गर्भावस्थेतील पाठदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी 'हे' आहेत उपाय | पुढारी

गर्भावस्थेतील पाठदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी 'हे' आहेत उपाय

रोजच्या घरगुती कामाच्या वेळी, झोपताना शरीराची स्थिती योग्य असली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच सर्वसाधारण व्यायाम करावा. काही महिलांना प्रसूतीपूर्व योगाभ्यास, मालिश यामुळे या वेदनांमध्ये आराम मिळतो. आरामात हळूहळू काम केल्यास पाठ आणि पोट यांचे स्नायू मजबूत होतात. गर्भावस्थेत शारीरिक थकवा येतोच पण भावनिक दृष्ट्या आनंदाचा अनुभव असतो. त्यामध्ये आपल्या हातात लहानसे बाळ येण्याचा आनंद असतोच पण त्याचवेळी गर्भावस्थेत पाठदुखी आणि नंतरही पाठदुखीने स्त्री त्रस्त होते. योग्य वेळी लक्ष न दिल्यास तर मात्र पाठदुखी त्रासदायक होते.

गर्भावस्थेत सतत पाठ दुखत असल्यास प्रसुती नंतर कायम स्वरुपी पाठदुखी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पाठदुखीकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यामुळेच गर्भावस्थेतील कंबरदुखीचा वेळीच उपचार केला पाहिजे. तसेच प्रसुतीनंतरही आठ दहा महिने एखादी वेदना राहात असेल तर त्यावरही वेळीच उपचार केले पाहिजेत. जेणेकरून प्रसुतीनंतर कायमची पाठदुखी होणार नाही. 60 टक्के महिलांमध्ये गर्भावस्थेतील पाचव्या आणि सातव्या महिन्यात पाठदुखीने त्रस्त होतात. काही प्रकरणात गर्भावस्थेच्या दुसर्‍या महिन्यापासूनच वेदना होतात.

मणक्याचे त्रास : गर्भावस्थेत मणक्याशी निगडीत सामान्यपणे पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होतात. अर्थात गर्भावस्थेदरम्यान आणि आणि नंतरही महिलांना काही त्रासांना सामोरे जावे लागते. पाठीच्या खालच्या बाजूला वेदना, ओटीपोटाच्या वेदना, सिम्फसिस प्युबिक डिसरप्शन हे त्रास जाणवू शकतो.

खालच्या पाठीला वेदना : सर्वसाधारणपणे कंबर किंवा त्याच्यावर पाठीच्या मधे वेदना होतात. अर्थात गर्भावस्थेदरम्यान पाठीच्या खाली वेदना होतात. पण काही प्रकरणात पाय आणि त्याच्या खाली पावलांपर्यंत वेदना होतात. त्याला सायटिका म्हणतात. त्यात खूप वेदना होतात पण अवस्था गंभीर होईलच असे नाही. वास्तविक सायटिकामधल्या नसा मणक्यापासूनच निघतात आणि नितंबांच्या मधून पायापर्यंत पोहोचतात. त्यामुळे गर्भातील अर्भकाची जसजशी वाढ होते तसे गर्भाशयाचा मणक्यावर ताण पडतो आणि वेदना होतात. तशाच वेदना खूप जास्त वेळ उभे राहिल्यास आणि बसल्यासही होऊ शकतात.

गर्भावस्थेत ओटीपोटाच्या वेदना : गर्भवती महिलांमध्ये ओटीपोटाच्या वेदना होण्याची शक्यता चार पट अधिक असते. कंबरेच्या एकाच बाजूला खालच्या बाजूला आणि कंबरेच्या खाली हाडांच्या दोन्ही बाजूस जाणवते. गर्भावस्थेत ओटीपोटाच्या वेदना दोन्ही बाजूस जाणवतात. या नितंबांच्या खालच्या बाजूला आणि जांघेच्या वरच्या बाजूपर्यंत वेदना होतात, पण गुडघ्याच्या खाली वेदना होण्याचे प्रमाण कमी असते. गर्भावस्थेत ओटीपोटाच्या वेदना होण्याचे कारण खूप वेळ एकाच अवस्थेत राहणे असू शकते. जसे खूप वेळ बसून काम करणे किंवा पुढच्या बाजूला झुकून बसणे.

सिम्फसिस प्युबिक डिसरप्शन : जांघेतील हाडांमधील अंतर वाढल्याने या वेदना होतात. गर्भावस्थेनंतर या वेदना होतात. सर्वसाधारपणे या वेदना होत नाहीत, पण जेव्हा या वेदना होतात तेव्हा खूप जास्त होतात. अशा वेळी महिलांना फिजिओथेरपी, स्टॅबिलायझेशन बेल्ट आणि वेदनाशामक गोळ्यांची गरज भासते. या वेदना खूप गंभीर असतात, पण थोडाच काळ जाणवतात. या वेदना लवकर बर्‍या होत नसल्या तरीही आराम नक्कीच मिळतो.

दैनंदिन काम पाठदुखीस कारण : दैनंदिन कामाचाही शरीरावर परिणाम होताना दिसतो. त्यामुळे ओटीपोटाच्या मागच्या बाजूला वेदना होतात. दैनंदिन कामामुळे वेदनेत भर पडते. त्यामुळे चालणे, बसणे, पुढे वाकणे, हलणे, सामान उचलणे, जिने चढणे या सर्व गोष्टींचाही त्रास होऊ शकतो.

पाठदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी : गर्भावस्थेत योग्य पद्धतीने बसले पाहिजे. रोजच्या घरगुती कामाच्या वेळी, झोपताना शरीराची स्थिती योग्य असली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच सर्वसाधारण व्यायाम करावा. काही महिलांना प्रसूतीपूर्व योगाभ्यास, मालिश यामुळे या वेदनांमध्ये आराम मिळतो. आरामात हळूहळू काम केल्यास पाठ आणि पोट यांचे स्नायू मजबूत होतात. तसेच दुखर्‍या हाडांना वाढत्या पोटाचे वजन कमी जाणवेल.

डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button