पक्षाघाताची लक्षणे जाणून घ्‍या, वेळीच सावध व्‍हा... | पुढारी

पक्षाघाताची लक्षणे जाणून घ्‍या, वेळीच सावध व्‍हा...

शरीरात रक्तप्रवाहाला होणारा अडथळा अतिशय घातक असतो. अगदी प्राणावरही बेतू शकते. सर्वात धोक्याचे असते ते मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्याला अडथळा आला तर. याला पक्षाघात किंवा ब्रेनस्ट्रोक ( brain stroke ) म्हणतात. सर्वसामान्य व्यक्तीला पक्षाघाताबद्दल फारशी माहिती नसते. हा झटका आल्यावर नेमके काय करायला हवेत, त्यावर काय उपचार आहेत. याबाबत सर्वसामान्यांना काही माहीत नसते. पण मुळात पक्षाघाताची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे सर्वात आवश्यक आहे. इश्वेमिया किंवा रक्तप्रवाह कमी होणे किंवा हॅमरेज म्हणजे रक्तस्राव यामुळे पक्षाघात होतो. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

1) हात लुळा पडणे : पक्षाघात येत असलेल्या रुग्णाचा एक किंवा दोन्ही हात सुन्न पडतात किंवा लुळे पडत असल्याचे जाणवू लागते. असे होत असल्यास त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला हवे. हात सुन्न पडला तर रुग्णाला तो वर करता येत नाही, हे ध्यानात घ्या.

2) चेहरा झुकणे : रुग्णाचा चेहरा एका बाजूला झुकला किंवा चेहरा सुन्न झाला असेल तर काहीतरी गंभीर आहे हे समजून घ्या. त्याला लगेच रुग्णालयात न्या.

3) बोलता न येणे :  पक्षाघाताच्या झटक्यावेळी रुग्णाला बोलताना त्रास होत असेल. एखाद्या साध्या प्रश्नाचे उत्तरही तो देऊ शकत नसेल तर लगेच त्याला डॉक्टरांकडे न्या.

4) शरीराचे संतुलन हरवणे :  शरीराचे संतुलन राखण्यात अडचण येत असेल, व्यवस्थित उभे राहता येत नसेल, चालता येत नसेल तर हे पक्षाघाताचे लक्षण आहे.

5) डोकेदुखी :  कोणत्याही कारणाशिवाय तीव— डोकेदुखी होणे हे सर्वसाधारणपणे पक्षाघाताचे लक्षण असू शकते.

6 )थोड्या वेळासाठी स्मृती जाणे : काहीही झाले नसताना अचानक थोड्या वेळासाठी तुमची स्मृती गेली तर हा पक्षाघाताच्या आजाराचा संकेत आहे.

7) काही वेळा डोळ्यांसमोर अंधारी येणे हेही पक्षाघाताचे एक कारण असू शकते.

  • डॉ. मनोज कुंभार 

Back to top button