Acidity | तुम्हाला पित्ताचा त्रास आहे का? ‘हे’ घरगुती उपाय करा अन् आराम मिळवा | पुढारी

Acidity | तुम्हाला पित्ताचा त्रास आहे का? 'हे' घरगुती उपाय करा अन् आराम मिळवा

पुढारी ऑनलाईन : बदलती जीवनशैली आणि खाणपाण्याच्या अनियमित सवयींमुळे अ‍ॅसिडिटीची म्हणजेच पित्ताची समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकते. वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडिटीच्या समस्येमुळे पोटाचे अल्सर, आतड्यांचे विकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडीटी (Acidity) आणि अपचनाचा त्रास होत असेल तर त्यावर ‘हे’ घरगुती उपाय करा अन् अ‍ॅसिडिटीवर आराम मिळवा.

बडीशेप

आम्लपित्त आणि छातीत जळजळ, सूज येणे यासारख्या अॅसिडिटीच्या (Acidity) लक्षणांवर बडीशेप ही अधिक गुणकारी ठरते. असा त्रास जाणवल्यास एका ग्लास कोमट पाण्यात १ चमचा बडीशेप पावडर घ्या आणि त्याचे सेवन करा अ‍ॅसिडिटीच्या या त्रासांपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल आणि पचनदेखील सुधारेल.

जिरे

अ‍ॅसिडीटीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी जिरे थेट चघळावे. एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे उकळून पिल्यासही अ‍ॅसिडिटीवर अधिक फायद्याचे ठरते. जिरे हे गॅस्ट्रो संरक्षणात्मक असतात. ते शरिरातील आम्लता कमी करणे, अ‍ॅसिडिटीला (Acidity) प्रतिबंधित करण्यासाठी उपयोगी ठरते. छातीत जळजळ, वेदना, मळमळ, सूज येणे आणि बद्धकोष्ठतेवर जिरे अधिक गुणकारी आहे.

लवंग

लवंगाचा तुकडा चोखल्याने आम्लपित्त आणि त्याची लक्षणे जसे की पोट फुगणे, अपचन, मळमळ, जठराची चिडचिड इत्यादीपासून सुटका मिळते.

कोमट पाणी

सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

कलिंगडाचा रस

कलिंगडाचा रस उष्णता कमी करून, शरिरात थंडावा आणते. एक ग्लास कलिंगडाचा रस आम्लपित्त दूर करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करते. कलिंगडाचा रस पचनासाठी देखील चांगला असतो.

वेलची

दररोज १ वेलची चघळल्याने आम्लपित्त, पोट फुगणे आणि पचन सुधारण्यास मदत होते. वेलचीमध्ये भरपूर फायबर असते. वेलची पचनाशी संबंधित समस्या दूर करण्याचे काम करते. त्यामुळे पोटाचे अनेकप्रकारचे आजार टाळण्यासाठी दररोज एक वेलची चघळाच.

पपई

पपई गॅस्ट्रिक अ‍ॅसिड स्राव कमी करते आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देते. हा परिणाम पपईमध्ये असलेल्या पापेन या एन्झाइममुळे होत असल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास झाल्यानंतर पपई खाणे फायद्याचे ठरते.

गूळ

गुळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम दोन्ही असतात, गुळाचा एक गोळा तुम्हाला तुमच्या पाटोचा दाह कमी करण्यासाठी मदत करेल, त्यामुळे जेवणानंतर थोडा गुळ खाण्याची सवय लावून घ्या. पोटॅशियम PH संतुलन राखण्यासाठी आणि पोटाच्या अस्तरात श्लेष्माचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी आवश्यक आहे. हे अ‍ॅसिडचे प्रमाण प्रतिबंधित करते. तुमची पचनसंस्था मजबूत ठेवणे आणि सामान्यपणे कार्य करण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. ज्यामुळे आम्लता आणि इतर पाचन समस्यांचा धोका कमी होतो.

हे ही वाचा :

Back to top button