वजन कमी करायचे आहे? हे ५ प्रकारचे चहा ठरतील उपयुक्त | 5 Teas for Weight Loss | पुढारी

वजन कमी करायचे आहे? हे ५ प्रकारचे चहा ठरतील उपयुक्त | 5 Teas for Weight Loss

पुढारी ऑनलाईन : वजन कमी करायचे असेल तर सगळ्यात आधी आपण चहा बंद करतो. चहातून शरीरात जाणारी जास्तीची साखर कमी करणे हा या मागचा उद्देश असतो. पण तुम्हाला माहिती आहे का काही प्रकारचे चहा असे आहेत, जे प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी मदतच करतात. हे ५ प्रकारचे चहा दररोज घेतले तर वजन कमी व्हायला मदत तर होतेच शिवाय शरीराला आवश्यक असे आरोग्यदायी घटकही मिळतात.


ग्रीन टी

१. ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट असतात. कॅटेचिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कॅटेचिन्समुळे फॅटच्या पेशीतून फॅट बाजूला होतात आणि फॅट नष्ट करण्याचे लिव्हरचे कामही सुधारते. ग्रीन टी बाजारात सहज उपलब्ध आहे. नेहमीच्या साखरेच्या चहाच्या जागी ग्रीन टी घेता येतो.


२. पुदिना (पेपरमिंट) टी

वजन कमी करणे, पित्त कमी करणे, त्वचेचा पोत सुधारणे, शांत झोप लागणे या सगळ्यांसाठी पेपरमिंट टी उपयुक्त ठरतो. तसेच पेपरमिंटच्या चहामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. पेपरमिंट टीमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे आपण वरचे खाणे आपोआपच टाळतो. याचा वजन कमी होण्यात चांगला लाभ होतो.


३. हळद चहा

हळदीचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहिती आहेत. पण हळद वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे. पोटात साठलेल्या चरबीमुळे शरीराची चयापचय क्रिया बिघडून जाते. चरबीमुळे कोलेस्टेरॉल कमी होते, शिवाय रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी येते. यामुळे चयापयच क्रिया सुधारते. हळदीमुळे पचनक्रिया ही सुधारते. हळदीचा चहा बनवण्यासाठी हळद पेस्ट आणि आल्याची पेस्ट घ्यायची आणि त्यात एक कप पाणी घालयाचे आणि या पाण्याला उकळी आणायची. पिण्यापूर्वी गाळून घ्यायचे. अगदी झटपट हळदीचा चहा तयार होतो.


४. लिंबू – दालचिनी चहा

लिंबू आणि दालचिनीचा चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. एक कप कोमट पाण्यात एका लिंबचा रस, एक चमचा दालचिनी पावडर आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून हा चहा बनतो. लिंबात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात. याशिवाय पेक्टिन फायबर आणि अँटिऑक्टिडंट असतात. तर दालचिनीमध्ये क्रोमियमचे संयुग असतात, त्यामुळे भुकेवर नियंत्रण राहाते. याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.


५. तुळशीच्या पानांचा चहा

तुळशीच्या पानांपासून औषधी असा चहा बनतो. तुळशीच्या पानांच्या चहामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. याशिवाय तुळशीचे इतरही अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीची चार पाच पाने एक कप पाण्यात टाकायची आणी हे पाणी उकळून नंतर गाळून घ्यायचे. पिताना यात चवीसाठी अर्धा चमचा मधही घालता येते. या चहाची चवही चांगली लागते.


हेही वाचा

Back to top button