दम्यावरील उपचार | पुढारी

दम्यावरील उपचार

डॉ. आनंद ओक

दम्यावरील उपचार : स्थानिक उपचार व पोटातून घ्यायच्या औषधी या द्विवीध प्रकारांनी दम्यावर आयुर्वेदिय उपचार केले जातात.

पंचकर्म चिकित्सा :-

स्नेहन :- तिळाचे तेल, नारायण तेल, माषतेल इत्यादी प्रकारचे तेल लवणयुक्त करून छातीला, पाठीला तसेच सर्वांगाला चोळून लावावे. यामुळे वाताची गती प्राकृत होते. स्रोतसांना आर्दव प्राप्त होते. कफ सुटण्यास मदत होते.

स्वेदन :- या प्रकारात छाती व पाठीला औषधी काढ्याच्या वाफार्‍याने शेक दिला जातो. ज्यामुळे छातीतील कफ विलयीभूत होऊन पातळ होतो व सहजतेने बाहेर पडतो. श्वासमार्गाने विस्तारण होऊन दडपलेली छाती मोकळी होते. कित्येक वेळा दम्यावरील रुग्णांना वरील दोन उपचार दोन ते तीन आठवडे सतत नियमाने घेतल्यावरच बराच आराम पडल्याचे आढळते.

वमन :- जास्त कफाचे बडके पडणार्‍या व कफाने छाती डबडबलेल्या पेशंटच्या शरीरातील विकृत कफ बाहेर काढून टाकण्यासाठी केला जाणारा हा उपाय. या प्रकारात तीळ तेल, गाईचे तूप इत्यादी. योग्य स्नेह पदार्थ काही काळ पोटात दिले जातात. नंतर स्नेहन व स्वेदन हे वरील दोन उपचार केले जातात व यानंतर उसाचा रस, दूध इत्यादी पदार्थ भरपूर पोटात देऊन उलटी होणारे औषध दिले जाते. त्यातून शरीरात साठलेला विकृत कफ बाहेर पडतो. वसंत ऋतू म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत असा उपक्रम केला जातो.

नस्य :- प्रथम सर्दीचा त्रास सुरू होऊन नंतर दम्याचा त्रास सुरू होणार्‍या रुग्णांनी नाकाच्या अंत:त्वचेची प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधी तेलाचे थेंब सोडून केली जाणारी नस्य चिकित्सा अत्यंत उपयोगी ठरते.

विरेचन : या उपायात पोटात जुलाबाचे औषध देऊन संडासवाटे विकृत कफ काढून टाकला जातो. आम्लपित्तासह दम्याचा त्रास जाणवणार्‍या रुग्णांना याचा अधिक फायदा झालेला आढळून येतो.

औषधी उपचार : दम्यावरील औषधी उपचारांमध्ये वेगावस्थेत व अवेगावस्थेत भिन्न प्रकारचे उपचार केले जातात. वनस्पतीज औषधीपैकी मिरी, पिंपली, सूट, लवंग, कंटकारी, रिगणी, अडुळसा, ज्येष्ठमध, दालचिनी व तमालपत्र, भारंगी, सोमलता, धोतरा, वस्तनाभ ही द्रव्ये तर अधकभस्म, शंगभस्म, हिंगूल, मनशील इ. तसेच रससिंदूर, समीरपन्नग ही रसकल्प सितोपलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण यांसारख्या औषधी अभ्यंतरत: वापरल्या जातात. त्यासहच श्वासकुठार, सोमासव, कनकासव इ. सारखी औषधीदेखील यशस्वीपणे वापरली जातात.

प्रत्यक्ष लागलेली असताना (वेगावस्था) धोतर्‍याची पाने, ज्येष्ठमध निखार्‍यावर टाकून येणारा धूर नाकाने घेणे. वाताचे प्राबल्य असताना छाती घूँ-घूँ वाजत असताना तिळाचे तेल व ज्येष्ठमध असे गरम करून घेतल्यानेदेखील त्वरित फायदा होतो. यासहज चतुर्भुजरस, श्लेष्मांतक मिश्रण, श्लेष्मांतकरस रससिंदूर, समीपन्नग, कनकासव हे कल्प पोटात दिले जातात.

प्रत्यक्ष धाप लागलेली नसताना (अवेगावस्था) दम्याच्या दोन वेगांमधील काळात दमा असणार्‍या रुग्णांसाठी प्राणावहस्रोतसासबल वाढविणारी अशी रसायन चिकित्सा केली जाते. यामध्ये प्रामुख्याने लेडी पिंपळी दुधात शिजवून घेणे, च्यवनप्राश, अभ्रकभस्म, शृंगभस्म यांसारख्या रसायनांचा वापर उपयोगी ठरतो व दम्याच्या वेगांची संख्या कमी होऊन तीव्रता कमी होते.

याच वेळेला वर्षाऋतूच्या सुरुवातीच्या काळात वमन उपक्रम केल्यास नंतर येणारे दम्याचे वेग टाळले जाऊ शकतात. दमा या विकाराचे मूळ कारण अग्रिमांध असल्याने नियमितपणे हिंगवष्टक चूर्ण, पिप्पल्यासव, कुमारी आसव यांसारखी पचनाची ताकद वाढविणारी औषधे घ्यावीत.

प्रतिबंधात्मक उपाय : आहारापैकी मका, शेवगा, तांबडा भोपळा, वाल, मटकी, वाटाणा, अंडी, मासे, जास्त आंबट फळे, दही, कोल्ड्रिंक्स, लोणची, पापड इ. तळलेले पदार्थ श्रीखंड, बासुंदीसारखे जड पदार्थ कटाक्षाने टाळावेत. नित्य घेण्याचा आहार नेहमी गरम असावा. त्यामध्ये सूंठ, मिरे, लवंग यांचा युक्तिपूर्वक वापर करावा. जेवण हे नेहमीपेक्षा तीन चतुर्थांश भागच घ्यावे. रात्रीच्या वेळी थोडे लवकरच जेवावे.

विहारापैकी पावसात भिजणे, अंगावर ओले कपडे ठेवणे, ओलसर जागी काम करणे, थंड पाण्याने स्नान कटाक्षाने टाळून नेहमी शरीर गरम ठेवावे, अनेकवेळा धूळ, धूर, वारा यांमुळे दम्याचे वेग येत असतात. त्यामुळे यांच्याशी संपर्क टाळावा. विडी, सिगारेट ओढणे टाळावे. सकाळी उठल्यावर नियमाने छाती शेकणे. छाती व पाठ यांना तेल लावून गरम पाण्याने शेकावे. प्राणायामाचा उपयोग नित्य करणेदेखील दमेकरी रुग्णास लाभदायक ठरते.
(उत्तरार्ध)

Back to top button