून लेप लावणे. नाजूक त्चचेेच्या ठिकाणी शतधौतघृत आणि दशांगलेप लावणे.
अन्न षष्ठी उपक्रम (पंचकर्मादी) : मलावरोधाकरिता सौम्य विरेचन किंवा मात्राबस्ती, किंवा कोथिंबीर वाटून त्याचा लेप सर्वांगाला लावणे आणि रस पोटात घेणे.

चिकित्साकाल : तीन ते पंधरा दिवस.

निसर्गोपचार : कोकम वाटून सर्वांगाला लावणे.

अनुपर्भवचिकित्सा : लघुमालिनीवसंत, दीर्घकाळ किंवा तुपाबरोबर वा तुळशीच्या रसाबरोबर मिरपूड घेणे.

संकीर्ण : आहार विहारात आलेल्या खूप तीक्ष्ण, उष्ण पदार्थांमुळे पोटात उष्णता वाढून त्या जोडीला बाह्य त्वचेला गारवा, गारवारे लागले की हा रोग होतो याचे भान ठेवावे.

  • वैद्य विनायक खडीवाले

Back to top button