मूळव्याधीवर ‘ही’ आहेत होमिओपॅथीमध्ये गुणकारी औषधे, जाणून घ्या अधिक | पुढारी

मूळव्याधीवर 'ही' आहेत होमिओपॅथीमध्ये गुणकारी औषधे, जाणून घ्या अधिक

मूळव्याध म्हटले की, संडासवाटे रक्‍तस्त्राव, कोणाला शौचास होणारा त्रास, तर कोणाला संडासच्या जागी आग आग होणे, तर कोणाला संडास होताना वेदना होतात. या सर्व त्रासास कोणी मूळव्याध म्हणून बघेल, तर अनेकदा भगिंदर नाव देऊन बरेच लोक स्वतःच उपचारावर भर देतात; पण योग्य निदान व उपचारांबाबतीत अपुरी माहिती यामुळे अनेकदा लोक योग्य उपचारांपासून वंचित राहतात.

मूळव्याध म्हणजे गुदाशय व मलाशय यांच्या रक्‍तवाहिन्यांना असलेली सूज. गुदाशयामधील रक्‍तवाहिन्यांमधील दाब वाढला की, हा त्रास प्रामुख्याने बघायला मिळतो. मूळव्याध हा प्रामुख्याने तीन प्रकारचा असतो. ज्या रक्‍तवाहिन्यांची सूज गुदुभागाच्या आत विकसित होते, त्यांना अंतरिक्‍त म्हणतात किंवा ज्या गुदद्वाराशेजारील त्वचेच्या खाली असतात त्यांना बाह्य असे म्हणतात आणि तिसर्‍या प्रकारात आंतरिक व बाह्य या दोन्ही मध्ये असतात. अंतरिक्‍त मूळव्याध हे शक्यतो रक्‍तस्त्रावास कारणीभूत ठरतात, तर बाह्य मूळव्याध या वेदनांना कारणीभूत ठरतात.

मूळव्याध होण्याची कारणे

– मूळव्याध अनेक कारणांमुळे होऊ शकतो; पण प्रामुख्याने अनुवंशिकता, शौचात जास्त वेळ कुंथणे, शौचालय जास्त वेळ बसणे, शौचास खडा होणे, शौचास साफ न होणे ही कारणे प्रामुख्याने असतात.

तसेच जेवणामध्ये अनियमितता, तंतुमय पदार्थांचे सेवन कमी, जेवणाच्या वेळा बरोबर नाहीत, जड पदार्थांचे सेवन, पाण्याची कमतरता हे सर्वसाधारण तारुण्यात होणार्‍या मूळव्याधाची लक्षणे आहेत.

तसेच गर्भावस्थेत गुदुभागावर रक्‍तवाहिन्यांवर दाब वाढतो व महिलांमध्ये हे सर्वसाधारण जाणवते. पुरुषांमध्ये यकृताचे विकार जुनाट आजार काही प्रमाणात मूळव्याधीस कारणीभूत ठरतात. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या प्रकृतीनुसार त्यांच्यामध्ये दिसणार्‍या लक्षणाचे स्वरूप वेगवेगळे असते; पण प्रामुख्याने दिसणारी लक्षणे ही खालीलप्रमाणे आहेत.

– शौचावाटे रक्‍त पडणे आणि रक्‍तस्त्राव हा नेहमी शौचासोबत असतो. तसेच गुदुभागाशेजारील त्वचेला सूज येते. अनेक लोकांमध्ये संडासच्या जागेला खाजवणे आणि खाज शक्यतो रात्रीच्या वेळेस फार जाणवते. शौचानंतर फार वेदना आणि किंवा त्या वेदना बराच कालावधीसाठी राहतात, बसण्यास त्रास होतो, ही लक्षणे साधारणपणे जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतात.

मूळव्याधीचे प्रकार गुदाशयाची व गुदद्वाराचे तपासणी किंवा प्रॅक्टोस्कोपीनंतर रुग्णाला कोणत्या प्रकारचा मूळव्याध व त्याची तीव्रता किती आहे, हे डॉक्टर सांगू शकतात.

फर्स्ट डिग्री मूळव्याध – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली लहान सूज किंवा कोंब जो बाहेरून दिसत नाही.

सेकंड डिग्री मूळव्याध – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली थोडी मोठी सूज किंवा कोंब शौच्यावेळी ही सूज बाहेर येते.

थर्ड डिग्री मूळव्याध – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अनेक लहान गाठी. या गाठी किंवा कोंब पुन्हा आत ढकलता येतात.

फोर्थ डिग्री मूळव्याध – गुदद्वाराबाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक थोड्या मोठ्या गाठी किंवा कोंब पुन्हा आत ढकलता येत नाहीत.
गुदुभागाची तपासणी व त्याचे योग्य निदान करणे

1) DRE ( Digital Rectal Examination)

प्रथम गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस मूळव्याधीचे कोंब आहेत का हे तपासतात आणि त्यानंतर आतील बाजू तपासणी केली जाते. याला डिजिटल रेक्टर एक्झामिनेशन म्हणतात.

2) प्रॅक्टोस्कोपी

काही वेळा प्रॅक्टोस्कोप साधन (proctoscope instrument) वापरून आतील भागाची तपासणी करता येते. या तपासणीने मूळव्याधाची डिग्री, तीव्रता आणि डिग्रीवरून मूळव्याध औषधाने बरा होतो किंवा सर्जरीची गरज आहे याची माहिती मिळण्यास मदत होते.

3) कोलोनोस्कोपी

काही वेळा कर्करोग किंवा मोठ्या आतड्यांना इतर काही त्रास नाही ना, याची खात्री करण्याकरिता डॉक्टरांना कोलोनोस्कोपी किंवा एन्डोस्कोपीचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व लक्षणेच्या तीव्रतेवर वरील तपासण्या करून घेणे गरजेचे असते. काही वेळा शौचावाटे रक्‍तस्त्राव होत असल्यामुळे अ‍ॅनिमियाची तक्रार लोकांमध्ये जास्त असते. त्यामुळे रक्‍ताची तपासणी करून घेणे व हिमोग्लोबिनचे प्रमाण पाहणे गरजेचे आहे.

होमिओपॅथिकमध्ये रुग्णांना होणारा रक्‍तस्त्राव व वेदना कमी करण्यासाठी औषध देता येतात. शस्त्रक्रिया ही मूळव्याधीची डिग्री आणि तीव्रता या गोष्टींवर अवलंबून असते. ज्यांना शौचास साफ होत नाही किंवा शौचास बराच वेळ बसावे लागते किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये अनियमितता, ज्या लोकांमध्ये मानसिक तणावामुळे किंवा ज्यांना बर्‍याच कालावधीसाठी बसून काम करावे लागते, अशा लोकांमध्ये मूळव्याधीची तक्रार असणार्‍यांना होमिओपॅथिक उपचार गुणकारी ठरतात. गर्भावस्थेत होणार्‍या मूळव्याधीसाठीही होमिओपॅथीमध्ये गुणकारी औषधे आहेत. होमिओपॅथीकमध्ये नक्स ओमिका, सल्फर यासारखी औषधे फार गुणकारी ठरतात.

डॉ. प्रिया पाटील

Back to top button