Blood pressure : रक्‍तदाब असल्यास 'अशी' घ्या काळजी | पुढारी

Blood pressure : रक्‍तदाब असल्यास 'अशी' घ्या काळजी

आपल्या शरीरात रक्‍त वाहत असते. या वाहणार्‍या रक्‍ताचा रक्‍तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला दाब येतो. यालाच रक्‍तदाब म्हणजे ब्लड प्रेशर (Blood pressure) म्हणतात. जेव्हा हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा रक्‍तवाहिन्यांतील दाब जास्त होतो. याला सिस्टॉलिक दाब म्हणतात. हृदयाच्या स्नायूंची स्थिती जेव्हा शिथिल असते तेव्हा रक्‍तदाब सर्वात कमी पातळीवर जातो. या बिंदूला डायस्टॉलिक ब्लडप्रेशर म्हणतात. रक्‍तदाब हे दोन बिंदूंमध्ये नोंदले जातात. रक्‍तदाब वेगवगळ्या व्यक्‍तींत वेगवेगळा असतो.

तरुण आणि प्रौढ व्यक्‍तीचा रक्‍तदाब 120/80. म्हणजे सिस्टॉलिक 120 मिलिमीटर्स ऑफ मर्क्युरी, तर डायस्टॅलिक 80 मि.मी. ऑफ मर्क्युरी एवढा असतो. तो सातत्याने 135/85 किंवा जास्त राहिल्याचे आढळल्यास त्या व्यक्‍तीला उच्च रक्‍तदाब आहे असे मानले जाते. या स्थितीला हायपरटेन्शन म्हणतात.

लक्षणे : डोकेदुखी, भ्रम, छातीत दुखल्यासारखे वाटणे, श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास, निद्रानाश, बर्‍याचदा मात्र रक्‍तदाब वाढला तरी कुठलीही लक्षणे नसतात.

कारणे : वजन वाढलेले असणे. अनेक वर्षे मद्यपान करणे. आहारातील मिठाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असणे. आहारात अतिरेकाने तेल-तुपाचा वापर करणे. कोणतीही चिंता किंवा विवंचना तात्पुरता रक्‍तदाब वाढवते. काही अंतर्ग्रंथीचे विकार, महारोहिणीचे अरूंद होणे, गर्भवती स्त्रियांना होणारा एक्लॉम्सिया नावाचा आजार किंवा काही व्यक्‍तींना झोपेत येणारा सतत व्यत्यय यामुळे रक्‍तदाब वाढतो. रक्‍तदाब ताब्यात आणल्याने हृदयविकार होण्याचा धोका वीस टक्क्यांनी, तर पक्षाघात होण्याचा धोका चाळीस टक्क्यांनी कमी होतो.

रक्‍तदाब (Blood pressure) असल्यास घ्यावयाची काळजी : वजन आटोक्यात ठेवावे. मिठाचे मर्यादित सेवन करावे. पापड, लोणची, पाकिटातील सूप, वेफर्स खाण्याचे टाळावे. नियमित पायी चालावे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन बंद करावे. मद्यपान बंद करावेत. महिन्यातून एकदा तरी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपला रक्‍तदाब तपासून घ्यावा.

  • प्रा. प्राजक्‍ता पाटील

Back to top button