मधुमेहाच्‍या नियंत्रणासाठी... | पुढारी

मधुमेहाच्‍या नियंत्रणासाठी...

मधुमेही स्वतःहून विविध उपकरणांचा वापर करून स्वतःच्या रक्तातील साखरेची पातळी तपासतात, तेव्हा त्याला रक्तातील साखरेचे स्वतः निरीक्षण करणे (सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज) असे म्हणतात. त्याच्या आधारे रूग्णांचे उपचार (आहार, व्यायाम, इन्सुलिन, मधुमेहविरोधी औषधे, तणावाचे व्यवस्थापन) किती प्रभावी आहेत त्याचा ते आढावा घेऊ शकतात. ( Self monitoring of blood glucose )

स्वत: निरीक्षण केल्याने व्यक्तीच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर शक्य तितके नियंत्रण राखण्याला प्रोत्साहन मिळते. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीस खूप जास्त किंवा खूप कमी साखरेची लक्षणे जाणवत नाहीत तोपर्यंत त्यांचे मधुमेहाकडे दुर्लक्ष रहाते. मधुमेहाची गुंतागुंत सुरू झाल्यानंतरच त्याचे निदान होते, अशी बरीच प्रकरणे पहायला मिळतात. जसे की,1) मूत्रपिंडाचा आजार 2) रेटिनोपॅथी 3) हृदयवाहिकासंबंधी गुंतागूंत 4) परिघीय रक्ताभिसरण विकार

रक्तातील ग्लुकोजचे स्वत: निरिक्षण करणे (एसएमबीजी) हा डायबीटीससाठी आधुनिक उपचाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्लिसिम (ग्लाइसेमिक) नियंत्रणाची विशिष्ट पातळी मिळवण्यासाठी आणि हायपोग्लाइसीमिया रोखण्यासाठी एसएमबीजीची शिफारस केली गेली आहे. माहितीच्या आधारे, त्यावर पावले उचलावी लागतात. ( Self monitoring of blood glucose )

मधुमेह असलेल्या रूग्णांची त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी प्रत्येक व्यक्तीसाठी निराळी असते. तज्‍ज्ञांनुसार, इन्सुलिनचे उपचार घेणार्‍या रूग्णांनी दिवसातून कमीतकमी चारवेळा रक्तातील ग्लुकोजची पातळी पाहावी, हे रूग्णांनी उपाशी, जेवणापूर्वी आणि झोपण्यापूर्वी केले पाहिजे.

इन्सुलिनचे उपचार घेणार्‍या रूग्णांनी आठवड्यातून कमीतकमी चार वेळा एसएमबीजी करणे, ज्यात कमीतकमी दोन उपवास आणि दोन जेवणानंतरच्या निरिक्षणाचा समावेश असावा. मधुमेहींसाठी रक्तातील ग्लुकोजच्या स्वत: निरिक्षणाची शिफारस केली जात असली तरी, वेळोवेळी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीमुळे आपले प्रयत्न त्याच दिशेने जात आहेत की नाही हे समजण्यास मदत होऊ शकते.

  • डॉ. राजेंद्र बेंद्रे

Back to top button